संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

0
संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

संभाजी महाराज, मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र. स्वराज्याचे पहिले युवराज. मराठा साम्राज्य चे दुसरे छत्रपती.

संभाजी महाराज इतिहास

संभाजीराजे भोसले (१४ मे, १६५७ – ११ मार्च, १६८९) हा मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती. ते मराठा साम्राज्य संस्थापक शिवाजी महाराज भोसले यांचे सर्वात मोठे पुत्र होते.

संभाजी महाराज

शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे ते जेष्ठ पुत्र. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने संभाजी महाराज यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांनी ९ वर्षे राज्य केले. मराठा साम्राज्य हे मुघल साम्राज्य तसेच सिध्दी आणि पोर्तुगीज यासारख्या अन्य शेजारील शासकांविरुद्ध लढा देत उभे होते.

संभाजी महाराज बालपण

संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर सईबाई यांच्या पोटी झाला. संभाजी राजे अवघे २ वर्षांचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचा मृत्यू झाला. आईविना पोर सांभाळायची जबाबदारी त्यांच्या आजी, शिवाजी महाराज यांच्या आईसाहेब जिजाऊ यांनी स्वीकारली.

संभाजी महाराज

लहानपणापासून संभाजी महाराज चातुर्यवान होते. अनेक भाषा त्यांनी लहानपणीच शिकल्या होत्या. खेळात सुद्धा ते पटाईत होते. वयाच्या ८ व्या वर्षी संभाजीराजांना एका तहाखाली अंबरच्या राजा जयसिंग यांच्याबरोबर राहण्यास पाठवले गेले. यामागे शिवाजी महाराज यांचे चातुर्य होते. संभाजी महाराज यांना मुघल आणि राजपूत यांचे राजकीय डाव आणि आखणी समजावी असा हेतू शिवाजी महाराज यांचा होता.
वयाच्या १४ व्या वर्षी संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत बुधभूषण ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज याचे सुंदर आणि अलंकारिक भाषेत वर्णन केले आहे

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।

जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥

अर्थ-“कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा र्‍हास

तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ ”

संभाजी महाराज

अगदी लहान वयात संभाजी महाराज यांचे अनेक भाषेवर प्रभुत्व होते.

संभाजी महाराज यांचा विवाह

संभाजी महाराज यांचा विवाह जिवाबाई यांच्याशी झाला. मराठा रीतिरिवाज नुसार त्यांनी आपले नाव येसूबाई ठेवले. शिवाजी महाराज यांनी कोकण मध्ये मराठा साम्राज्य वाढीसाठी प्रचितगड वर ताबा मिळवला. त्यात पिलाजीराव शिर्के यांची मदत झाली आणि मराठा साम्राज्य ला कोकण ची वाट मोकळी झाली. त्यात झालेल्या तहानुसार संभाजी राजे यांचा विवाह पिलाजीराव यांच्या कन्या येसूबाई(जिवाबाई) यांच्याशी झाला.

संभाजी महाराज राज्याभिषेक

शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराज यांनी आपल्याकडे घेतली.
१६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा रायगड किल्यावर पूर्णतः राज्याभिषेक झाला.

संभाजी महाराज

संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध असणाऱ्या अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना संभाजी महाराज यांनी उदांत अंतःकरणाने माफ केले होते आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले होते. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो नी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट रचून संभाजी राजांना कैद करून कमी वयातच राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला.

संभाजी महाराज

तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.

संभाजी महाराज प्रधान मंडळ

सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती – संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश – सर्वोच्च अधिकार असलेले)

श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)

सरसेनापती: हंबीरराव मोहिते
कुलमुखत्‍यार (सर्वोच्च प्रधान): कवी कलश (कलुषा)
पेशवे: निळो मोरेश्वर पिंगळे
मुख्य न्यायाधीश: प्रल्हाद निराजी
दानाध्यक्ष: मोरेश्वर पंडितराव
चिटणीस: बाळाजी आवजी
सुरनीस: आबाजी सोनदेव
डबीर: जनार्दनपंत
मुजुमदार: अण्णाजी दत्तो
वाकेनवीस: दत्ताजीपंत

संभाजी महाराज पराक्रम

संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या १५ पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराज यांनी एकहाती लढा दिला.

संभाजी महाराज

संभाजी महाराज यांनी गनिमी कावा च्या पुरेपूर वापर करत औरंगजेबाला जेरीस आणले होते. संभाजी राजे यांनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. त्यात महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांनी १२० पैकी एकही लढाई हारली नाही. संभाजी महाराज असे एकमेव योद्धा होते ज्यांनी असा इतिहास घडवला होता. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य वाढेल आणि मराठा साम्राज्य मातीस मिळेल अशी आशा बाळगून बसलेल्या औरंगजेब ला कित्येक वर्षात एक सुद्धा विजय मिळाला नसल्याने तो चवताळून उठला होता.

संभाजी महाराज यांची मोहीम  बुऱ्हाणपूर लुट

छत्रपती शिवरायांच्या कैलासवासानंतर शंभूराजे छत्रपती झाले. शंभूराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली. राज्याभिषेकानंतर एखादी प्रचंड लूट मोहीम आखून लूट मिळवावी व राज्याचा खजिना मजबूत करावा या हेतूने शंभूराजांनी मोघलांच्या बुऱ्हाणपूर शहरावर हल्ला करून तेथील अठरा पुरे लुटून स्वराज्याच्या खजिन्यात भर टाकण्याचा मनसुभा रचला. आधी संभाजी महाराज यांनी सुरत लुटणार अशी अफवा पसरवली. बुऱ्हाणपूर ची लूट करण्याचे नेतृत्व हंबीरराव मोहिते यांच्याकडे सोपवले. ३० जानेवारी १६८१ रोजी सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुऱ्हाणपूर शहरावर हल्ला केला. खानजहान हा बुऱ्हाणपूरचा सुभेदार होता. आणि त्याचा साहाय्यक होता काकरखान अफगाण. मोठ्या फौजफाट्यासहित मराठे ७० मैलाची मजल मारून एकाएकी बुऱ्हाणपुरावर चालून गेले. तीन दिवसापर्यंत मराठे पुरे लुटीत होते. त्यांना मुबलक लुट मिळाली. त्यांनी जडजवाहीर, सोने-नाणे, रत्ने आणि मौल्यवान सामान घेतले. इतर जिन्नसाची त्यांनी परवा केली नाही. भांडीकुंडी, काचेचे सामान, धान्य, मसाले, वापरलेली वस्त्रे इ. सर्व लुट वाहून नेणे शक्य नसल्यामुळे तेथेच टाकून दिले. व नंतर ते निघून गेले. या लुटीने औरंगजेब एवढा चिडला की तो उत्तरेकडची आलिशान गादी सोडून मराठ्यांवर आक्रमण करण्यास मोठा फौजफाटा घेऊन चालून आला.

रामशेज किल्ला लढाई

एक तरी विजय मिळावा म्हणून औरंगजेब याने शहाबुद्दीन बरोबर आपली भली मोठी तुकडी नाशिक चा रामशेज किल्ला जिंकायला पाठवली.

रामशेज

शहाबुद्दीन फिरोजजंग ३५ ते ४० हजार फौजफाट्यासह रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला तेव्हा रामसेज चे किल्लेदार सूर्याजी जेधे ५००-६०० मावळ्यांसोबत गडाचे रक्षण करत उभे होते. मुघलांची अपेक्षा ही होती की एका फटक्यात आपण हा किल्ला जिंकून आपल्या विजयाची ज्योत पेटवू. परंतु मराठ्यांच्या गनिमी काव्याने शहाबुद्दीन च्या सैन्याला पुरते जेरीस आणले. मराठे गडावरून दगडगोट्यांच्या वर्षाव मुघल सैन्यावर करत त्यामुळे मुघल सैनिक हैराण झाले होते. गडावर असलेली रसद फारच तुटपुंजी होती. अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून दारुगोळा, शस्त्रास्त्रे आणि दाणागोटा गडावर पळवून आणीत. संभाजी महाराज यांनी किल्यावर रसद पोहचवण्यासाठी खास तुकडी तैनात केल्या होत्या. त्या तुकड्यांनी सुद्धा मुघल तुकडीला हैराण केले होते. औरंगजेबाने तब्बल तीन सरदारांना रामशेज जिंकण्यासाठी पाचारण केले परंतु एकालाही हा किल्ला जिंकला आला नाही. सलग ५ वर्षे हा किल्ला अजिंक्य राहिला. सूर्याजी जेधे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा किल्ला अजिंक्य ठेवला.

संभाजी महाराज कैद

१६८९ च्या सुरुवातीस संभाजीराजे यांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांची बैठक कोकणात संगमेश्वर येथे आयोजित केली होती. १ फेब्रुवारी १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संभाजी महाराज यांच्या ३००-४०० च्या तुकडीवर आपले ३००० चे सैन्य घेऊन संगमेश्वराजवळ चालून आला. मराठ्यांच्या आणि शत्रूच्या सैन्यात मोठी चकमक उडाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. मराठ्यांचा राजा वैरांच्या मगरमिठीत सापडला. पकडलेल्या संभाजी महाराज व कवी कलाश यांना बहादूरगडमध्ये नेण्यात आले, जेथे औरंगजेबाने त्यांची विदूषक कपडे घालून धिंड काढली.

संभाजी महाराज इतिहास

संभाजी महाराजांना मराठ्यांसह आपल्या किल्ले, खजिना मुघल साम्राज्याला बहाल करण्यास सांगितले गेले. परंतु झुकेल तो मराठा राजा कसला. ‘मोडेन पण वाकणार नाही‘ चा नारा देत मराठा साम्राज्याचा राजा मुघलांचे अत्याचार सोसत राहिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.

औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. औरंगजेबाला तुळापूरच्या संगमावर संभाजी महाराज यांना हलाल करावयाचे होते. आपकी एकनिष्ठा न सोडणाऱ्या संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलश यांचेही डोळे काढण्यात आले. एवढे करूनही संभाजी महाराज डगमगले नाहीत.

औरंगजेबाने संभाजी महाराजाना पुढील शिक्षा जीभ कापायची दिली. दोन हबशी पुढे सरसावले, पण संभाजी राजांचा जबडा काही उखडेना. शेवटी हबशींनी नाक दाबले तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले तोच त्यांच्या तोंडात पक्कड घुसवली गेली. त्या पकडीत पकडलेली त्यंची जीभ तलवारीने कापली.. त्यांच्यावर चाललेले हे अत्याचार पाहुन भीमा-इंद्रायणी सुद्धा रडु लागली. अखेर संभाजी महाराज यांची ११ मार्च १६८९ रोजी भीमा – इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे हत्या करण्यात आली.

संभाजी महाराज
तुळापूर येथे संभाजी महाराज यांची हत्या झाली येथील दगडशिल्प

स्वराज्याचा धनी अनंतात विलीन झाला. एवढे अत्याचार करून सुद्धा मराठ्यांचा राजा झुकला नाही. याची सल औरंगजेबाला कायम राहिली.

संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्यात आले. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी पेरून ठेवलेली स्वराज्याची शिकवण पुढेही मराठ्यांनी वाढवत नेली.

अशा स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांना @PuneriSpeaks कडून मानाचा मुजरा..!

संभाजी महाराज यांचा पराक्रम शाहीर योगेश यांनी आपल्या पोवाड्यातून सांगितला आहे.

देश धरम पर मिटने वाला। शेर शिवा का छावा था।।
महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था।।
तेज:पुंज तेजस्वी आँखें। निकलगयीं पर झुकी नहीं।।
दृष्टि गयी पर राष्ट्रोन्नति का। दिव्य स्वप्न तो मिटा नहीं।।
दोनो पैर कटे शंभू के। ध्येय मार्ग से हटा नहीं।।
हाथ कटे तो क्या हुआ?। सत्कर्म कभी छुटा नहीं।।
जिव्हा कटी, खून बहाया। धरम का सौदा किया नहीं।।
शिवाजी का बेटा था वह। गलत राह पर चला नहीं।।
वर्ष तीन सौ बीत गये अब। शंभू के बलिदान को।।
कौन जीता, कौन हारा। पूछ लो संसार को।।
कोटि कोटि कंठो में तेरा। आज जयजयकार है।।
अमर शंभू तू अमर हो गया। तेरी जयजयकार है।।
मातृभूमि के चरण कमलपर। जीवन पुष्प चढाया था।।
है दुजा दुनिया में कोई। जैसा शंभू राजा था?।।

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा

For More:

आपल्या समाजाला न कळलेले संभाजी महाराज…

पानिपत तिसरे युद्ध माहिती, पानिपत लढाई, मराठा साम्राज्य, सदाशिवरावभाऊ पेशवे, पानिपत युद्ध मराठी, अहमद शाह अब्दाली, बाजीराव पेशवे

स्वामी विवेकानंद ज्यांनी जगाला दिली बंधुभावाची शिकवण.

राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक यांच्याविषयी खास

पानिपतवीर दत्ताजी शिंदे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

LEAVE A REPLY