खऱ्या आयुष्यातील नटरंग गणपत पाटील…..!!

0
खऱ्या आयुष्यातील नटरंग गणपत पाटील…..!!

खऱ्या आयुष्यातील नटरंग गणपत पाटील !!

चित्रपटात त्यांनी नाच्याचीच भूमिका केली पण जीव ओतून केली अन ती भूमिका त्यांच्या जीवनावर जणू अतिक्रमणच करून गेली. त्यांची मुले मोठी झाली पण कोणी सोयरिक जुळवायला तयार नव्हते कारण ‘अशा’ माणसाला मुलेबाळे कशी असतील असा प्रश्न जिथे तिथे समोर येऊ लागला. अभिनयाने पदरात विशेष काही पडले नाही मात्र आयुष्य उध्वस्त होणे म्हणजे काय हे त्यांना अनुभवास आले त्या अस्सल पण अभागी नटरंगावरची ही पोस्ट…

नेटमुशाफिरीत रवि जाधवांची मुलाखत वाचली अन त्यांच्या त्या घटनेची आठवण झाली दूरदर्शन वरील ती मुलाखत काल पाहिल्यासारखी डोळ्यापुढे तरळून गेली… त्या मुलाखतीत एक ज्येष्ठ प्रतिभावंत अभिनेते धाय मोकलून रडत होते अन मुलाखतकर्ते निवेदक स्तब्ध होऊन गेले होते. त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नांवर त्या अभिनेत्याच्या भावना अनावर झाल्या अन अश्रूंचा बांध फुटला इतकेच त्या घटनेचे महत्व नव्हते तर अभिनयाची तपस्या व्यक्तिगत आयुष्याची वीण कशी उसवत गेली एन एका कलाकाराची जिंदगानी कशी उद्धवस्त होत गेली याचे ते टोकदार उदाहरण होते.

ती घटनाच तशी होती मुलाखतीत ते रडत होते, त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगावर ते बोलत होते, “या माणसाला मुलगी कशी काय असू शकते ? शक्यच नाही, आमच्या अकलेचे दिवाळे निघालेय का जे आम्ही यांची मुलगी करू? यांच्या घरचीच तिकडून काही तरी भानगड असणार ! आम्हाला काय माहिती नाही का मुलीचे वडिल “हे”आहेत म्हणून ! यांना चालत असेल पण समाजात आम्हाला तोंड दाखवायचे आहे ! आम्हाला नाव आहे, अब्रू आहे, पत आहे अन यांच्यातच जगायचे आहे. आमचे काय यांच्यासारखे टाळी वाजवून थोडेच भागणार आहे का? लोक असंच काहीबाही बोलत रहायचे आणि लोकांच्या या प्रत्येक टोमण्यामागे माझ्या पत्नीचा भावनांचा बांध तुटत होता, ती कोलमडून गेली होती… मुलांच्या लग्नाच्या वेळेस देखील हाच अनुभव आला होता. समाजाने फार वाईट वागणूक दिली, माझ्या अभिनयाची शिक्षा बायको पोराना भोगावी लागली. ते सगळीकडे चेष्टेचा विषय झाले होते” इतके बोलून ते पुन्हा धाय मोकलून रडू लागले. बोलताना भावना अनावर झालेले ते ज्येष्ठ अभिनेते गणपत पाटील होते.

त्यांच्या ‘आत्ता गं बया’ ला दाद दिली नसेल असा मराठी रसिक विरळाच. अंगात मखमली बदाम अन त्यावर हाफ जाकीट, गळ्यात गुंडाळलेला रंगी बेरंगी रुमाल अन डोक्यावर बुट्टेदार टोपी अशा वेशातले गणपत पाटील त्यांच्या नाचाच्या भूमिकेत समरसून जायचे. या भूमिकेने त्याना मानही दिला अन प्रचंड अपमान देखील. त्यांनी साकारलेल्या भूमिकेतल्या पात्राने वास्तवातल्या गणपत पाटलांना मात दिली. खरे तर रसिक प्रेक्षकानी दिलेली ही दाद होती, पण ह्या जीवघेण्या अभिनय संपन्नतेला मिळालेली रसिकांची ही दाद त्यांचे रोजचे जिणे बेहाल करून गेली. त्यांच्या पत्नीच्या वाट्याला किती भयंकर थट्टा आली असेल कल्पना करवत नाही. पुढे जाऊन गणपत पाटील ही तृतीयपंथीयांसाठीची संज्ञा झाली. अगदी नटरंग सिनेमा येईपर्यंत ही अवस्था होती. ‘नटरंग’ आला अन मराठी सिनेमाचे व गणपत पाटलांचे पांग फेडून गेला. पण तेंव्हा गणपत पाटील नव्हते. मार्च २००८ मध्ये ते गेले. त्यांचे पात्र अन त्यांचे नाव अजरामर झाले. पण त्यांच्या व्यक्तिगत अन कौटुंबिक जीवनाला या नाच्याच्या पात्रामुळे विषण्ण कारुण्याची झाक होती. २००५ च्या झी गौरव पुरस्कारात त्यांनी व्यक्त केलेल्या भावना अन त्याचे क्लिपिंग यापासून प्रेरणा घेऊन रवी जाधव यांनी नटरंग बनवला खरा, पण तेंव्हा ते हयात असते तर त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाले असते…

गणपत पाटलांचा जन्म कोल्हापुरात एका गरीब कुटुंबातला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरता आर्थिक हातभार लावावा लागला. अशा परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका वठवली.

दरम्यान राजा गोसावी यांच्याशी पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहायकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले.

त्यासुमारास पाटलांना राजा परांजप्यांच्या ’बलिदान’ व राम गबाल्यांच्या ’वंदे मातरम्‌’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय-कारकीर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या ’मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली.

चित्रपटांबरोबरीनेच गणपत पाटील नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ’ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची – म्हणजेच ’नाच्या’ची – आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ’जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या नाच्याच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी ’वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले.

बायकी किरटया आवाजात ओरडत बोलताना उजव्या हाताची तर्जनी हनुवटीवर ठेवून अन डावा हात कमरेवर ठेवून बोलणारे अंगाला लचके द्यायचे अन अगदी ठसक्यात खुमासदार पद्धतीने तो नाच्या साकारायचे. खरे तर त्यांच्या वाट्याला आलेली अगदी नगण्य असणारी जेमतेम फुटेज असणारी ही भूमिका ते जगायचे अन ती भूमिका प्रेक्षकाच्या मनात ठसायची . प्रेक्षक देखील त्याना मनापासून दाद द्यायचे. तत्कालीन मराठी सिनेमे अन त्यातही तमाशापट यांचा धांडोळा घेताना सर्व रांगडे मराठी अभिनेते डोळ्यापुढे येतात, अरुण सरनाईक, सुर्यकांत मांढरे, कुलदीप पवार, चंद्रकांत… सांगत्ये ऐका हा त्यातला सुवर्ण पट म्हणावा लागेल. जयश्री गडकर, माया गांधी, सीमा ते उषा नाईक – उषा चव्हाण पर्यंत कोणाचेही तमाशाप्रधान चित्रपट पाहिले तर त्या सर्वांचा एकच समान धागा होता तो म्हणजे गणपत पाटील !

चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आयुष्यभर फक्त सदरा- पायजमा अशा एकाच ढगळया वेशात वावरलेला हा माणूस आपल्या शापित भूमिकेचे सोने करून गेला पण त्यांच्या वेदना जगापुढे फारशा मांडल्या गेल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या ‘रंग नटेश्वराचे’ मध्ये मात्र विस्तृतपणे या सर्व घटनांचा पट उलगडला आहे. या नटरंगाची आयुष्यभर उपेक्षा झाली होती की काय म्हणूनच प्रेक्षकांनी त्यांच्यावर निघालेल्या चित्रपटाला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला. २०१३ सालचा विशेष दिनानाथ मंगेशकर पुरस्कार त्याना मरणोत्तर जाहीर झाला होता. २००५ चा झी जीवनगौरव पुरस्कार हाच काय तो त्यांचे कौतुक सोहळा…

त्यांच्या भूमिकेचे त्यांनी सोने केले पण त्या भूमिकेने त्यांच्या आयुष्यावर मात केली. आज सहज स्मरण झाले म्हणून त्यांच्या स्मृतीना दिलेला हा उजाळा… गुणी पण अभागी गणपत पाटील या अभिनेत्यास सलाम !!

लेखं- समीर गायकवाड.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

पानिपत: द ग्रेट बिट्रेयल मध्ये सदाशिवराव भाऊंची भूमिका साकारण्यासाठी अर्जुन शिकतोय मराठी

दोन गुरू: भूक आणि अपमान Nana Patekar History नाना पाटेकर यांनी लिहिलेला त्यांच्या पुर्वायुष्यातील भावस्पर्शी अनुभव

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.