पुस्तकांचे गाव: भिलार गावाला नवी ओढ ….. स्ट्रॉबेरीच्या गोडीला … साहित्याची जोड ….. !!

0
पुस्तकांचे गाव: भिलार गावाला नवी ओढ ….. स्ट्रॉबेरीच्या गोडीला … साहित्याची जोड ….. !!

भिलार गावाला नवी ओढ ….. स्ट्रॉबेरीजच्या गोडीला … साहित्याची जोड ….. !!

पुस्तकांचे गाव

महाबळेश्वरची ओळख थंड हवेच ठिकाण म्हणून १८ व्या शतकापासून झाली… देशातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रामध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचे सह्याद्रीच्या डोंगर रांगातील गिरीवन शहर …. या शहरापासून जवळच असलेल पाचगणी हेही असच सुंदर आणि टुमदार शहर … अशा या दोन जगप्रसिद्ध शहराच्या मध्ये भिलार हे गाव वसलेल आहे.

या गावाची गेल्या काही वर्षापासून स्ट्रॉबेरी पिकविणारे गाव म्हणून ओळख झालेली आहे. इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात हिवाळ्यात हे श्रीमंत पिक घेतल जात… दिवसेंदिवस या भागात देशभरातून आणि जगभरातून पर्यटकांचा ओढा वाढतो आहे. त्या पर्यटकांना महाराष्ट्र कळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने या वर्षी पासून या गावाला पुस्तकाचं गाव म्हणून नवी ओळख दिली. ती ओळख खुप गडद झाली असून हजारो पर्यटक या गावाकडे आकर्षित होत आहेत. नेमके हे पुस्तकांचे गाव ही काय संकल्पना हे समजावून घेण्यासाठी या गावाची प्रत्यक्ष भेट घेवून साधलेला हा संवाद …… !!

 


भिलार या गावात 4 मे 2017 या दिवसापासून महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने अनोख पुस्तकाच गाव भिलार साकारण्यात आलं … आज या पुस्तकाच्या गावामध्ये 25 घरांमध्ये वेगवेगळया साहित्य प्रकाराची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. वाचन चळवळ वाढावी, येणाऱ्या पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी म्हणून मराठी भाषेतील नवे-जुने लेखन, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य आणि इतिहास याचे प्रत्येक घरात वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची दालन उभी केली आहेत. निवडलेल्या 25 घरांवर विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात आली आहेत. चित्राच्या संगतीनुसार त्या घरात वाचकाला साहित्य उपलब्ध होते. ज्या घरांच्या भिंतीवर निसर्ग चित्र काढण्यात आली आहेत, त्या घरात निसर्ग चित्रण अथवा प्रवास वर्णनपर साहित्य ठेवण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्र रेखाटलेल्या घरात ऐतिहासिक साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. संतांची चित्र काढलेल्या घरामध्ये संतवाड;मय व अध्यात्मिक पुस्तकांची भेट वाचकांना होते. अशा प्रकारे केवळ चित्रांवरुन पर्यटकाला त्या घरात कोणते साहित्य वाचनाला उपलब्ध आहे, याची माहिती मिळते.

केवळ एक सरकारी वाचनालय उभारण्यापेक्षा या प्रकल्पात स्थानिकांना जास्तीत जास्त सहभागी करण्यात आले आहे. पंचवीस घरात वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्याच्या आवडीप्रमाणे वाचन करता येते. जवळपास पंधरा हजार मराठी पुस्तके या गावात ठेवण्यात आली आहेत. आणि त्यात दिवसेंदिवस भर पडते आहे.

पुस्तकांचे गाव प्रकल्पासाठी निवडलेल्या घरांची व ठिकाणांची नावे :हिलरेंज हायस्कूल-बालसाहित्य, बाळासाहेब भिलारे- कादंबरी, अनमोल्स ईन, राहूल भिलारे- महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा व संस्कृती, शिवसागर, सुभाष भिलारे- विज्ञान, श्री हनुमान मंदिर-नियतकालिके व साहित्यिक माहिती फलक (प्रदर्शन), साई व्हॅली पॅलेस, विजय भिलारे- इतिहास, साई, मंदा भिलारे क्रीडा व विविध लोकप्रिय, गणपत भिलारे- दिवाळी अंक, कृषी कांचन, शशिकांत भिलारे-चरित्रे व आत्मचरित्रे, बोलकी पुस्तके, विशाल भिलारे- वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मंगलतारा, प्रशांत भिलारे- छत्रपती शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले, दत्तात्रय भिलारे- परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास, प्रवीण भिलारे-कथा, अनिल भिलारे-स्त्री साहित्य, नारायण वाडकर- लोकसाहित्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-बालसाहित्य, सुहास काळे-ललित गद्य व वैचारिक, श्रीराम मंदिर साहित्यिक (प्रदर्शन) आणि भाषीक व साहित्यिक खेळ, संतोष सावंत- विनोदी, जिव्हाळा, आकाश भिलारे-विविध लोकप्रिय व पुरस्कार विजेते, गणपत पारठे-विविध कलांविषयक, मयूर रिसॉर्ट, अजय मोरे-निसर्ग, पर्यटन आणि पर्यावरण, श्री जननीमाता मंदिर, संत साहित्य, श्री जननीमाता मंदिर (श्री गणपती मंदिरा जवळ)- साहित्यिक माहितीफलक (प्रदर्शन) आणि गिरीजा रिसॉर्ट- कविता.

पुस्तकांचे गाव विषयी प्रत्यक्ष भेट घेवून साधलेला हा संवाद

शैलेंद्र तिवारी, पर्यटक, मुंबई : देशात पुस्तकाचं गाव होण्याचा बहुमान भिलारला मिळाला हे मला समजलं. मी येथे आलो अनेक घरांना भेटी देवून पुस्तके वाचली. पर्यटकांनी जास्तीत जास्त या गावाला भेट देवून पुस्तक वाचनाचा आनंद घ्यावा.
सुप्रिया रांजणे, पयर्टक, सातारा : मी भिलार या गावाला भेट देण्यासाठी सातारहून आली आहे. शासनाने राबविलेला हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. येथे आल्यानंतर चांगल्या पद्धतीची पुस्तके वाचयला मिळाली. मोबाईल, टीव्हीच्या विश्वात हा एक चांगला उपक्रम आहे. पुढच्या वेळेस कुटुंबासह या गावाला भेट देईन.

हेमलता वाघ, पर्यटक, इंदोर, मध्य प्रदेश : शासनाने हा राबविलेला उपक्रम छान आहे. येथे वेगवेगळे पुस्तके वाचून मला आनंद मिळत आहे. या गावामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पर्यटक येत आहेत, मी शासनाची आभारी आहे.
अश्विनी, मुंबई पर्यटक: मी पर्यटनासाठी विविध ठिकाणी गेले, असे पुस्तकावे गाव कुठेही पाहिले नाही. येथील पुस्तके पाहुन वेगळाच आनंद झाला. शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आणि आगळा वेगळा आहे.

स्वाती बर्गे, शिक्षक, हिलरेंज हायस्कूल, भिलार : भिलार हे पुस्तकाचं गाव झाल्यापासून या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच शैक्षणिक सहलीही येत आहेत. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. मुलांना खुप पुस्तके वाचायला मिळत आहे.त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडत आहे.
यश धनवडे, विद्यार्थी : रेग्युलर अभ्यासाव्यतिरिक्त मला येथे कथा, बाल साहित्य, इतिहास असे अनेक पुस्तके वाचायला मिळाली. या वाचनातून मला शिकायला मिळाले. शासनाने येथे चांगली पुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत.

राहूल भिलारे, हॉटेल व्यावसायीक : माझ्या हॉटेलमध्ये महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा व संस्कृती विषयक पुस्तके ठेवण्यात आली आहेत. भिलार पुस्तकाच गाव झाल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. या गावाचे परिवर्तन झाले. स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे गाव आता पुस्तकाचं गाव म्हणून नावा रुपाला येत आहेत. गावात 25 ठिकाणी विविध प्रकारची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. पर्यटक येतात पुस्तके वाचून जातात याचा आनंद वाटतो. हे गाव जगाच्या नकाशावर आले. पर्यटनाला चालना मिळेल व भविष्यात याचा फायदा होईल.

शशिकांत भिलारे ग्रामस्थ : माझ्या घरात चरित्र आणि आत्मचिरत्र या विषयांवरील पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या पुस्तकाच्या गावातील मी एक घटक आहे. दर आठवड्याला 300 ते 400 पर्यटकांबरोबर शैक्षणिक सहलीही या गावाला भेट देत आहेत. आत्तापर्यंत 20 हजार पर्यटकांनी या पुस्तकाच्या गावात येवून पुस्तक वाचणाचा आनंद घेतला आहे.

सरस्वती भिलारे : माझ्या घरामध्ये शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले या विषांवरील पुस्तके ठेवण्यात आली आहेत. आमच्याकडे भरपूर पर्यटक येतात. बरेच पुस्तके वाचतात.

भिकु भिलारे : माझ्या घरामध्ये परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास या विषयावर पुस्तके ठेवण्यात आली आहेत. आमच्या गावामध्ये ज्ञानाची गंगा आली आहे. गावामध्ये पुस्तक प्रेमी, पीएचडी करणारे विद्यार्थी येत आहेत. त्यांना दुर्मिळ पुस्तके वाचायला मिळत आहेत. आमच गाव पुस्तकांचे गाव झालं याचा अभिमान वाटतो.


प्रविण भिलारे : माझ्या घरामध्ये कथा साहित्य ठेवण्यात आले आहे. शनिशिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत तसेच माझ्या घरालाही दरवाजा नाही. पुस्तक वाचण्यासाठी माझे घर पर्यटकांसाठी 24 तास खुले केले आहे. या गावाची स्ट्रोबेरी बरोबर पुस्तकाच गाव अशी ओळख निर्माण झाली आहे. कृपया वाचकांनी गरजेनुसार पंखा व दिव्यांचा वापर करावा हे घर आपलेच आहे, अशा प्रकारची सूचनाही माझ्या घरात लिहली आहे.

वंदना भिलारे, सरपंच, भिलार : मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या कल्पनेतून पुस्तकांच गाव साकारलं आहे. त्यांनी आमच्या गावाची निवड केली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते. माझ्या सरपंच काळात हे काम झाले त्याबद्दल मी आनंदी आहे. आमचं छोटस गाव आज नवारुपाला आलं आहे. या कामात आनंदी व समाधानी आहे. या उपक्रमास गावानेही चांगली साथ दिली. या उपक्रमासाठी 3 एकर जागाही दिली आहे.

Sharad Pawar in Bhilar Village

पुस्तकं आयुष्याला वळण देतात…. अनुभव, विचार, ज्ञान बळकट करतात…. शासनाचा पुढकार आणि गावकऱ्यांचा सहभाग याचं उत्तम उदाहरण असणार पुस्तकांचे गाव भिलार हा अभिवन उपक्रम आहे.

पुस्तकांचे गाव:काय आहे पुस्तकांच्या गावात…

 25 घरात 15 हजार पुस्तकांचा खजिना.
 पर्यटकांच्या आवडीनुसार वाचनासाठी साहित्य उपलब्ध.
 चित्रांच्या संगतीनुसार पुस्तकांची मांडणी.
 गावात कथाकथन अन् कविता वाचनाचे आयोजन.
 पर्यटकांच्या भेटीला नामवंत लेखक-प्रकाशक.
 अंधांसाठी इ-बुकची उपलब्धता.
 पर्यटकांच्या साक्षीने नव्या कादंबऱ्यांचे प्रकाशन सोहळे

माहिती साभार: युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी,सातारा

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

सातारची कन्या कश्‍मिरा पवार पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार….!

Pune Mumbai Hyperloop: Virgin Hyperloop Signs Contract with Maharashtra Government To Cut Down 140 km Travel Time To Only 25 Mins

पानिपत तिसरे युद्ध माहिती, पानिपत लढाई, मराठा साम्राज्य, सदाशिवरावभाऊ पेशवे, पानिपत युद्ध मराठी, अहमद शाह अब्दाली, बाजीराव पेशवे

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.