शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

0
शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान

आग ये अर्चना कुठ हायस? हायस का आत मंदी?

सुमन आज्जी बाहेरूनच ओरडत आत शिरली.
आत गेल्यावर समजल आत अर्चना, तिची नुकतीच दहावी पास झालेली मुलगी आकांक्षा म्हणजेच छकी, अर्चनाचा भाऊ विनोद बोलत बसले होते.

अर्चना: काय व्ह आज्जे या कि आत.
आज्जी : आग त्ये मी शहरातून (साताऱ्यातन) आली. डुगडूग्यातून उतरले तर तिथ गावच्या फाट्यावर छकीचा मोठा फोटू लावलेला पाहिला मी….
त्या गाडीवाल्याला विचारल तर त्यान वाचून दाखवलं आपल्या छकिन धावीत पंच्याण्णव टक्के पाडलेत.
अन समदी म्हणत होती की आपल्या गावात पहिली न शहरात दुसरी आली
म्हणून आली पोरीला भेटायला.
पण इथ तर घरात कालवा चाललाय.
काय झाल र विनोद?
ई बाय माझे छके तू तरी सांग काय झाल?

अर्चना: ती काय सांगल… इवढी बापाच्या माग बारक्याची मोठी केली हिला. बाप दारू ढोसून मेल्यावर म्हंटल हिला शिकवू आणि मोठी करू…
आत्ता नाही शेवटी पोरीच्या जीवावर जगू आणि लागल्यास मरू.
पण हि पोर बोलती शहरात जायचं शिकायला. काय बोलायला जात हिला?

आज्जी: हा मंग जाऊदे की…! लांब हाय व्हय सातारा? काय तू बी एवढ्या तेवढ्या कारणान बोलतीस सोन्यासारख्या लेकराला.
त्या नंदाच्या पोराला चाळीस पडले तर तीन गाव डोक्यावर घेतलंय. पेढे वाटतीय, न तू बोलतीस व्हय सोन्यासारख्या पोरीला..आआआंsss

अर्चना: ती सातारला शिकायचं न्हाई म्हणत … पुण्याला जायचं बोलती. मी इथ हातावरची काम करत दिवसभर राबती तव्हा चार पैसा येतो,
तिथला खर्च कसा झेपल मला? सांगा तुमीच…अन हिला पण समजवा जरा.

आज्जी: का नाही जमणार, समद जमत. एवढी गुणी पोर हाय, दे धाडून….समद जमतंय.

विनोद: मीही त्येच म्हणत व्हुतो. असही माझा दोस्त राहतो तिथ,
त्याच्या ओळखीन कमीत कमी खोली बघू,
त्यात दोन चार जनी राहून वाटून भरतील की भाड.
न जेवनाच म्हणशील तर रोज मी तिकड जातो हिंगण्याला कारखान्याला दुध घालाय, मग सकाळचा डबा दिन तिकडच्या तिकडं.
कालेज ला पण सोडीन म्हणजे आमच भेटन होईल अन माज पण लक्ष राहील.

आज्जी: त्ये बघ काय हव अजून, तुज न आपल काहीतरीच आसत. आत्ता न्हाय शिकली ही तर काय हिला पन कामाला लावती का?

अर्चना: मी काय म्हंटल सातारला माझा चुलत मोठा भाऊ राहतो.
त्यांच्याकड राहिल की, तिकड ते बी लक्ष देतील न माझ पण ओझ जरास हल्क होईल.

आकांक्षा : हे बघ! मी नाही जाणार सांगितलय. ‘स्वाभिमान आहे कि नाही आपल्याला‘.
आज्जे मागच्या येळी परीक्षा व्हती तव्हा आईन हा इशय काढला तर मामी न तोंड वाकड केल आन तरातरा आत गेली. न मामा पण बोलला, बघू हि झाली पास तर पुढच्या पुढ. आन अस समद असताना मी का जायचं तिथ. त्याचा मुलगा माझ्याकड रकारका वरखाली बघत व्हुता. छाती झाकावी तर मांडी उघडी मांडी झाकावी तर गळा उघडा असा त्यो.
मला नाही का लाज लज्जा काय?

अर्चना: मग काय पुण्याला जाऊन छाताड उघड ठेवून फिरणाऱ्या पोरींच्याबर फिरणार हायस का?

आकांक्षा: तू वाईटच का बघती, तिथलं शिक्षण लय मोठ हाय….

अर्चना: ते मला नको सांगू मी काय बघते ते, वाईट का चांगल, चार पावसाळे जास्त बघितलेत मी तुज्याहून.
अनुभवाच गाठूड विरलय आता इतके अनुभव आहेत माझ्याकड,
मला शहाणपणा शिकवू नकोस. आणि व्हय स्वाभिमान कसला ग एवढ्या एवढ्या वयात तुला? स्वाभिमान कुणाला असतो ज्याची ऐपत असती ज्याच्याकड पैसा असतो काय हाय यातल तुज्याकड? आहे त्यात रहाव माणसांन. कसं

आज्जी : बराबर बोलतीय अर्चना छके. नको तू इथ शिक कि तिथ, काय इथ नी काय पुण्यात सगळं सारखच की

आकांक्षा: याच विचारांमुळ आई अशी सगळ्यांपुढ नाक घासत जगली. पैसा नाही म्हणून काटकसर केली. न प्रश्न माझा आहे हा!
का तर मी मुलगी हाय म्हणून जास्त शिकायचं नाही का? का या-या माझ्या भावाला शिकवायला पैसे साठ्वती तू?
तू जर का स्वाभिमान ने जगली असती तर दिरांनी तुला त्रास नसता दिला.
मोठ्या जावेने चोरीचा आळ तुज्यावर नसता घेतला. घरी पैसे नाही म्हणून आज्जीच्या घरी चोरी करायला लागली नसती.
स्वाभिमान तू गहाण टाकलास न बापापुढ माझ्या. म्हणून तो मरेपर्यंत तू त्याचा फकस्त मार खात राहिली आणि स्वाभिमानाच्या गोष्टी तू करतेस ?

अर्चना: हे ऐकून घ्यायला मी जन्म दिला का तुला.
नऊ महिने असेच गेले का ग? वांझोटी राहिले असते बर झाल असत….

आकांक्षा: मी तस म्हणतच नाही….
तुला वाटत न मी शिकू नये सोडल शिक्षण आज पासून अकरावी बारावी बाहेरून करते मी अन वरची काम करायला लागते तुझ्याबर. पण लक्षात ठेव तू, स्वाभिमान हा गरिबीमुळ किंवा लाचारी मुळ येत नसतो तर स्वाभिमान हा शिक्षणान येत असतोय. आणि शेवटी मी तुझीच मुलगी हाय.
मीही ठेवते माझा स्वाभिमान तुज्या पुढ गहाण आणि करते काम..आणि फक्त काम

लेखक
अजिंक्य भोसले.
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणार्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

मधु चंद्र: कमी वयातले बालपण | PuneriSpeaks

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

ठाकरे चित्रपटाच्या टीजर मध्ये नमाज पढत असलेला मुस्लिम व्यक्ती कोण? काय घडली होती घटना…..

LEAVE A REPLY