दिल्लीमध्ये उद्यापासून रंगणार “छत्रपती शिवराय महोत्सव” ?

0
दिल्लीमध्ये उद्यापासून रंगणार “छत्रपती शिवराय महोत्सव” ?

नवी दिल्ली : छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी इतिहासाची ओळख करुन देणारा एक अनोखा महोत्सव राजधानी दिल्लीत उद्यापासून (रविवार) सुरु होत आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात शिवरायांच्या जीवनातले प्रेरणादायी प्रसंग चित्राद्वारे उभे करण्यात आले आहेत.

एकूण 120 हून अधिक भव्य तैलचित्रं या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. 8 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या काळात दिल्लीकरांसाठी हे प्रदर्शन खुलं असणार आहे. छत्रपती शिवराय महोत्सवाच्या निमित्तानं इंदिरा गांधी राष्ट्रीय कलाकेंद्राचं अवघं वातावरण शिवमय झालं आहे.

केंद्राच्या प्रवेशद्वारातच प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारलेला भव्य पुतळा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बनला आहे. विशेष म्हणजे अरबी समुद्रात शिवरायांच्या स्मारकासाठी जो पुतळा निवडण्यात आला आहे, त्याच पुतळ्याची ही हुबेहूब प्रतिकृती आहे.

श्रीकांत आणि गौतम चौगुले या पितापुत्रांनी साकारलेली तैलचित्रं या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. चित्रांसोबतच महाराष्ट्राच्या विविध लोककलाही इथे सादर केल्या जाणार आहेत. शिवाय मराठी खाद्यसंस्कृतीचा अनुभवही दिल्लीकरांना घेता येणार आहे. आमची दिल्ली प्रतिष्ठाननं या अनोख्या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे.

Source: ABP Majha

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.