तुज सगुण म्हणू की निर्गुण रे: श्रद्धा आणि विज्ञान यांचा अनोखा संगम

0
तुज सगुण म्हणू की निर्गुण रे: श्रद्धा आणि विज्ञान यांचा अनोखा संगम

तुज सगुण म्हणू की निर्गुण रे : ज्ञानेश्वर अभंग

संध्याकाळची दिवेलागणीची वेळ. माधवराव जोशींच्या टुमदार बंगल्यात दिवाणखान्यात असणाऱ्या होमथिएटरवर श्री ज्ञानेश्वर महाराजांचा बाबूजींनी म्हणजेच सुधीर फडके यांनी संगीतबद्ध करून स्वतःच्या भावपूर्ण आवाजात गायलेला ‘तुज सगुण म्हणू की निर्गुण रे’ हा अभंग मंद आवाजात सुरू होता. संध्याकाळी देवघरात देवासमोर दिवा लावून शुभंकरोती म्हणायचं, देवाला साष्टांग दंडवत घालायचा मग झोपाळ्यावर बसून रामरक्षा, मारुतीस्तोत्र इत्यादी नित्यपाठ म्हणायचा आणि नंतर एखादा अभंग शांतचित्ताने ऐकायचा आणि त्यावर थोडं चिंतन करायचं असा माधवरावांच्या परिपाठ होता. ‘स्वस्तिक’ उद्योगसमूहाची धुरा पुढच्या पिढीच्या सशक्त हातांमध्ये सोपवून माधवराव निवृत्त झाले होते.  निवृत्त झाल्यावरच नाही तर काम करत असताना सुद्धा शक्यतो हा परिपाठ त्यांचा चुकत नसे.  त्यांच्या वेळापत्रकात संध्याकाळचा सात ते साडेसात हा वेळ ‘मीटिंग विथ व्हीव्हीआयपी स्टेकहोल्डर” म्हणजे ‘सर्वात महत्वाच्या गुंतवणूकदाराबरोबर बैठक’ या मथळ्याखाली व्यस्त म्हणून दररोज आरक्षित करायला माधवरावांनी त्यांच्या सेक्रेटरीला सांगितलं होतं.  आणि शक्यतो इतर सगळ्या मीटिंगची वेळ ती वेळ सोडून ठरवायची अशी सूचनाही दिली होती. एकदा सेक्रेटरीने असं का करता असं  विचारता ते म्हणाले होते, “देव माझा सर्वात महत्वाचा भागीदार, गुंतवणूकदार आहे कारण माझ्या शरीरापासून ते मला मिळणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा तो दाता आहे ही माझ्या मनातली स्पष्ट भावना आहे. पण विज्ञानवादी आणि आधुनिक म्हणवणाऱ्या सुटाबुटातल्या प्रत्येकाला कार्यालयात असलो तरी त्यावेळात मी रामरक्षा म्हणतो हे सांगितलं तर हिंदूधर्मातल्या देवभोळेपणावर माझ्याशी वाद घालण्यात वेळ घालवतील तो माझ्याकडे नाही. आणि भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्ट मानसशास्त्र, शरीरशास्त्र या चाचण्यांवर घासून पुसून सांगितली आहे हे सत्य तथाकथीत उच्चविद्याविभूषितांना पचायला जड जातं हे माहीत असल्यामुळे त्यांना रुचेल त्या भाषेत  ‘मीटिंग विथ मेजर स्टेकहोल्डर’ असं म्हटलं  की त्यांनाही ती भाषा कळते, वाद टळतो, आणि माझा मला वेळही मिळतो. आणि गम्मत म्हणजे आपल्या दुबईमधल्या शेख पार्टनरच्या दिवसातल्या पाच नामाझच्या वेळा मान्य करून त्याप्रमाणे मीटिंगची वेळ ठरवणाऱ्या माझ्या देशबांधवांना माझा रामरक्षेचा वेळ हा वेडगळपणा वाटतो हे अधिक आश्चर्य आहे आणि शोकांतिका आहे. पण तो त्यांचा प्रश्न आहे. मला जे पटतं ते आचारण्याचा मला पूर्ण अधिकार आहे म्हणून मी अस केलं आहे”

आपलं ते न सोडता आधुनिकता जोपासणं, उत्तमतेची कास धरणं. विज्ञानवादी असणं आणि म्हणूनच आपल्या रूढी आणि परंपरा यांना आंधळेपणाने, अंधश्रद्धेने मान्य न करता त्याच्या खोलात शिरणं आणि आपल्या प्रथांचा शास्त्री पंडितांच्या सहाय्याने मागोवा घेऊन त्यातलं विज्ञान शोधून काढणं आणि त्याचा अनुभव घेऊन मगच ती प्रथा जीवनात आचरणं अशी माधवरावांची मनोभूमिका होती आणि याच मनोभूमिकेतून त्यांनी हा संध्याकाळचा परिपाठ अमलात आणला होता.  आणि म्हणूनच घरच्याही सर्वांना ते तो पटवून देऊ शकत होते आणि पुढच्या पिढीनेही डोळसपणे ही परंपरा पुढे सुरू ठेवली होती.

माधवरावांच्या धाकटा नातू शंतनू मात्र थोडा बंडखोर होता. त्याला आजोबांचं तत्वज्ञान पटे पण आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर तो बारीक बारीक गोष्टीत माधवरावांशी हुज्जत घालत असे. स्वतः भौतिकशास्त्र विषयात एम एस्सी करत असल्यामुळे घरच्यांच्या मते तो हल्ली अतीच किचकटपणा करायला लागला होता. आणि त्यात ‘ह्यांचा’ म्हणजे त्याच्या आजोबांचा त्याला पाठिंबा असल्यामुळे तो अधिकच शेफरलाय, आगाऊ झालाय असं त्याच्या आजीचंही मत होतं. ‘आमचे हे म्हणजे केसाचा सुद्धा किस पाडतील विज्ञानाच्या कसोटीवर, आणि अजिबात ऐकायचे नाहीत कोणाचं एकदा काही पटलं की!!  आणि शंतनू अगदी आजोबांच्या वळणावर गेलाय किचकट कुठला!” असं तिचं ठाम मत होतं.  माधवराव मात्र त्याच्याशी त्याच्या मनोभूमिकेत जाऊन चर्चा करीत आणि त्याच्या प्रश्न विचारण्याला खतपाणी देत. ‘वादे वादे जायते तत्वबोध:” या वचनावर त्यांचा विश्वास असल्यामुळे हुज्जत घालून काही सकारात्मक विचारांचा परिपाक निघत असेल तर ते त्याचं स्वागतच करीत.

त्या दिवशी शंतनू घरात शिरला आणि कानावर माऊली ज्ञानोबांचा अभंग कानी पडला. त्याच्यातला भौतिकशास्त्रज्ञ जागा झाला. सुरू असलेल्या  ‘तुज सगुण म्हणू की निर्गुण रे’ या अभंगावर माधवरावांना म्हणाला, “आजोबा, तुम्ही म्हणता की ज्ञानेश्वर महाराज हे आत्मज्ञानी आणि अत्यंत बुद्धिमान संत होते मग देवाला सगुण म्हणायचं की निर्गुण असा प्रश्न पडून स्वतः इतके कन्फ्युज कसे झाले आणि मग पळवाट म्हणून ‘सगुण निर्गुण एकू गोविंदू रे’ असं काहीतरी गुळमुळीत उत्तर दिलं.  त्यांनापण देव नक्की कसा आहे हे उत्तर मिळालं नाही बहुतेक. तुम्ही सांगा देव नक्की सगुण की निर्गुण ?”

जो प्रश्न ज्ञानेश्वर महाराजांना सुटला नाही तो प्रश्न आता आजोबा कसा सोडवणार आणि आजोबांनी उत्तर दिलं नाही तर त्यांना कोंडीत पकडता येणार या कल्पनेने शांतनूच्या चेहऱ्यावर अपेक्षित विजयचं हसू तरळलं होतं.

शंतनूच्या प्रश्नावर माधवरावांनी स्मित केलं. ते म्हणाले “ज्ञानाचा देव, ज्ञानियांचा देव म्हणजे ज्ञानदेव माऊली. ते कन्फ्युज कसे असतील बाळा?  ज्या महानुभावाने सोळाव्या वर्षी श्रीमदभगवदगीतेचा अर्थ इतक्या रसाळपणे सर्वसामान्यांना समजावला ते आपला अभंग रचताना कन्फ्युज कसे असतील?  अरे एका चरणात प्रश्न उपस्थित करायचा आणि दुसऱ्या चरणात त्याचं उत्तर द्यायचं ही एक काव्यपद्धती आहे. म्हणून पहिल्या चरणात त्यांनी प्रश्न विचारला आहे की हे देवा तुला मी सगुण म्हणू की निर्गुण ? आणि दुसऱ्या चरणात उत्तर दिलं आहे की त्या एकाच गोविंदाच्या सगुण आणि निर्गुण या दोन बाजू आहेत आणि सगुण आणि निर्गुण शेवटी एकच आहेत. इतकच म्हणून ते थांबत नाहीत. ते म्हणतात ‘अनुमाने ना अनुमाने ना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे’ म्हणजे तो गोविंद अजून कोणाला जसा आहे तसा कळलेलाच नाही. श्रुतिशास्त्रांनी खूप उहापोह करून न इति,न इति म्हणत त्या परमेश्वराचं ते वर्णन करू शकले नाहीत. पण ज्ञानोबा माऊलींसारख्या आत्मज्ञानी अवतारी योग्याला  प्रकृतीच्या पलीकडे असलेलं आणि केवल अस्तित्वाने असलेलं ते स्वसंवेद्य रूप जाणवलं त्यालाच त्यांनी  गोविंदू म्हटलं आणि अर्थात अंतिम सत्य तेच असल्याचं त्यांनी या अभंगात सांगितलं आहे.”

शंतनू थोडा गोंधळला आणि म्हणाला, “ते पुरुष प्रकृतीवगैरे जड शब्द फेकून आम्हाला बोल्ड करतात तुमच्यासारखी अध्यात्मिक मंडळी. वैज्ञानिक भाषेत हे पटवा मग खर! “

माधवराव पुन्हा मंद हसले. अशी आव्हानं पेलायला ते सदैव तयार असत. ते शंतनूला म्हणाले “मी काही प्रश्न विचारतो त्याची उत्तरं दे.” शंतनू मानेनेच हो म्हणाला. माधवराव म्हणाले, “ही सृष्टी वेगवेगळ्या मुलद्रव्यांनी आणि त्यांच्या संयुगांनी बनलेली आहे हे मान्य?” शंतनूने होकारार्थी मान डोलावली. “मग त्या मूलद्रव्याच्या मुळाशी अणू आहे हे मान्य ? ” पुन्हा शंतनूचा होकार. “अणू इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्राने बनला आहे ?” शंतनूचा होकार. या अणुकेंद्राचे पुन्हा प्रोटॉन व नुट्रॉन असे भाग असतात ?” शंतनूचा पुनश्च होकार. “असं करत वैज्ञानिक सृष्टीच्या मुलकणांना शोधत शोधत कुठपर्यंत पोहोचले आहेत ?” “आधी क्वार्क्स आणि आता तर हिग्स बोझॉन या कणापर्यंत. आणि हाच कण इतर सगळ्या मुलकणांना शक्ती देतो असा वैज्ञानिकांचा सिद्धांत आहे.  ” शंतनूचं उत्तर. “पण मग हिग्स बोझॉन कणांना शक्ती कोण देत?” मधवरावांचा पुढचा प्रश्न. “अहो आजोबा, वैज्ञानिकांना तेच तर कळत नाहीये कारण हिग्स फिल्ड नावाचं सर्व सृष्टीला व्यापून राहिलेलं एक तत्व त्या तत्वाच्या आधाराने हा हिग्स बोझॉन इतर मूलकणांना शक्ती देतो असा एक सिद्धांत सध्या मांडला जातोय पण त्या हिगग्स फिल्डच्या सर्व गुणधर्मांच स्पष्टीकरण भौतिकशास्त्राच्या आणि ऊर्जेच्या संवर्धनाच्या  कक्षांमध्ये राहून देता येत नाहीये. कणांचे म्हणजे मॅटरचं आणि लहरींचे म्हणजे ऊर्जेचं एकमेकांमधील स्थित्यंतर आणि ती प्रक्रिया नक्की काय होते हेच कोडं आहे अजून.” शंतनूचं स्पष्टीकरण. “म्हणजे सृष्टीच्या निर्मितीमागे सर्वव्यापक काहीतरी आहे आणि मॅटर आणि एनर्जी मधील सीमारेषा एका विशिष्ट पातळीवर पुसट होते आणि सर्व सृष्टी एकात्म पद्धतीने अस्तित्वात आहे असंच वैज्ञानिक निष्कर्ष काढतायत ना ?” माधवरावांनी शंतनूच स्पष्टीकरण संक्षिप्त रुपात मांडलं. “हो असं म्हणता येईल”. शंतनू उत्तरला. ” मग असं बघ की मॅटर ला सगुण आणि एनर्जीला निर्गुण संबोधता येईल का ?” माधवरावांचा प्रश्न. “होय असं म्हणता येईल” शंतनूचं उत्तर. “मग ज्याला वैज्ञानिक ‘हिगग्स फिल्ड’ असं म्हणतायत त्याला एक क्षण ‘गोविंद’ असं म्हटलं तर सध्या वैज्ञानिकांची अवस्था ‘तुज सगुण म्हणू की निर्गुण रे , सगुण निर्गुण एकू गोविंदू रे अशीच झाली आहे असं नाही का म्हणता येणार?” हे ऐकलं आणि आजोबांना काय म्हणायचं आहे ते शंतनूच्या लक्षात आलं. आणि त्याला खुण पटली. आपला आजोबांना चित करायचा मनसुबा आजोबांनी पुरता उधळला आहे हे त्याच्या लक्षात आलं.  माधवराव  पुढे म्हणाले ,”तसंही तीनपेक्षा अधिक मिती आहेत आणि स्ट्रिंग थिअरीच्या आधारे त्रिमितीय भौतिकाच्या पालिकडलं जग शोधण्याचाही वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत हेही खरं आहे ना ?” शंतनूचा मूक होकार आला.” मग वैज्ञानिक ज्याचा अजून शोध घेतायत ते ज्ञानोबामाऊलींना जाणवलं नसेल त्यांनी ते अनुभवलं नसेल कशावरून? ज्ञानोबांनी ओव्यात, अभंगात जे मांडलं, वर्णन केलं ते बरचसं वैज्ञानिकांच्या निष्कर्षाशी जुळत असेल तर त्याच्याही पुढचं जे माउलींनी पाहून अनुभवून वर्णन करून ठेवलं आहे त्याचा शोध वैज्ञानिकांना लागेपर्यंत ज्ञानोबामाऊलींच्या वचनांच  आपल्या शास्त्रात सांगीतल्याप्रमाणे शब्दप्रमाण मानायला काय हरकत आहे? तो पर्यंत विज्ञानाला आणि वैज्ञानिकाना देऊ की आपण वेळ तेवढा! ” माधवरावांच्या या बिनतोड स्पष्टीकरणापुढे शंतनू एवढंच म्हणाला, “पुन्हा एकदा अभंग लावा तो ! जरा ऐकतो तरी नीट तुमच्या ज्ञानोबा माऊली काय म्हणतं आहेत ते !!”. “आमची ज्ञानोबा माऊली का ? मिया गिरे फिरभी टांग उपर. ठीक आहे माझी म्हणून का होईना ज्ञानोबांना ऐकायची इच्छा झाली यातच तू कधीतरी सुधारशील याची मला खात्री पटली”. माधवरावांच्या या वक्तव्यावर आजोबा आणि नातू दोघेही खळखळून हसले आणि त्या एकू गोविंदूला समजून घ्यायला सज्ज झाले.

लेखक: राजेंद्र वैशंपायन
+91 93232 27277
rajendra.vaishampayan@gmail.com

©PuneriSpeaks

अशाच नवनवीन अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.