प्रेमाची शप्पथ आहे तुला | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

1
प्रेमाची शप्पथ आहे तुला | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

प्रेमाची शप्पथ आहे तुला.

पाउस पडत होता. आणि अजिंक्य एका बंद वडापावच्या गाड्यापाशी आडोशाला उभा होता. अंधार होता तिथे आणि पाउस हि लागत नव्हता. भिजलेली केस हाताने झाडत असताना. त्या पावसाच्या आवाजात आणि मातीच्या वासातही एक ओळखीचा वास आला. त्यान बघितले माग वळून. आणि हृदयाची धड-धड वाढली. कारण ती प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा जी त्याचीच होती. ओल्या केसांना गळ्यात थोड आणि थोड पाठीवर सोडून ती हातावरच पाणी रुमालाने पुसत होती. तो तिच्या माग गेला. आणि तिच्या मागेच थांबला.
अंधारामुळे तिला माहित नव्हत कि कोण तरी तिथ आधीपासून एक पुरुष आहे . नाहीतर ती अशी एकटी थांबली नसतीच. आणि हिम्मत करून अजिंक्यने प्रतीक्षाच्या हाताला धरल. आणि हा स्पर्श ओळखीचा जाणवला तिला. तीन मागे बघितल आणि एकदम विचारल अरे तू इथ काय करतोस? कसा आहेस? आणि हि काय पद्धत म्हणायची तुझी कसला आवाज नाही हाक मारली नाहीस डायरेक्ट हात पकडतोस देऊ का पोलिसांकडे? आणि तिचच ती हसायला लागली.
पाउस थांबला. दोघ एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले.
अजिंक्य बोलू लागला, का? हक्क नाही का माझा तुझ्यावर? का तो पण गमावून बसलोय मी. तु मला वचन दिल होत की मी कायम तुझीच असेन. काय झाल त्या वचनाच?
अरे गम्मत केली मी. तु का इतका चिडतोस. (प्रतीक्षा) चिडतोय का मी? हळवा झालोय. रडू येतंय मला. तेव्हा निघून गेलीयस आज दिसतीयस (अजिंक्य), काहीही हा आत्ताच भेटलो न आपण अलीकड (प्रतीक्षा), हो दोन वर्षापूर्वी, तुला मुलगी झाली तेव्हा (अजिंक्य), हा मग? (प्रतीक्षा) हा मग काय हे काय कमी आहेत का दिवस. काल परवा भेटल्यासारख बोलातीयस दोन तीन वर्षापूर्वी भेटलो म्हणून. (अजिंक्य)

बर मी निघू का? हे आले आहेत मुलीला खाऊ आणायला गेलेत. तुला आणि मला अस बघितल तर भलताच शक घेतील (प्रतीक्षा), वा… म्हणजे तुझा नवरा शक घेतो आणि तु त्याला घाबरून राहतेस? मी काय वाईट होतो का मग? (अजिंक्य), तुही तेच करायचास आणि म्हणूनच मी तुझ्यापासून लांब गेले. आठव काय बोलला होतास त्या दिवशी किती रडवलस मला त्या एका कॅडबरी वरून… कुणी दिली? का दिली? तू का घेतली? का खाल्ली? नको नको ते पुढच बोललास, आठवतय ना? (प्रतीक्षा), हो… पण (अजिंक्य)
पण काय? तुझ्या त्या वागण्यान मी तुझ्यावरचा विश्वास गमावून बसले. तू नंतर हि असाच वागशील माझ्याशी म्हणून तुला भेटले नाही. आणि तुही आला नाहीस माझ्याकडे. काय समजायचं मी. झाली भांडण ठीक आहेत. मोठ कारण नव्हत. पण तु साध एकदा समजवायला पण आला नाहीस किती कठोर मनाचा आहेस तू यार (प्रतीक्षा), मी यायचो रोज, पण मला तू दिसायचीच नाहीस (अजिंक्य), हो.. मी गावी साताऱ्याला गेलेले. तु अस वागलास. काय करायचं होत मी इथ थांबून बोल? ज्या गालावर तू कीस करून करून माझा गाल ओला करायचास त्या गालावर तू तुज्या हाताचे ठसे उठवलेस. तरी त्यातून मी तुला माफ केल. पण तुझा राग. शांत झाला का सांग मला तु? तुझ्या पायी मी लग्नाला हो बोलले. तुझ कशात काही नाही म्हणून तुला साथ देऊन आपण लग्न दोन तीन वर्ष जरा उशिरा करू अस मी ठरवलेलं. उशीर कितीही झाला लग्नाला तरी मी तुझी होनार होते. त्यामुळे वय चाललेलं माझ त्याचा मला फरक पडत नव्हता. पण तुला काहीच वाटल नाही होणा? (प्रतीक्षा), मला तुझ्याशी एकदा सगळ बोलायचं आहे. प्लीज एकदा माझ्या घरी येशील ? (अजिंक्य), हे बघ अजिंक्य, तो हक्क तू गमावला आहेस. आता माझ्यावर, माझ्या शरीरावर आता माझ्या नवऱ्याचा हक्क आहे. तो तु नाही घेऊ शकत. मी भेटू शकते तुला. पण ते काहीच नाही करू शकत (प्रतीक्षा).

तिचा हात घट्ट पकडून तिला अंधारात जवळ ओढताना अजिंक्यला भान येत आणि कळत पाउस तर सुरूच आहे. प्रतीक्षाला हि तेच जाणवत. ती हात सोडवत बोलते मी जाते नाहीतर हे येतील.
अजिंक्य तिला जवळ ओढतो. आणि मिठीत घेणार तोच ती त्याला धक्का देते. त्याला कस तरी होत. तो काही बोलणार तोच ती बोलते, मी येते तुला भेटायला उद्या, दुपारी, एकटीच येईन. पण पुन्हा येईन कधी अशी अपेक्षा ठेवू नकोस. कारण तू मला तुझी तेव्हा सवय लावलीस आणि सोडून गेलास. आता मला पुन्हा तुझी सवय लाऊन घ्यायची नाही. मी आनंदी आहे माझ्या संसारात (प्रतीक्षा). अस बोलू नकोस, तुला आपल्या प्रेमाची शप्पथ आहे. मला तुझी गरज आहे (अजिंक्य). मला होती तेव्हा कुठे होतास तु? सांग मला? नाहीत अजिंक्य तुझ्याकड माझ्या प्रश्नांची उत्तर…. सोड जाते मी, उद्या भेटू. ती माघारी फिरते आणि न राहून अजिंक्य तिला अंधारात मागून पकडून मिठीत ओढतो. दोघांची अंग गरम होतात. पण ती मिठी सोडून पावसात भिजत जाते. आणि अजिंक्य उभा राहतो तिला पाठमोर जाताना बघत…..

भाग २

प्रेमाची शप्पथ आहे तुला.

उगीच कोणी कुणासाठी काहीच करत नाही. समाजात आपण राहतो. हा समाज आपल्याला चांगल बोलतो म्हणून सबंध हा समाज चांगला आहे अस होत नाही. काही वेळा आपण फसलो जातो त्यांच्या शब्दात किंवा आपणच धोका आहे दिसत असतानाही फसवून घेत राहतो स्वतःला. काहीस असच होत न आपल प्रेमात? म्हणजे प्रेम हे खोट आहे. क्षुल्लक आहे. आपल्याला कोणी तरी प्रेमात फसवणारे किंवा आपण यात फसलो जाणार आहे हे माहित असताना पण आपण प्रेम करतो. मग मला सांगा प्रेमात हरताना चूक कुणाची असते आपली? का पुढच्या व्यक्तीची?

काहीस असच झाल. काहीश्या गैरसमजामुळ अजिंक्य आणि प्रतीक्षाच प्रेम कुठल्या कुठ मनाच्या एका कोपऱ्यात जाऊन लपल. त्या लपलेल्या प्रेमाला अचानक जाग आली तिला काल रात्री पावसात आडोश्याला बघून. अजिंक्य प्रतीक्षा भेटले दोन वर्षांनी. आणि दोघांनी आज अजिंक्यच्या घरी भेटायचं ठरवलं. वेळ होत आली. वेळ होऊन गेली तरी ती आली नाही.

दोष त्याचा नाही. दोष तिचा नाही. दोष नशिबाचा हि म्हणता येणार नाही. काय करणार ती? स्वतःचा संसार आणि त्यात असलेले तिचे आई-बाबा, नवरा, मुलगी यांना काहीं न सांगता, घरातली सगळी काम सोडून ती त्याच्याकड जाऊ शकत नव्हती. तिला माहित होत. इतक्या वर्षाची मनातली सगळी व्यथा तो फक्त बोलून दूर करेल? शक्यच नाही. शरीराचा संबंध येईलच. पण मी सावरेन स्वताला. तो जवळ आला तरी त्याला जाणीव करून देईन माझ्यावर हक्क नवऱ्याचा आहे त्याचा नाही. अशा विचारात प्रतीक्षा होती. आणि इकड वेळ निघून जात होता तसा अजिंक्यच्या अंगातल अवसान निघून जात होत. वेळ निघून गेली. १ वाजताची वेळ. आता कुठे सहा वाजायला आले. प्रतीक्षा आली नाही. अजिंक्यने कागद पेन्सिल घेऊन उगीचच मनाला शांत करायला कविता लिहायला लागला.

पण कविता हि लिहावी लागते बोलावी नाही लागत. त्याला गरज होती बोलून मन मोकळ करायची. पण ते झाल नाही. ढगाळ वातावरण झाले, वार येत होते. बाहेर कुठे लोकांचे आवाज येत होते. रोजच येतात पण आत्ता अजिंक्यच्या डोक्यात त्या आवाजाने खूप दुखत होत. मनातला त्रास कसा बाहेर काढायचा हेच नेमके त्याला समजत नव्हत. त्याने लिहिलेली कविता फाडून टाकली. आणि कागदाचे तुकडे खाली टाकले. त्यात त्याला “फक्त तुझ्यासाठी प्रतीक्षा” अस लिहिलेला एक तुकडा दिसला. तो उचलून टेबलावर ठेवला. आणि डोळ्यातल्या पाण्याने कधी त्याचे ओठ खारट केले समजलच नाही.

एक कसला तरी आवाज आला. आणि त्याच्या डोक्यात जोरात एक कळ आली. आणि पुन्हा तसाच आवाज आला. त्यान दुर्लक्ष केल. पुन्हा तीन-चार वेळा सलग आवाज आला. आता जो कोणी हा आवाज करतोय त्याचा जीवच घ्यायचा या विचाराने तो डोळे पुसत दाराजवळ गेला. तो आवाज कडी वाजवल्याचा येत होता. त्यान दार उघडल. मन ताळावर आल. दारात प्रतीक्षा होती. ती आत आली. त्यान दार उघडच ठेवलं. जेणेकरून तिला सुरक्षित वाटाव. पण तीनच सांगितल दार लाव.

तिला टेबलावरचा कागद दिसतो “फक्त तुझ्याचसाठी प्रतीक्षा” अस लिहिलेला. तू अजून करतोस कविता? माझ्यासाठी? तीन डोळे मिटले आणि टपकन डोळ्यातल पाणी पडल. आणि कशाचा हि वेळ न घेता तो बोलला मी अजून जगतोय ही फक्त तुझ्याचसाठी……

भाग ३

प्रेमाची शप्पथ आहे तुला

(आता बाहेर पाउस पडायला सुरुवात झालेली) आज, आत्ता, अस जवळ आहोत. बाहेर पाउस पडायला लागलाय. तुला आठवतय का ग बघ बर, तेव्हा तू भिजत होतीस म्हणून मी माझ्या दोन वह्या तुझ्या डोक्यावर धरून मी भिजत होतो. आपण एका बाजूला जाऊन थांबलो. वह्या अक्षरशः फाटल्या आणि नंतर कळाल जरा अजून माग गेलो असतो किंवा नुस्त जागेवरून माग बघितल असत तर दिसल असत माग एक झाड होत आणि त्याच्या खाली सगळ कोरडच होत.

माझा अभ्यास, माझ्या मित्राचा अभ्यास सगळा पाण्यात गेला पण तुझ्या सिल्की केसांचा जो काही कर्ली अवतार झाला होता…खरच खूप सुंदर दिसत होतीस तू तशी. तुझ्या नाकावरून ओघळणार पाणी तुझ्या ओठांवर टपकण पडत होत. आणि हाताची घडी घालून तू भिजलेली माझी प्रतीक्षा थरथर कापात होतीस. माझ्याकड नेमके पैसे नव्हते. तुला मी विचारलं “पैसे आहेत का?” आणि तू मला वीस रुपये काढून दिलेस.

ते वीस रुपये मी माझ्या ओल्या हातात अगदी ऐटीत धरून तुला घेऊन चहाच्या टपरीवर घेऊन गेलो. तिथ त्याला पैसे रुबाबात देऊन दोन कटिंग घेतले. तू चहा पिलास आणि तुझी थंडी ओसरली. पैसे तुझेच होते पण मी माझ्या पैशान तुला चहा पाजून तुझी काळजी घेतली अशा नजरेन तू माझ्याकडे बघत होतीस. ( अजिंक्य )

हे बघ अजिंक्य, माझ लग्न झाल, मला मुलगी झाली, मी संसारात बुडाली म्हणून हे सगळ मी विसरले अस होत नाही. किती काहीही झाल तरी तू माझ पाहिलं प्रेम आहेस. नाही विसरू शकत तुला मी. मी मेल्यावरच तुला विसरेन. ( प्रतीक्षा )

एssए अस नाको ना बोलू मला भीती वाटते. हे बघ माझे हात कापतायत अस नको बोलत जाऊ. नाही सहन होत मला माहितीय न. हव तर मी पाहिलं मरतो पण मला नाही सहन होणार तुला काय झालेलं. आणि हे अस बोललेलं पण नाही चालणार मला. ( अजिंक्य )

हे बघ अजिंक्य तू इथ कशासाठी मला बोलावलं आहेस हे माहितीय मला पण तरीही सांगते मी ते काहीच करू शकत नाही. अरे मी मनान तुझी आहे. पण शरीरान आता माझ्या नवऱ्याची झालीय. ( प्रतीक्षा )

बर…म्हणजे आधी शरीरान आणि नंतर मनान हि होशील. मग? ( अजिंक्य )

अरे लाख माझ मन जाईल त्याच्याकड पण फिरून तुझ्याच जवळ येणार आहे. तू माझ पाहिलं प्रेम आहेस अजिंक्य. आणि तुला काय वाटत फक्त तूच मला आठवत बसतोस? मी तुला विसरले? मला तर तू सतत आठवतोस माझ्या मुलीला मी हाक मारली कि. आपण दोघांनी ठरवलेलं आपण लग्न केल कि एका मुलीला दत्तक घेऊन तीच नाव सारा ठेवायचं नवऱ्याला माझ्या नाही आवडली हि गोष्ट मी सांगितली होती तेव्हा. पण मी तुझी आठवण म्हणून तीच नाव साराच ठेवल.

हे बघ प्रेम तूच करतोस अस नाही मीही तुझ्यावर अजून तितकच प्रेम करतीय. पण संसाराच्या गाड्यात कधीतरी विसरते मी तुला. कारण त्याचा त्रास मलाच होतो. आधीही मला त्रास द्यायचास बोलून आणि आता आठवणीत आलास तरी त्रासच होतो मला तुझा पण…

भाग ४

प्रेमाची शप्पथ आहे तुला

हे बघ प्रेम फक्त तूच करतोस अस नाही मीही तुझ्यावर अजून तितकच प्रेम करतीय. पण संसाराच्या गाड्यात कधीतरी विसरते मी तुला. कारण त्याचा त्रास मलाच होतो. आधीही मला त्रास द्यायचास बोलून आणि आता आठवणीत आलास तरी त्रासच होतो मला पण या त्रासात हि एक आनंद मिळतो मला. एक आनंद मिळतो कि तू माझ्या मनातून अजून कुठेही गेला नाहीस.

खूप काही गोष्टीना मी विसरायचं म्हंटल ज्या आपल्या दोघात घडल्या पण नाहीरे विसरता येत नाही. काय करू मी ? हे बघ आणि मला मुद्दाम अस वागायचं नव्हत पण तुझ्या चुकीमुळ मला असुरक्षित वाटल. तुझ्यावर मी प्रेम केल आणि मला माझी चूक वाटली यात माझा दोष काय?

म्हणून मी लग्न केल आणि मला आता वाटत तुही लग्न करून घ्याव. हव तर मी माझ्या मैत्रीणींमधली बघू का तुला एक. म्हणजे कस ती तुझी काळजी घेईल म्हणजे मीच सांगेन तिला आणि महत्वाची म्हणजे ओळखीची असेल. हे बघ या आत्ताच्या घडीला तुला वाटत असेल की मी तुझ्याकडे सगळ सोडून याव. तुला मी माझ म्हणातर अस होणार नाही.

मी माझ्या नवऱ्याला त्याच्या आई-बाबाना सोडू शकत नाही. आणि माझ्या मुलीला त्या घरी ठेवून किंवा माझ्यासोबत घेऊन येऊ शकत नाही. ( प्रतीक्षा )

मी सांभाळेन तिला. माझीच मुलगी मानून. खूप काळजी घेईन तिची. हव तर……हव तर आपल बाळ नको जन्माला घालायला. मी तिला माझ नाव देईन. असही ती अजून लहान आहे नाही कळणार तिला. मी खरच सांगतो माझी मुलगी मानून तिला मी सांभाळीन. ( अजिंक्य )

हो तुझीच आहे ती. पण नाही होऊ शकत अस काहीच. तू समजून का घेत नाहीस. हाच स्वभाव मला आवडत नाही. प्रत्येक वेळीस तुझ खर करतोस तू. माझ कधी ऐकून घेतल नाहीस. तुझ्या हो ला मी हो म्हणायचं अरे मान्य आहे मला इतकी समज नाही पण कधीतरी तुझ पण चुकू शकत ना ? आणि हे मला कळल्यावर मी का तुझ्या हो ला हो द्यायचा ? सांग मला ?( प्रतीक्षा )

मला तुझ्याशी लग्न करायचं आहे . नाहीतर मला कोणीच नको.  या आयुष्यात प्रेमाचा शोध घेत मी तुझ्यापर्यंत येऊन पोचलो. जेव्हा कळत नव्हत तेव्हा पासून प्रेम तुझ्यावर करायला लागलो. आणि आता तूच अस म्हणालीस तर मी कुणाकड बघायचं सांग मला तूच ? ( अजिंक्य )

आणि बाहेर पावसाचा जोर वाढला दोघांच्या बोलण्याचा आवाज बारीक झाला कारण पावसाच्या सरींचा आवाज कित्येक पटीने वाढला. खिडकीतून पाणी आत यायला लागल खाटेवर अजिंक्यने जाऊन खिडकी लावली. तेवढ्यात

एक उपाय आहे. तो केला तर मी तुझी होईन ( प्रतीक्षा )

कोणता ???? ( अजिंक्य )

भाग ५

प्रेमाची शप्पथ आहे तुला

पावसाने जोर धरला आणि त्याच्या मनात बरेच प्रश्न यायला लागतात. मघापासून तो तिच्या जवळ जाण्यासाठी आसुसलेला असतो. पण तिच्या एका वाक्यान त्याच्यातली सगळी मिलनाची भावना विरून जाते. आणि त्याच लक्ष तिच्याकड लागून राहत. पण प्रतीक्षा मान खाली घालून हातातली बांगडी माग सरकवत एक सारख त्या बांगडीला बघत राहते.

काय झाल सांग ना? काय उपाय आहे? काय करू मी म्हणजे मी तुझा होईन आणि तू माझी होशील? आता असा अंत नको बघू प्रतीक्षा प्लीज बोल. बाहेर पावसाच पाणी आणि इथ माझ्या डोळ्यातल पाणी दोघ हि आतुर आहेत बरसायला जोराने. (अजिंक्य)

मला एकदा मिठीत घेशील अजिंक्य ? प्रेमाने नाही असच. गरज वाटतीय. (प्रतीक्षा)

हे काय आता मधेच? मी इतका वेळ ठेवला न संयम मग हे काय बोलतियस आणि तू उपाय सांग मग घेईन (अजिंक्य)

सांगते न तू घे तर जवळ. तू घेणारेस का नाही ? आणि गरज मलाच आहे अस नाही तुला हि आहे तुझ्या डोळ्यात आल्यापासून दिसलय मला. आणि नसेल घ्यायचं तर मी हि नाही उपाय सांगणार ( प्रतीक्षा )

अजिंक्य तिला जवळ घेतो. दोघ खाटेवर बसलेली असतात. अजिंक्य पाय खाली सोडून आणि तिच्यापासून लांब जरा बसलेला असतो तिच्याजवळ सरकून तिला जवळ ओढतो खांद्याला धरून.

असली कसली रे तुझी मिठी?  निट धर काय झाल इतका वेळ उतावळा झालेलास. काय करू आणि काय नको माझ्यासोबत अस तुझ्या मनात चाललेलं आणि आता हे काय आता संपली का भावना ? ( प्रतीक्षा )

अजिंक्य उठतो आणि तिचा हात धरून तिला उठवतो. ती त्याच्याकड आणि तो तिच्याकड बघतो. पण तो तिला मिठीत घेत नाही ती त्याच्या जवळ जात नाही दोघांचे दोन हात फक्त एकमेकांच्या हातात गुंतून पडतात.

प्रतीक्षा, या मधल्या काळात मी मिठी मारली उशीला तू समजून. आरशात बघून स्वताशी बोललोय तू समोर आहेस मानून. माझ्या हातावर मीच हात फिरवला तुझा स्पर्श समजून. आणि आज या घडीला तू समोर आहेस पण नाही ग इच्छा होत. काहीतरी राहिल्यासारख काहीतरी हरवल्यासारख वाटतय. माझ मन आज तुला शोधत कुठ गेलय काय माहीत आणि तू माझ्या अशी पुढ्यात आहेस. काय करू मी डोळ्यातल पाणी अडवू? का गच्च मिठीत साठवू? का माझ्या मिठीत धरून ठेवू इतक घट्ट कि दोन श्वासांशिवाय आपल्या काहीच त्या मिठीत ये जा करू शकणार नाही ? काय करू मी ( अजिंक्य )

मला तुझ बनव आज. पुन्हा एकदा नव्यान माझ्यावर प्रेम कर. विसर मला मी कोण आहे. विसर पाहिलं प्रेम. विसर त्या आठवणी. बस फक्त तू आणि मी आहोत इथ इतकच ध्यानात ठेवून मला आपलस कर.हेच हवाय न तुला? मी तयार आहे. मी जाणार होते पण पाय निघत नाही इथून. तुला हात लावला तर अनोळखी वाटलास रे. आणि मी नाही तुला अनोळखी म्हणून लक्षात ठेवू शकत तू माझा आहेस. तू माझ पहिलं प्रेम आहेस. मला माहित नाही तुझी मर्जी असो नसो मला तुझ बनव लवकर. मी चुकीची वाटत असेन पण हि वेळ पुन्हा नाही येणार आणि बहुतेक मी पण नाही येणार परत. तीन वर्षांनी आज आपण भेटलोय असा जर वेळ लागणार असेल एका भेटीसाठी तर मी फक्त तुझ्या मिठीला नाही आठवण बनवू शकत. मला तू हवायस. तुझा स्पर्श माझ्या प्रत्येक अंगाला आणि तुझा जड झालेल्या श्वासाला मला माझ्यात ओढून घ्यायचय.  ( प्रतीक्षा )

अजिंक्य भरल्या डोळ्याने तिला बघतो आणि तिच्या डोळ्यातल पाणी कधी तिच्या हनुवटी वरून घरंगळत जात कळत नाही. तेवढ्यात बाहेर मोठा प्रकाश पडतो. अजिंक्यच्या काचेच्या खिडकीवर तो प्रकाश स्पष्ट दिसतो पण हे दोघ एकमेकांच्या डोळ्यातच रमून असतात. आणि एकच जोरात आवाज येतो वीज चमकल्याचा. अजिंक्य भानावर येतो आणि त्या सरशी प्रतीक्षा त्याच्या मिठीत घाबरून जाते. घाबरायला ती काय आता लहान नाही पण मिठीत शिरायला एक चांगला बहाणा तिला मिळाला. अजिंक्यच्या शर्टाला घट्ट ओढून धरत तिन त्याला मिठी मारली आणि त्यान तिच्या केसात हात नेऊन ताकदीन घट्ट केस ओढून तिला जवळ ओढलं आणि नेहमी सारखी पावसाचा जोर वाढल्या मुळ लाईट गेली. आणि …….

भाग ६

प्रेमाची शप्पथ आहे तुला

त्या अंधारात एकसारखा पावसाचा आवाज येत होता. अंधार असला काही दिसत नसल तरी अजिंक्यला प्रतीक्षा आणि तिला अजिंक्य जाणवत होते. कळत होते किंबहुना प्रेमाच्या मिठीत बुडाल्यामुळे ते एकमेकांना दिसत हि होते. पुन्हा तोच तो खिडकीवर लक्ख प्रकाश पडला. आणि त्या प्रकाशात प्रतीक्षाला दिसलं अजिंक्य तिच्याकडच बघत होता. त्या एक सेकंदाच्या प्रकाशात नजरा-नजर झाली आणि प्रकाश गेला. आणि जोरात विजेचा आवाज झाला. त्या सरशी प्रतीक्षा अजिंक्यच्या मिठीत शिरली. अजिंक्यने तिला घट्ट पकडलं. आणि त्यान तिला घट्ट पकडल आणि तसाच मिठीत घेऊन तिला चालू लागला खाटेच्या दिशेने.

घरात अंधार होता. तिच्यासाठी ती खोली नवीन होती. पण अजिंक्यची ओळखीची होती. त्याला अंधारात हि माहित होत कुठ आहे खाट. तो तिथ पोचला. मिठीतल्या अवस्थेत प्रतीक्षाच्या पायाला खाट टेकली. आणि तिन मिठी सैल केली. आणि खाटेवर तिरक पडत त्याला जवळ ओढल. पावसाचा जोर वाढतच चाललेला. मगाशी लावलेल्या खिडकीतून थोड थोड पाणी त्या खाटेवर उडतच होत.
प्रतीक्षा झोपली तस तिच्या तोंडावर गार पाणी उडत होत. पण कुठून पडतय दिसत नव्हत. अजिंक्य कुठ आहे हे हि दिसत नव्हत. तीन हाताने चाचपडून बघितल. आणि अजिंक्यचा हात जाणवला. तिन हाताला पकडून त्याला जवळ ओढायला हिसका दिला त्या सरशी अजिंक्य तिच्या कवेत गेला. थंड श्वास. आणि अंगावर उडणार खिडकीतून  उडणार थंड पाणी. आणि दोन हृदयांची होणारी धडधड. या सगळ्यात आता दोघ हि एकमेकांना सावरू शकत नव्हते. त्यान तिच्या केसातून कपाळावरून नकट्या नाकावरूण हात फिरवत ओठांपर्यंत आणला. आणि तो तसाच छाती पर्यंत जाणार तोच परत प्रकाश पडला. खिडकीवर नाही प्रतीक्षाच्या शेजारून. तिचा मोबाईलचा प्रकाश पडत होता. ती अजिंक्यला बाजुला करून फोन उचलते. घरून आईचा ( सासू ) फोन आलेला असतो कि साराचा क्लास सुटला आहे आणि ती एकटी तिथ थांबलीय वाट बघत, कुठ आहेस तू आणि बरच काही बोलल्या ओरडल्या ही. मोबाईल हातात पकडून अजिंक्यला सांगते. मी निघते.

अजिंक्यला सुचत नाही. मोबाईलच्या प्रकाशातही गोरीपान प्रतीक्षा त्याला दिसत होती. तो तिच्या जवळ सरकून तिच्या खांद्याच चुंबन घेतो पण ती त्याला सांगते बस मला जायचं आहे. तो तिला म्हणतो इतक्या पावसाच तू जाणार कस? छत्री पण आणली नाहीस. मी देऊका? नको परत छत्रीच्या बहाण्याने मला इकड याव लागेल ( प्रतीक्षा )

मग यायचं नाही का पुन्हा तुला ? ( अजिंक्य )

माहित नाही पण प्लीज मला नको पुन्हा प्रेम करायला भाग पाडू तुझ्यावर ( प्रतीक्षा )

मी नाही तू केल आहेस वेड या काही वेळात, मी काय करू तू जाशील इथून मी कुठ जायचं? तुझ्या मनात तुझा नवरा आहे, तिथ ही मी येऊ शकत नाही. मी कुठ जायचं सांग न मला? उत्तर दे आणि जा.  ( अजिंक्य )

प्रतीक्षा चाचपडत कडी शोधते. अजिंक्य तिच्या माग जाऊन तिला मिठी मारतो आणि तिच्या हाताला धरून तिच्याच हाताने कडी उघडतो. आणि ती दार उघडून त्याचा पोटाला असलेला हात काढून जाते अस म्हणून निघून जाते. सगळा काळाकुट्ट अंधार असतो, खोलीत पण आणि बाहेर ही. ती मोबाईलच्या लाईटने पायऱ्या उतरत जाते. तो दार लावून घेतो. आणि खिडकीवर पुन्हा प्रकाश पडतो आणि तसाच काहीतरी खुडबुड करून तो छत्री काढतो चप्पल घालतो आणि दाराला कडी घालून खाली निघून जातो.

प्रतीक्षा रिक्षा दिसण्याची वाट बघत असते. एका देवळाच्या आडोशाला उभी राहून. तिला पुन्हा आईचा ( सासू ) फोन येतो. ती उचलत नाही. एव्हाना ती खूप भिजलेली असते. आणि पाउस थांबतो. पण पावसाचा आवाज येत असतो. कस काय ?

अजिंक्य तिच्या माग तिच्या डोक्यावर छत्री घेऊन उभा राहतो. ती म्हणते का आलास. मी जाते माझी मी.

कशी? भिजत? ( अजिंक्य )

हो ( प्रतीक्षा )

आधीही नाही मला आवडल कधी आणि आताही नाही आवडणार तू पावसात भिजलेली तुला सर्दी होते. साध रविवारी तू केसं धुतली तरी तुला सर्दी होते आणि बघ किती भिजलीयस. ( अजिंक्य )

आहे लक्षात अजून ? ( प्रतीक्षा )

काय नाही लक्षात मला सांग सगळ आहे फक्त तेव्हा बोलून दाखवलं नाही आणि दाखवायचं हि नाही पण तुला विसर पडलाय म्हणून मनात नसताना हि बोलून दाखवाव लागतय. बर चल उशीर होईल सारा तिथच आहे. तिथ पर्यंत सोडतो तुला. ( अजिंक्य )

तू नको भिजू आत ये जवळ माझ्या. दोघ चालत राहतात घोट्या एवढ्या पाण्यात अलगद पाय टाकत…

भाग ७

प्रेमाची शप्पथ आहे तुला

रस्त्यावर अंधार आहे. अगदी मुख्य रस्त्यावर ते दोघ नसतात त्यामुळ गाड्यांचा राबता हि तिथ नव्हता. पूर्ण शुकशुकाट. फक्त पावसाचा जोर आणि पावसाचाच आवाज. एकाच छत्रीत चालताना अजिंक्याने छत्री धरलेली डाव्या हातात पण चालताना अवघडत होत त्याला. त्याची गैरसोय बघून प्रतिक्षाने त्याचा उजवा हात तिच्या कमरेजवळ घेतला. अजिंक्यने तिच्याकड बघितल आणि तिने नजर चोरून घेतली. त्यान अलगद ठेवलेला कमरेवरचा हात अजून घट्ट केला. एक शहारा आला प्रतीक्षाला. त्या सरशी शहाऱ्याच्या झटक्याने ती छत्री बाहेर गेली आणि पटकन तिला आत अजिंक्याने ओढल.
दोघ एकमेकांना बिलगली. नकळत दोघांची मिठी झाली. तीन डोळे मिटले.आणि अजिंक्यचा हात कमरेपासून खांद्यापाशी आला आणि एका पुरुषी हातान तिला कधी जवळ घेऊन तिच्या ओठांवर ताबा मिळवला दोघानंही कळाल नाही. तिला भान आल. तिन त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्यान इतक घट्ट धरलेलं तिला कि तिला त्याची मिठी आणि तिचे ओठ दोन्ही सोडवता आल नाही. पण आता सहन होत नव्हत तिला. तिला भान आल हि नसत पण अजिंक्याने एका हातान मारलेली मिठी त्या प्रेमात वहावत जाताना त्याच्या हातून खाली छत्री पडली दोघ भिजत होते.
तिन पुन्हा त्याला प्रतिकार केला. त्याला शुध्द आली त्यांनी काही न विचार करता खाली बघितल आणि छत्री उचलून तिच्या डोक्यावर धरली. ती ओल्या साडीच्या पदराने चेहरा पुसू लागली. त्यान तिचा हात धरला आणि तिच्या जवळ तोंड करून चेहऱ्यावर असलेले पाण्याचे थेंब तो ओठांनी टिपत होता. तिला कस तरी होत होत. नको वाटत होत तिला अजिंक्यला सोडून जावस. पण सारा एकटी होती तिकड. तिन सांगितल नको बास आता अजिंक्य. आणि अनोळखी सारखा तो लगेच बाजूला झाला. तिच्या डोक्यावर छत्री धरून स्वतः निम्मा छत्री बाहेर झाला. दोघात अंतर झाल.
काय माहित प्रतीक्षालाच काय वाटल तिन त्याला जवळ बोलावलं. दोघ चालत राहिले. चालताना मधेच प्रतीक्षाने पाण्यात जोरात पाय आपटला. पाणी अजिंक्याच्या अंगावर उडाल. प्रतीक्षा खूप मोठ्याने लाडिक अस हसली. त्याला हि मजा वाटली. त्यान हि तीच्या डोक्यावरची छत्री बाजूला घेतली आणि ती लहान मुलीसारखी छत्री डोक्यावर ओढून त्याच्या जवळ गेली.
क्लास जवळ आलेला. आणि चेहरा तिचा अजून ओलाच होता पण तरी तिच्या डोळ्यातल पाणी अगदी स्पष्ट आणि वेगळ दिसत होत.
काय झाल तुला रडायला ? माझ काय चुकल का ? ( अजिंक्य )
मी नव्हते तर कसा जगाला असशील रे तू . मला आता माझीच लाज वाटतीय मी इतक सार तुझ प्रेम हरवून बसले. प्रेमाला मुकले तुझ्या मी. आणि शिक्षा मिळाली रे तुला कुणामुळ तर माझ्यामुळ. जी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. जिच पाहिलं प्रेम तू आहेस अशा मुलाला त्रास होतो कुणामुळ तर ती मीच आहे. मला नाही कस तरी वाटतय अजिंक्य. काय करू मी. मला तू शिक्षा दे प्लीज. मी शिक्षा भोगेन. ( प्रतीक्षा )
नाही मी काय तुला शिक्षा देणार. तू माझी व्हावीस इतकीच इच्छा होती आणि अजून हि आहे. होशील का माझी ? ( अजिंक्य )
ते कस शक्य आहे. मी सांगितल न नाही येवू शकत मी सगळ सोडून तुझ्याकड. ( प्रतीक्षा )
मग लग्न नाही पण अस तरी भेटू शकतेस न तू मला त्यात हि मी खुश राहीन. ( अजिंक्य )
नाही अजिंक्य मी माझ्या नवऱ्याला फसवू नाही शकत त्याला जर का कळाल तर, तर मी कुठ जायचं . तो मला घराबाहेर नाही काढणार पण माझ्याकड लक्ष नाही देणार. नवरा असून मी विधवा होईन. माझ्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न पडलाय मला. नाही मी करू शकत काहीच चुकीच. तू लग्न कर. ( प्रतीक्षा )
कुणाशी तुझ्याशी ? ( अजिंक्य )
नाही रे मजा करायची वेळ नाही हि. समजून घे गांभीर्य तू कर खरच लग्न कर बघ तुही जाशील मला विसरून. बायकोच्या प्रेमाने तुला बर वाटेल नको हे असले विचार. हे बघ माझ पाहिलं प्रेम तूच राहणार आहेस कायम. मी भेटेन न कधीतरी पण फक्त शरीराची भूक भागवायला नाही. मी भेटेन तुला खूप काही शेअर करायला तेव्हा तुझ्या डोळ्यात मला आनंद हवाय. प्लीज. ( प्रतीक्षा )
दोघ चालत असतात. अजिंक्यचा हात तिच्या कमरेवरून आता बाजूला झाला. एक प्रकारचा त्याला थकवा आला. अंगातून त्राण गेल. तो मान खाली घालून चालत होता तिच्यासोबत.
मग तू मला भेटणार नाहीस का पुन्हा ? ( अजिंक्य )
अस म्हंटल आहे का मी ? ( प्रतीक्षा )
तू काहीही कर फक्त आनंदी जग. तू तिकड आनंदी असशील तर मी इकड आनंदी असेन. मी प्रेम तुझ्यावर केल आणि शेवटपर्यंत तुझ्यावरच करेन. पण आपल भेटन नको बंद करू. “प्रेमाची शप्पथ आहे तुला “ आपल्या. मी नाही जगू शकणार जास्त दिवस ( अजिंक्य )
एsए अस नको म्हणू मी हि नाही जगू शकणार तुला काय झाल तर .( प्रतीक्षा )
मग इतके वर्ष कशी जगलीस तू माझ्याशिवाय ? ( अजिंक्य )
तुझ्या आठवणीत ( प्रतीक्षा )
अजिंक्यच लक्ष दोघांच्या एकसारख्या चालणाऱ्या पावलांकड होत.
मला वचन दे तू पुन्हा येशील मला भेटायला. आणि अचानक तिची दोन पावलं त्या छत्रीतून गायब झाली. त्यानी शेजारी बघितल. ती नव्हती. त्याच लक्ष पुढ गेल. एक मोठा प्रकाश पडला. आणि विजेचा आवाज झाला. बोलण्यात इतकावेळ पावसाचा आवाज कुठेतरी हरवलेला पण आता पावसाचा आवाज जरा जास्तच येत होता. प्रतीक्षा पुढ जाऊन एकापाशी थांबली. आणि तो तिचा नवरा होता साराला सोबत घेऊन. त्यान बघितल होत अजिंक्य आणि प्रतीक्षाला एकत्र. त्याला भीती वाटली. आणि डोळ्यात पाणी आल प्रतीक्षा वचन न देताच निघून गेली. त्याला वाटल ती आपल्याकडे वळून बघेल पण नाही बघितल. नवऱ्यापुढ तिन त्याला परक केल. इतक्या वेळेचा सहवास ती क्षणात विसरून गेली. त्यान छत्री बंद केली आणि उभा राहिला भिजत. अजिंक्यला पुन्हा तोच प्रश्न पडला. आता मी जायचं कुठ ?

भाग ८

प्रेमाची शप्पथ आहे तुला

आज गुढीपाडवा. पण त्याला काय घेणदेण नाही सणांच. आज खूप दिवसांनी म्हणजे नक्की सांगता येत नाही पण तरी ४/५ महिन्यांनी असा निवांत घराबाहेर पडलेला. सकाळचे नऊ वाजले असतील. तर तो जात असतो रस्त्यावरून प्रत्येकाच्या घराबाहेर धावपळ चाललेली असते. गुढी उभारायची. लगबगीने वस्तू आणून देणारी आई बाबा. नवरा स्टुलावर खुर्चीवर भिंतीवर पत्र्यावर वर चढून गुढी लावताना त्याला काळजीने सांगणारी त्याची बायको आणि आजूबाजूला आनंदी त्यांची मुल. त्याला अप्रूप वाटत होत. आपल हि असच असत जर का आपल लग्न झाल असत. अशा विचारात तो प्रत्येक घराची हि गोष्ट बघत चाललेला असतो. आणि त्यात रस्ता भरकटतो.

चालत चालत त्याला त्याची ती आठवू लागते. जिणे त्याच्यासोबत लग्न करायची शपथ घेतली होती. सोबत एकत्र राहाण्याच वचन दिल होत. आणि त्यात ह्याने हि तिला तिच वचन , शपथा घेऊन प्रेमाला टिकवलेल पण , काही गैरसमजान सगळ मातीमोल झाल.

तो अजिंक्य होता. आणि ती प्रतीक्षा होती.

रस्त्याने चालताना सकाळचा माणसांचा वावर काम होता रस्त्यावर. जो तो आपापल्या घरात होता. आणि असच इकड तिकड बघत बघत असताना अचानक अजिंक्य थांबला. आणि पुन्हा तसाच एक प्रसंग दिसला. एक नवरा बाल्कनीच्या कट्ट्यावर उभा राहून जीवाशी खेळ करून गुढी बांधत होता. त्याची बायको त्याला ताकदीने घट्ट धरून उभी होती. एक मुलगी हातात फुल घेऊन उभी होती आणि आई खुर्चीवर बसलेली. बहुतेक वयामुळ जास्त वेळ उभ राहता येत नसेल. अस सगळ बघत असताना तो रस्त्याच्या आतल्या बाजुला सरकला आणि बघत राहिला. त्या नवऱ्याने एक एक वस्तू कळकाला लावल्या. मग त्याने साडी लाऊन तिला तांब्या मागितला. नवऱ्याला सोडून तीन अलगद पटकन खाली वाकून ताटातला तांब्या उचलला आणि पटकन आधी नवऱ्याचे पाय पकडले आणि आणि हात वर केला तांब्या द्यायला. अचानक पुढ लक्ष गेल तीच खाली.

आणि अंगातल अवसान निघून गेल. तिच्या. समोर खाली अजिंक्य उभा होता आणि त्या बाल्कनीत ?

प्रतीक्षा होती. नकळत अजिंक्य रस्ता भरकटला पण त्याला तीच घर समजल. तो तिला बघत होता. माघून आईंचा आवाज सुरु झाला. तिन स्वताला सावरत तांब्या उचलून नवऱ्याला दिला. डोळ्यातून पाणी टप-टप पडत होत. पण दोन्ही हात नवऱ्याला आधारासाठी गुंतलेले. अजिंक्य हि तिला बघत होता. पण जस त्याला जाणवलं तिच्या डोळ्यात पाणी आलंय तस तो माघारी वळून निघाला. तिच्या ओठांपर्यंत आलेल अजिंक्य थांब म्हणून पण नवऱ्याने मागच्या वेळेस तिला माफ केल पण आता नाही करू शकणार. सणासुदीचा दिवस त्यात अपशकून नको घडायला या विचाराने तिन मनाला आवर घातला. अजिंक्य रस्त्याने फक्त प्रतीक्षाला आठवत चालत होता. सगळ जग विसरला तो. जिच्यासाठी मी खूप काही केल. जिच्यावर मी खूप प्रेम केल. जिच्यासाठीच फक्त मी जगतोय अशी ती आज इतकी सुंदर दिसतेय, कुणासाठी तर तिच्या नवऱ्यासाठी. या विचाराने त्याच्या मनात घाव पडत होते. पण स्वताला सावरत तो घरी आला. वर घरात जाताना पायऱ्या पण त्याला चढवत नव्हत्या. त्या कशातरी चढून दार उघडून आत आला दाराला कडी लावली आणि रडत झोपून गेला. अख्खा दिवस झोपण्यात गेला. संध्याकाळी ६ वाजता अजिंक्यला जाग आली आणि त्यान उठून आवरून बसला चित्र काढत. तिच्या त्या मस्कारा लावलेल्या डोळ्याचं तो चित्र काढत होता. तिचे पाणावलेले डोळे त्यान चित्रात अगदी साफ काढले आणि तो मात्र आत्ता पाणावलेल्या डोळ्याने ते चित्र काढत होता.

दार वाजत. तो जाऊन दार उघडतो. एक मुलगी दारात उभी असते छोटीशी. ती त्याला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा बोबड बोलून देते. या आधी त्यान तिला त्याच्या आसपास नव्हत बघित. त्यान तिला विचार नाव काय तुझ बाळा ? आणि तिन उत्तर दिल “साला” ( सारा ) आणि दोन मिनिट अजिंक्य स्तब्ध झाला. तिच्या डोक्यावर हात ठेवणार तोच बाजूला थांबलेली प्रतीक्षा त्याच्या समोर येते.

खूप सुंदर दिसत होती ती सकाळी होती त्यापेक्षा पण जास्त सुंदर वाटत होती आत्ता ती. ती आत शिरते न विचारता. साराला घेऊन खाटेवर बसते. खिडकी उघडते. जरा गार वार आत येत. तो जाऊन पटकन पंख लावतो आणि तिच्या समोर खुर्ची ठेवून त्यावर बसतो.

दोघ बोलू लागतात. तो साराला कागद पेन्सिल देतो ती तीच ती चित्र काढत बसते वाकड-तिकड.

प्रतीक्षा : हिला पण चित्राची खूप आवड आहे तुझ्यासारखी.

अजिंक्य : मला चित्राची नाही तुझी आवड आहे.

प्रतीक्षा : मोर गणपती नारळाच झाड आणि घर खूप छान काढते चित्र.

अजिंक्य : तू खूप छान दिसतीयस. खूप सुंदर.

प्रतीक्षा : तुझ्यासाठी आलीय मी आवरून. हेच हव होत न तुला.

अजिंक्य : हो पण साराला का आणला सोबत ?

प्रतीक्षा : मला पुन्हा ते नव्हत करायचं. जे मागच्यावेळीस झाल म्हणून तुला सावरता येईल हिला बघून म्हणून आणल.

अजिंक्य : खूप रडलो आज मी तुला आठवून .

प्रतीक्षा : आणि आता रडायचं नाही मी आलीय न तुझ्याकडे.

अजिंक्य : कायमच कधी येणार ?

प्रतीक्षा : ( निशब्द )

( हि कथा न संपणारी आहे )

लेखक: अजिंक्य भोसले
संपर्क: 7558356426

तुमच्या प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे हा आजचा खास लेख श्री.श्री.श्री.छ.शिवाजी महाराज साहेब आणि तुम्हा सर्वाना मी अर्पण करतो. असच प्रेम आणि आशीर्वाद असुद्या

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

उरल काय आहे? True Love | मराठी लेख | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

मधु चंद्र: कमी वयातले बालपण | PuneriSpeaks

LEAVE A REPLY