सोशल मीडिया एक भस्मासूर…! पडताळणी न करता मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांसाठी ही पोस्ट

0
सोशल मीडिया एक भस्मासूर…! पडताळणी न करता मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांसाठी ही पोस्ट

सोशल मीडिया एक भस्मासूर…!

आपल्या भागात लहान मुले पळवणारी टोळी आली आहे, ते कारमधून येतात, तुमच्या मुलांना सांभाळा…अशा आशयाचे मेसेज सध्या व्हॉट्स अॅपवर फिरताना कायम दिसतात. भरतीला गेलेल्या मुलाची कागदपत्रे सापडली आहेत, कागदपत्रांसाठी या नंबर वर संपर्क करा. अशा या मेसेजमध्ये किरकोळ बदल करुन सोबत पुरावा म्हणून अपहरणाच्या जुन्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज, एखाद्या मुलाच्या कागदपत्रांचे फोटो जोडून तसे मेसेज सर्वदूर पसरवले जातात. काळजीपोटी कसलाही विचार न करता अनेक जण हे मेसेज फॉरवर्ड करत सुटतात. पण प्रकारचे मेसेज काहींच्या जीवावर बेतू लागले आहेत.

सोशल मीडिया या साधनाचा वापर करून समाजात अशांतता, दंगल घडल्याचा अनेक घटना आहेत. सोशल मीडिया एखाद्याला रस्त्यावर आणू शकते. एखादा व्यवसाय बुडवू शकते किंवा एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव देखील घेऊ शकते. औरंगाबादमधील वैजापूर, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणापासून गुजरात ते अगदी त्रिपुरातील आगरतळा येथे मुले पळवणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याच्या संशयातून जमावाने निष्पापांना बेदम मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. या मारहाणीत निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. आज रात्री 12 वाजता पृथ्वीवर कॉस्मिक किरणे पडणार आहेत तरी शेजारी मोबाईल घेऊन झोपू नये, बाहेर पडू नये अशा आशयाचे मेसेज पसरवून लोकांच्यात भीती पसरवत आहेत.

एका आकडेवारीनुसार गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात लहान मुले पळवणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याच्या संशयातून जमावाकडून मारहाण झाल्याच्या जवळपास २० घटना घडल्या आहेत. कर्नाटकमध्ये ३, तेलंगणात ५, आसाममध्ये १, गुजरातमध्ये १, ओडिशामध्ये ३, आंध्र प्रदेशमध्ये ३, तामिळनाडूमध्ये ४, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 1 घटना घडली आहे. यातूनच फेक मेसेज किती घातक ठरु शकतात यांचा अंदाज आपल्याला आला असेल. भारतात जवळपास 50 कोटी लोक इंटरनेट वापरतात आणि त्यामुळे कोणताही फेक मेसेज लोकांपर्यंत सहज पोहचला जातो.

कर्नाटकमध्ये मे महिन्यात २६ वर्षांच्या तरुणाची जमावाने हत्या केली. चोरी करणारा गुंड असल्याचा संशय जमावाला आला. मात्र, तो राजस्थानचा रहिवासी होता आणि कर्नाटकात पान विकण्याचे काम तो करायचा. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही नव्हती. पण जमावाने त्याची हत्या केली. तर निजाबामादमध्ये मूकबधीर तरुणाला आणि भद्रादी कोठागुदेम जिल्ह्यातील सरापाका येथे मनोरुग्ण महिलेला याच संशयातून बेदम मारहाण करण्यात आली. यातून या फेक मेसेजचा कोणत्या वर्गाला बसतो, हे देखील लक्षात येते.

असाच प्रकार काही महिन्यांपूर्वी गोमांसबाबतही झाला होता. मास नेणाऱ्या ट्रकमध्ये गोमांस असल्याचा संशय आल्याने जमावाने ट्रकचालकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनांमागेही व्हॉट्सअॅपवरील पोस्ट कारणीभूत ठरली होती.

मे महिन्यात केरळमधील हॉटेल मालकांच्या संघटनेने पोलिसांकडे तक्रार केली होती. केरळमधील हॉटेलमध्ये मटणासाठी कुत्र्याचे मास वापरल्याची पोस्ट फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाली. याचा फटका हॉटेल उद्योजकांना बसला आणि शेवटी त्यांनी या फेक पोस्ट विरोधात तक्रार केली. काही परदेशी हॉटेल उद्योजक हे फेक मेसेज पसरवून छोट्या हॉटेल उद्योजकांना संपवत असल्याचा संशय हॉटेल मालकांच्या संघटनेने व्यक्त केला होता. यात कितपत तथ्य होते, हे अद्याप समोर आलेले नाही. पण असे फेक मेसेज पसरवून कोण कसा फायदा घेईल, हे सांगता येत नाही.

जून २०१४ मध्ये पुण्यात काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर टाकल्याने परिसरात हिंसाचार झाला. यात मुस्लीम समाजातील सुशिक्षित तरुणाला नाहक जीव गमवावा लागला. त्या आक्षेपार्ह पोस्टशी अभियंत्याचा दुरान्वयेही संबंध नव्हता.

या सर्व घटनांतून आपण कधी बोध घेणार, हा आता मुख्य प्रश्न आहे. व्हॉट्स अॅपवर येणारा मेसेज किंवा फेसबुकवरील एखादी पोस्ट ही खरीच असेल असे समजून ते फॉरवर्ड किंवा शेअर करणे थांबवणे गरजेचे आहे. आला मेसेज की दिला पाठवून ही वृत्ती बंद झाली पाहिजे. एखाद्या मेसेजबद्दल खात्री करुन घ्यायची असेल तर गुगल किंवा अन्य माध्यमातून त्याची सत्यता पडताळता येईल. वेळप्रसंगी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून खातरजमा करता येईल. स्मार्ट सिटी आणि विश्वसत्ता चे स्वप्न पाहणाऱ्या या देशातील नागरिकांनी आधी जबाबदार नेटिझन होणे ही आधुनिक काळाची गरज आहे.

(हा लेख लोकसत्ता वृत्तपत्रातील लेखावर आधारित आहे)

साभार: Loksatta

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

सोशल मिडीया आणि आपली मानसिकता…

Pune Mumbai Hyperloop: Virgin Hyperloop Signs Contract with Maharashtra Government To Cut Down 140 km Travel Time To Only 25 Mins

Mumbai vs Pune Memes: Mumbai Pune Jokes all in one Combo Pack, Who is the Best? Pune or Mumbai

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.