डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी: पहिल्या भारतीय महिला डॉक्टर, First Indian Lady Doctor Anandibai Gopalrao Joshi

1
डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी: पहिल्या भारतीय महिला डॉक्टर, First Indian Lady Doctor Anandibai Gopalrao Joshi

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी | Anandibai Gopalrao Joshi (मार्च ३१, इ.स. १८६५- फेब्रुवारी २६, इ.स. १८८७) या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर (First Indian Lady Doctor) होत्या.

First Indian Lady Doctor Anandibai Gopalrao Joshi

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी बालपण

आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुणे येथे झाला. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणार्यास गणपतराव अमृतेश्वर जोशी यांची त्या ज्येष्ठ कन्या.

वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठे असणार्‍या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपालरावांनी आपल्या पत्नीेचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४ व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परन्तु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ दहाच दिवस जगू शकला. हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली.

गोपाळराव स्वतः लोकहितवादी ची शतपत्रे वाचत. आपल्या पत्नीसला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले होते. लोकहितवादीच्या शतपत्रातून ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीभस इंग्रजी शिकविण्याचा निश्चय केला. गोपाळराव पोस्ट ऑफिसात कारकून होते. गोपाळराव यांची नोकरी निमीत्त बदली होत असे. कोल्हापूर, मुंबई, भुज, कोलकता, बराकपूर, श्रीरामपूर (बंगालमधलं) इथे प्रत्येक ठिकाणी गोपाळरावांबरोबर आनंदीबाई जात राहिल्या आणि गोपाळराव तिला शिकवीत राहिले.

कोल्हापूरमध्ये मिशनऱ्यांशी ओळख वाढल्यावर तिथे प्रथम गोपाळरावांच्या मनात आलं की आनंदीला अमेरिकेला पाठवून तिचं शिक्षण करावं. त्या वेळी गोपाळरावांनाही अमेरिकेला जायची इच्छा होती, परंतु ते काही जमू शकलं नाही. आनंदी बुद्धिमान. तिनं इंग्रजी भाषा व अन्य विषय पटकन आत्मसात केले. आनंदीला अमेरिकेला शिकायला जाण्यासाठी पैशांची तरतूद आवश्यक होती. ती करण्यात, तिला जायला सोबत शोधण्यात २-४ वर्षे गेली. भारतात बदलीच्या ठिकाणी आनंदीबाईना समाजाचे, शेजाऱ्या-पाजाऱ्यांचे विपरीत अनुभव आले. त्या गोपाळरावांबरोबर फिरायला जातात. इंग्रजी शिक्षण घेतात. याबद्दल कुतूहल म्हणून त्या दोघांना पाहायला लोक गर्दी करीत आणि गोपाळरावांना विचारीत, ही ठेवलेली बाई का? आनंदीलाही खूप अपमानास्पद शेरे ऐकावे लागत. परंतु तिकडे दुर्लक्ष करून आनंदी आपला अभ्यास निष्ठेने करी.

श्रीरामपूर (बंगाल) येथे गोपाळरावांची नोकरी असतानाच आनंदीचं अमेरिकेला जायचं ठरलं. तिथे जाऊन वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्याकरता शिकावं ठरलं.

याआधीची घटना विस्मयकारक आहे. न्यूजर्सीमधल्या रोशेल या गावातील श्रीमती कार्पेटर या दाताच्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या. ते साल होतं १८८०. त्यांनी तिथे ‘मिशनरी रिव्हू’ नावाचं मासिक सहज चाळायला घेतलं. त्यात गोपाळराव जोशी व आर. जी. वाईल्डर यांची पत्रं छापलेली होती. त्यावरून कार्पेटरबाईंना समजलं की गोपाळ जोशी यांना आपल्या पत्नीला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवायचं आहे. आणि त्यांच्या मनात त्या अनोळखी, न पाहिलेल्या आनंदीबद्दल स्नेहभाव उत्पन्न झाला. त्याच वेळी अजून एक विस्मय वाटावा अशी घटना घडली. कार्पेटरबाईंची नऊ वर्षांची मुलगी आमी आईला म्हणाली, ‘आई, मला स्वप्न पडलं की तू हिंदुस्थानात कुणाला तरी पत्र पाठवत आहेस.’ कार्पेटरबाई चकित झाल्या. त्या गोपाळ जोशींना पत्र पाठवण्यापूर्वी नकाशात कोल्हापूर शोधत होत्या. (कारण मासिकातलं गोपाळ जोशींचं पत्र कोल्हापूरहून पाठवलेलं होतं.) तेव्हा त्यांच्या मनात इंडियातली शहरं असा विचार होता. परंतु मुलीने येऊन हिंदुस्थान हा शब्द उच्चारला हे कसं? तिला तर काहीच ठाऊक नव्हतं. याच कार्पेटरबाईने पुढे पत्रव्यवहार करून आनंदीशी आपलं नातं जोडलं. आनंदी त्यांना मावशी म्हणे. त्यांच्याच आधारावर तिने अमेरिकेत पाऊल टाकलं. या कार्पेटरबाई आनंदीला ‘आनंदाचा झरा’ म्हणत.

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी शैक्षणिक प्रवास

Dr. Anandibai Gopalrao Joshi in America

अमेरिकेला जाण्यापूर्वी श्रीरामपूर (बंगाल) इथल्या बॅप्टिस्ट कॉलेजच्या सभागृहात आनंदीबाई जोशी यांनी ‘मी अमेरिकेस का जाते?’ यावरती अस्खलित इंग्रजीत व्याख्यान दिलं. मुळातून ते भाषण वाचण्यासारखं आहे. त्यातला एक मुद्दा असा, पृथ्वीच्या पाठीवर हिदुस्थानाइतका रानटी देश दुसरा नाही. देशातील लोकांना आपल्या गरजा त्या पूर्ण करून स्वावलंबन करता येत नाहीत. वैद्यकशास्त्रज्ञ स्त्रियांची हिंदुस्थानातल्या प्रत्येक भागात अतिशय जरुरी आहे. सभ्य स्त्रिया पुरुष वैद्याकडून चिकित्सा करून घेण्यास प्रवृत्त नसतात. इथे स्त्री डॉक्टरची किती गरज आहे हे ओळखून आनंदीबाई डॉक्टरची पदवी घेण्यासाठी अमेरिकेत गेल्या. परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांना सतत संघर्ष करावा लागला. अठराव्या वर्षी १८८३ मध्ये एका अमेरिकी बाईच्या सोबतीने, एकटीने दोन महिन्यांचा बोटीने प्रवास केला. त्यात त्या शाकाहारी आणि साडी हाच पोशाख. बोटीवर त्यांची उपासमार झाली. त्या आजारी पडल्या, पण पुढेही चार वर्षे त्यांची उपासमारच झाली. भारतीय पद्धतीचं अन्न मिळालं नाही. परदेशी कपडे वापरायचे नाहीत म्हणून त्या साडी नेसून धाबळीचे जाकीट घालीत. त्यामुळे तिथली बर्फाळ थंडी त्यांचं शरीर चिरत राहिली. त्यात अभ्यास, स्वत:चा स्वयंपाक स्वत: करायचा, समाज-नातलग यांनी दिलेली दूषणं सहन करीत इच्छित कार्य करीत त्या राहत असत तिथला समाजही आनंदीशी कुत्सितपणे वागत होता. तिथेही कार्पेटरबाई आणि कॉलेजच्या प्रिन्सिपॉल इत्यादी चांगल्या स्त्रिया भेटल्या, परंतु अन्य बऱ्याच जणांनी आनंदीला त्रास दिला. बोटीवर तर पुरुषांनीही त्रास दिला आणि जिच्या सोबतीने आनंदी निघाली होती, तिचंही वागणं ठीक नव्हतं. याचा तिच्या मनावर परिणाम होत होता. तो शरीरावरही झाला. सतत अर्धपोटी राहिल्याने आजारपणं तिच्या पाठी लागली. भारतातले लोक तर म्हणत, आनंदी आता ख्रिस्ती होऊनच येईल. तर अमेरिकेतल्या तिच्या सहवासात येणाऱ्या मिशनरीज तिला ‘ख्रिस्ती हो’ असा उपदेश करीत.

स्वदेश, स्वपोशाख (नऊवारी साडी-पोलकं), स्वदेशी खाणं, पूर्णपणे महाराष्ट्रीय पद्धतीचं आचरण आनंदीचं असे. त्याचा त्यांनी कधीच त्याग केला नाही. आज जे आनंदीबाईंचं छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध केलं जातं ते म्हणजे गुजराथी पद्धतीने नेसलेली साडी आणि दागिने घातलेलं चित्र. त्याबद्दल स्वत: डॉ. आनंदीबाईंनी लिहिलं आहे की ‘इथल्या हवेत वारंवार फरक होत राहतो, नऊवारी (कासोटा घातल्याने) साडी नेसल्याने पाय थोडेसे उघडे पडतात. करिता गुजराथी पोशाख असल्याने डोक्याशिवाय सर्व शरीर झाकले जाते.’ एकूण पोशाखाबद्दल त्यांनी आपल्या पत्रात सविस्तर लिहिलं होतं.

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी भारत पुनरागमन

Dr. Anandibai Gopalrao Joshi Signature
Photo Credit’s: Wikipedia

जेव्हा आनंदीबाई भारतात परतल्या- १६ नोव्हेंबर १८८६ या दिवशी- तेव्हा मुंबई बंदरावर लोकांनी गर्दी केली. त्यांचं पुष्पवृष्टीनं स्वागत केलं. मुंबई बंदरात बोटीतून उतरण्यापूर्वीचं त्यांच्या पोशाखाचं वर्णन आहे. ‘नारायणपेठी काळी चंद्रकळा (नऊवारी), खणाची चोळी, कपाळावर कुंकू, नाकात नथ, कानात कुडी, पायात बूट व स्टॉकिंग्ज’ असा थाट होता. त्या आजारीच होत्या, परंतु हिंदुस्थानात घरी जायला मिळणार, घरचं अन्न मिळणार म्हणून त्यांची प्रकृती तात्पुरती स्थिर होती. आनंदीबाईंना अभिनंदनाच्या तारा आल्या, मानपत्रे पाठवली गेली. मानपत्रात त्यांच्या उच्च शिक्षणाचा गौरव केला गेला.

अमेरिकेच्या त्यांच्या मेडिकल कॉलेजने ११ मार्च १८८६ रोजी फिलाडेल्फियाला त्यांना ‘वैद्य विद्यापारंगत’ हा किताब दिला. त्यांच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. पंडिता रमाबाई होत्या. ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून तिची प्रशंसा केली. आनंदीबाई जोशी डॉक्टर होऊन स्वदेशी आल्या. जाताना एकटय़ा होत्या. येताना गोपाळ जोशी बरोबर होते. पण एव्हाना त्यांना क्षयाची बाधा झाली होती. बोटीवर कुणीही गोर्‍या डॉक्टरने तिला बिगर- गौरवर्णीय म्हणून उपचार केले नाही. मायदेशी पोहोचल्यानंतर समुद्रोल्लंघन करून आलेली, त्यातून स्त्री म्हणून हिंदू डॉक्टर किंवा वैद्यही तपासून पाहीनात. वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला.

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी निधन

आनंदीबाई जोशी यांचे २६ फेब्रुवारी १८८७ रोजी निधन झाले. अमेरिकेत कार्पेटर कुटूबियांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात (Grave-yard) त्यांचे लहानसे थडगे बांधले. त्यावर ‘आनंदी जोशी, एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या. परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री’ अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक केले.

हे सगळे वाचल्यावर डॉ.आनंदीबाई गोपाळराव जोशी किती थोर होत्या असंही मनात निनादत राहतं. वयाच्या केवळ अठराव्या वर्षी बोटीनं परदेशी जाणारी पहिली स्त्री, हालअपेष्टा सहन करीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी पहिली स्त्री. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री. भारतीय (महाराष्ट्रीय पोशाख) रीतिभाती, आपला शाकाहारी आहार तिथेही सांभाळणारी, तरी इंग्रजी भाषा उत्तम आत्मसात (ती तिने इथेही केली होती) करून वैद्यकीय शिक्षण प्रकृतिअस्वास्थ्य सांभाळीत पूर्ण करणारी तरुणी. या सर्वाबरोबर पती, नातेवाईक, सुहृद यांना सतत पत्र लिहून त्यांच्याशी संवाद साधणारी डॉ. आनंदीबाई यांच्यावर तिच्या समकालीन आणि लेखिका असलेल्या काशीबाई कानिटकरांनी चरित्र लिहिले आहे. त्यानंतर अंजली कीर्तने यांनी संशोधन करून नवं चरित्र लिहिलं. श्री. ज. जोशी यांनी ‘आनंदी गोपाळ’ कादंबरी लिहिली. त्याचं नाटकही रंगभूमीवर आलं.
आता झी प्रोडक्शन डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी आणि गोपाळ जोशी यांच्यावर आधारित चित्रपट तयार करीत आहे, ज्याचे नाव ‘आनंदी गोपाळ’ असे आहे.

लेखक: संजीव वेलणकर पुणे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

शिवाजी महाराज इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज माहिती, अफजलखान वध, शिवराज्याभिषेक, मराठा साम्राज्य, आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराज वंशावळ

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.