शुभांगी स्वरूप बनल्या नौदलाच्या पहिल्या पायलट

0
शुभांगी स्वरूप बनल्या नौदलाच्या पहिल्या पायलट
कन्नूर
पुरूषांचे वर्चस्व असलेल्या भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेचा पायलट म्हणून समावेश करण्यात आला आहे. शुभांगी स्वरूप असं या महिला पायलटच नाव असून त्या बरेलीच्या रहिवासी आहेत. त्यांच्याबरोबरच आणखी तीन महिलांचाही नौदलात समावेश करण्यात आला असून त्यांच्यावरही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत.

नौदलात महिलांना पायलट म्हणून घेण्यासाठी २०१५ मध्येच मंजुरी देण्यात आली होती. बुधवारी शुभांगी स्वरूप इंडियन नेव्हल अकादमीच्या पासिंग आऊट परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या. टोही विमानात पायलट म्हणून त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. ‘ही केवळ रोमांचकारी संधी नाही, तर हे जबाबदारीचं काम आहे,’ अशी प्रतिक्रिया शुभांगी यांनी दिली. विशेष म्हणजे त्यांचे वडीलही भारतीय नौदलात कमांडर आहेत.

शुभांगीसह आस्था सहगल, रूपा ए. आणि शक्तिमाया एस. यांचाही नौदलाच्या अर्मामेंट इन्स्पेक्शन ब्रँचमध्ये समावेश करण्यात आला आहे. नौदलात चार महिलांची भरती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शुभांगी यांना पी-८ आय विमान चालविण्याची संधी दिली जाऊ शकते. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. प्रशिक्षणानंतर त्या हैदराबादच्या डुंडीगल एअरफोर्स अकादमीत सहभागी होतील, असं सूत्रांनी सांगितलं. हिंदी महासागरात चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या महिला पायलटचा उपयोग होऊ शकतो. भविष्यात त्यांच्याकडे एखाद्या जहाजाचे नेतृत्व जाण्याची शक्यता असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.