ऐन दिवाळीत एस टी कर्मचाऱ्यांचा संप; ६० लाख प्रवाशांचे हाल !

0
ऐन दिवाळीत एस टी कर्मचाऱ्यांचा संप; ६० लाख प्रवाशांचे हाल !

एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप सुरु होऊन 24 तासांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. आज कामावर न परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनानं दिला आहे.

संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं अल्टिमेटम दिला आहे. तसंच निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल, अशी तंबी देखील देण्यात आली आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या संपामुळे ऐन दिवाळीत गावी जाणाऱ्या सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेनं राज्यव्यापी संप पुकारला आहे.

कामगारांच्या असंतोषाला ‘काँग्रेस’ कारणीभूत असल्याचे सांगत, रावते यांनी आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. खासगी वाहन चालकांनी प्रवाशांची लूट केली. इंटक, कामगार संघटना, मोटर कामगार फेडरेशन, कनिष्ठ कर्मचारी आणि कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सुमारे एक लाख कर्मचारी संपात सहभागी झाले आहे.

एसटी कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत चर्चेतून तोडगा काढू. कर्मचा-यांनी कामावर परत यावे. बेस्ट कर्मचारी संपात गरज पडल्यास मी स्वत: हस्तक्षेप करेन.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

एसटी ५० वर्षे तोट्यात आहे. त्यामुळे पुढची २५ वर्षे सातवा वेतन आयोग देणे अशक्य आहे. मात्र काही माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. सातव्या वेतन आयोगाची मागणी अयोग्य आहे. वेतनवाढीसाठी मी तयार आहे. संघटनांनी चर्चेसाठी यावे, मी वेतनवाढ देतो. – दिवाकर रावते, परिवहन मंत्री-एसटीचे अध्यक्ष

एसटी कर्मचा-यांना ८ ते ९ हजारावर काम करावे लागते़ १९९५ पर्यंत राज्य सरकारी कर्मचारी आणि एसटी कामगारांचे वेतन समान होते. किमान १८ हजार रुपये वेतन द्यावे. दीड वर्षांपासून आम्ही मागण्यांचा पाठपुरावा करीत आहोत़ वेळोवेळी संपाची नोटीस दिली. मात्र, सरकारने दुर्लक्ष केले.
– हनुमंत ताटे, सरचिटणीस,
एस. टी. कामगार संघटना

परिवहन खाते शिवसेनेकडे असल्याने भाजपाने जाणीवपूर्वक आंदोलनाबाबत उदासीन भूमिका तर घेतली नाही ना, अशी शंका विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली आहे.

आज कामावर रुजू व्हा
बुधवारी कामावर रुजू व्हा, अन्यथा बडतर्फ करू, असे आदेश एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिले आहेत.

22कोटींचा एका दिवसात फटका
संपामुळे मंगळवारी एसटीचे २२ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. गेल्या दिवाळीत महामंडळाला सुमारे ८०-९० कोटींचे उत्पन्न मिळाले होते.

खासगी वाहन मालकांकडून लूट

मार्ग आकारलेले दर (रुपये)
पुणे-जालना ३५००
पनवेल-पुणे ५००
नाशिक-अहमदनगर ८००
मुंबई-पुणे १२००

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :

  • एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
  • पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी
  • जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा इतिहास

याआधी 1972 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा 12 दिवसांचा संप झाला होता. त्यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यानंतर 1996, 2007 सालीही संप झाले होते.

किती एसटी गाड्या, किती कर्मचारी संख्या?

  • राज्यात एसटीची कर्मचारी संख्या 1 लाख 2 हजार असून, एसटी बसची संख्या 17 हजार आहे.
  • दररोज 70 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात.
  • एसटीच्या आगारांची संख्या 258, विभागीय कार्यालयांची संख्या 31 आहे.

एसटी संपावरुन खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना सवाल, ऐन दिवाळीत प्रवाशांच्या होणाऱ्या हालाला जबाबदार कोण? #एसटीसंप

 

तसेच विरोधकही आक्रमक झालेत…

LEAVE A REPLY