टाटा समूह माहिती: देशाच्या प्रगतीचा वसा घेतलेले ध्येयवेडे टाटा !

0
टाटा समूह माहिती: देशाच्या प्रगतीचा वसा घेतलेले ध्येयवेडे टाटा !

ज्या देशात आपण जगतो, त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. ‘आपण देशासाठी असू तर देश आपल्यासाठी असेल’ ही भावना जर कृतीला चालना देऊ शकली तर काय चमत्कार घडू शकतात हे जगाला दाखवून दिलं टाटा उद्योग समूहाने. शंभरहून अधिक काळ केवळ देशाच्या प्रगतीचाच वसा घेतलेल्या या विलक्षण कुटुंबाबद्दल, उद्योग समूहाबद्दल आदर, अभिमान वाटावा तेवढा कमीच आहे. सतत दूरदृष्टी ठेवून, प्रवाहाविरुद्ध पोहत राहून प्रवाहाचीच दिशा बदलणारे ध्येयवेडे टाटा !

टाटा समूह माहिती

भारत पारतंत्र्याच्या विळख्यात सापडला होता तेव्हा संपूर्ण देशाला फक्त एकाच ध्यासानं झपाटून टाकलं होतं – अर्थातच स्वातंत्र्यप्राप्तीच्या. घराघरातील आबालवृद्ध तेव्हा फक्त एकच स्वप्न पाहत होते- स्वतंत्र भारताचं. मात्र, काळाच्या पुढचा विचार करणारे फार थोडे लोक असतात आणि त्यानुसार कृती करणारे तर त्याहून मोजके. जमशेदजी टाटा (१८३९ -१९०४) हे त्यापैकीच एक ध्येयवादी द्र्ष्टे व्यक्तिमत्व. भारत स्वतंत्र होणारच याची पूर्ण खात्री असल्यामुळेच ‘पुढे काय?’ हा प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता., पारतंत्र्यामुळे खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था, धर्मजातीवरुन समाजात पसरलेला विषमतेचा असंतोष, नेतृत्वाचा अभाव,राजकीय अस्थिरता आणि राष्ट्र संरक्षक समर्थ शस्त्रास्त्रे व सैन्याची तीव्र गरज या सर्व मोठमोठ्या समस्यांपुढे भारताचा औद्योगिक विकास या गोष्टीचा अनुक्रम फार नंतरचा होता. मात्र भारतातील सामान्य माणसाला जोवर देशासाठी काम करुन पैसा उभा करता येणार नाही तोवर देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकणार नाही हा जमशेदजींचा विचार होता. राष्ट्रउभारणी म्हणजे आधी उद्योगधंद्यांचा विकास हे त्यांचे सूत्र होते.

टाटा समूह सुरुवात

गुजरातमधील एका लहानशा गावात पारशी कुटुंबात जन्मलेल्या जमशेदजींना उद्योगधंद्याची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. अर्थातच घरच्यांचा विरोध पत्करुन स्वत:चं नशीब आजमावायला ते मुंबईत आले तो काळ अत्यंत खडतर होता. कारण नुकताच ब्रिटीश सरकारने १८५७ चा उठाव चिरडला होता. ग्रॅज्युएट झालेल्या जमशेदजींना युरोप, इंग्लंड, अमेरिका येथे जाऊन आल्यावर समजलं की इंग्लंडचं वर्चस्व असलेल्या कापड उद्योगात खरंतर भारतानं मुसंडी मारली तर प्रचंड संधी उपलब्ध होतील.त्यादृष्टीने त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. सुरुवातीला एकवीस हजार रुपये भांडवल गुंतवून जमशेदजींनी त्यांची पहिली कंपनी स्थापन केली. पुढे काही बंद पडलेल्या तेल गिरण्या, कापड गिरण्या विकत घेऊन, विकून त्यांनी उद्योग वाढवण्यास प्रारंभ केला. जमशेदजींना चार क्षेत्रांत स्वतःचा आणि अर्थातच भारताचा ठसा निर्माण करायचा होता – पोलाद कारखाने,अग्रेसर शिक्षणसंस्था,भारतातील सर्वोत्कृष्ट हॉटेल आणि जलविद्युत केंद्र. ज्यापैकी फक्त एक स्वप्न पूर्ण झालेले ते स्वत: पाहू शकले. ते स्वप्न म्हणजे ‘द ताजमहल पॅलेस हॉटेल’! टाटांच्या मुकुटातील पहिला शिरपेच!

जमशेदजींना सर्वोत्कृष्ट हॉटेलच का निर्माण करावेसे वाटले त्याचा ऐकीव इतिहास रंजक आहे. त्यांच्या परदेशप्रवासात एका युरोपियन हॉटेलमध्ये त्यांना प्रवेश नाकारला तो एका पाटीने; जिच्यावर ‘कुत्र्यांना व भारतीयांना प्रवेशबंदी’ असे लिहीले होते. साहजिकच या प्रकाराने जमशेदजी व्यथित झाले आणि त्यांनी भारतीयांसाठी असेच उत्कृष्ट हॉटेल स्वतः उभारण्याचा निश्चय केला. यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे औद्योगिक विकास साधायला परदेशी तंत्रज्ञान भारतात आणायचे तर परदेशी तंत्रज्ञांची राहण्याची खाण्यापिण्याची सोय त्यांच्या पद्धतीने हवी. त्यांच्या पद्धतीचे पदार्थही इथे फारसे उपलब्ध नसत. त्याकाळात उंदरांच्या सुळसुळाटामुळे आणि प्लेगच्या भयंकर साथीमुळे परदेशी लोक भारतीय हॉटेलांमध्ये थांबायला स्पष्ट नकार देत. भारतातच काय पण आशियातही तेव्हा तशी स्वच्छ, सुंदर आलिशान हॉटेल्स मोजकीच होती. तेव्हा युरोपीयन व अमेरिकन तोलामोलाची सोय आपण केली तरच प्रगत तंत्रज्ञान आपण देशात आणू शकू हे जमशेदजींनी ओळखले व सर्वसुखसोयींनी युक्त अशा ‘ताज’ ची उभारणी सुरु झाली.
त्या काळातील बेचाळीस कोटी रुपये खर्च करुन ३ डिसेंबर १९०३ रोजी उद्घाटन झालेले ‘ताजमहल’ हे वीज वापरणारे देशातले पहिले हॉटेल होते! यापूर्वी भारतीयांच्या कधी दृष्टीसही न पडलेल्या अमेरिकन पंखे, जर्मन लिफ़्ट्स, तुर्की बाथटब अशा अनेक सुखसोयींनी युक्त असे आणि विशेष म्हणजे इंग्लिश नोकर दिमतीला असणारे ताज हॉटेल हे कलियुगातल्या मयसभेपेक्षा कमी नव्हते! १९०४ मध्ये जमशेदजींच्या मृत्यूपश्चात कित्येक वर्षं ही वास्तू टाटा कुटुंबीयांसाठी स्मृतींच्या ठेव्यापेक्षा अधिक नव्हती. पण कालांतराने त्या वास्तूचं मूल्य आणि व्यावसायिक महत्व दोन्हीही वाढत गेलं आणि आज टाटा उद्योग समूहात ‘ताज’ अव्वल स्थानावर आहे.

Tata group taj hotel

जमशेदजींच्या मृत्यूपश्चात बिहारमधल्या साक्ची या छोट्याशा गावात टाटांचा लोखंड व पोलादाचा कारखाना उभारण्यात आला. बघता बघता त्या गावाचं एका मोठ्या शहरात रुपांतर झालं आणि तेथील रेल्वेस्टेशनला ‘टाटानगर’ नाव देण्यात आलं. सध्या झारखंडमध्ये असलेल्या या शहराचं नाव जमशेदजींच्या गौरवार्थ ‘जमशेदपूर’ असं देण्यात आलं. आज टाटा गृपच्या १०० कंपन्या जगाच्या सहा खंडांतील ऐंशी देशांत कार्यरत आहेत. त्यातल्या काही मोठ्या कंपन्या म्हणजे टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा ग्लोबल बिव्हरेजेस, टाटा टेलिसर्व्हिसेस, टायटन इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन्स आणि ताज हॉटेल्स. एके वर्षी टाटांच्या एका कंपनीत लहान मुलांसाठी एक स्पर्धा ठेवण्यात आली होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण वापरत असलेल्या वस्तूंची नावे लिहायची होती. त्यातली प्रत्येक वस्तू टाटाचे उत्पादन आहे का नाही ते शोधायचे होते. गंभीरपणे विचार केला तर खरोखरच मीठापासून गाडीपर्यंत प्रत्येक वस्तूच्या उत्पादनात टाटाचा हात आहे! युवावर्गात सुप्रसिद्ध असलेले ब्रँड्स- दोराब्जीज, वेस्टसाईड, तनिष्क टाटाचेच आहेत. अर्थातच हे साध्य करण्यासाठी शंभर वर्षांहून अधिक काळ जावा लागला. पण त्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत, जिद्द, चिकाटी आणि देशप्रेम हे टाटांच्या पिढ्यापिढ्यांमध्ये वारसाहक्काने येत गेलं हे आपलंच सद्भाग्य !

उपरोल्लेखित अनेक कंपन्या, उत्पादनांच्या निर्मितीमागे काही खास कहाण्या आहेत. अनेक गोष्टी केवळ टाटांमुळे भारतात आल्या असं म्हणणं मुळीच अतिशयोक्तीचं होणार नाही. उदाहरणार्थ, आज संपूर्ण देश उज्ज्वल भवितव्यासाठी ज्या क्षेत्राकडे आशेने बघतो आहे ते माहिती तंत्रज्ञान! १९६८ साली मुंबईत स्थापन झालेली ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ ही देशातील प्रथम क्रमांकाची, सर्वाधिक सॉफ्टवेअर निर्मिती करणारी संस्था होती. आयआयटीच्या स्थापनेनंतर देशात ठिकठिकाणी विशिष्ट आणि विविध प्रकारची सॉफ्टवेअर विकसित करणार्या संस्था उभारुन मनुष्यबळाचा यथोचित वापर व देशाचा सर्वांगीण विकास साधायची मोहीम आखली गेली.१९७३ मध्ये यातील पहिले केंद्र मुंबईत ‘नॅशनल सेंटर फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड कम्प्युटिंग टेक्निक्स’ अर्थातच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये उभारले गेले. भारतातील आद्य आयटी कंपनी असूनही आजही सर्वाधिक कर्मचारी असलेली ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ जगातील पहिल्या पाच मोठ्या आयटी कंपन्यात प्रथम क्रमांकावर आहे.
१९४५ मध्ये स्थापन झालेली टाटा मोटर्स १९५४ साली जर्मनीतील Daimler Benzशी हातमिळवणी करून औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त वाहनांच्या निर्मितीत उतरली. टाटाने बनवलेली पॅसेंजर कार ,व्हॅन, एस,ट्रक, कोच,बसेसपासून एम्यूव्ही, एस्यूव्ही, मिलिटरी ट्रक पर्यंत सर्व प्रकारची वाहने देशाच्या छोट्या मोठ्या उद्योगांसाठी वरदान ठरली. टाटा मोटर्सने देशाच्या दळणवळणाच्या साधनांमध्ये शब्दश: गती आणली. केवळ भारतात वाहननिर्मिती करून टाटा थांबले नाहीत तर मार्कोपोलोशी संधान बांधून तसेच डेवू, जेग्वार लेंडरोव्हर सारखे जगप्रसिद्ध ब्रँड काबीज करून आपली ताकद जगाला दाखवून दिली.

उद्योजकांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरवल्यावर टाटांनी पुन्हा एकदा सामान्य मध्यमवर्गाचा विचार करायला सुरुवात केली. अत्यंत मूलभूत सुविधा असलेली जेमतेम आकाराची मारुती८०० ही एकमेव गाडी तेव्हा त्यातल्या त्यात उच्च मध्यमवर्गाला परवडत होती. तेव्हा संपूर्ण देशी तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त आधुनिक सुविधांनी सुसज्ज तरीही खिशाला परवडणारी म्हणून जगभर चर्चेचा विषय झालेली टाटा इंडिका १९९८ मध्ये बाजारात आली. सुरुवातीच्या टीकेला इंडिकाने पहिल्याच आठवड्यात एका लाख पंधरा हजार बुकिंग्ज मिळवून सडेतोड उत्तर दिले. वाजवी किंमत आणि आरामशीर अंतर्रचना यांनी इंडिकाची ‘मोअर कार पर कार’ ही घोषणा सिद्ध करून दाखवली. श्रीमंत वर्गाच्या इंपोर्टेड गाड्यांतच केवळ असणाऱ्या एसी, पॉवर विंडोज, पॉवर स्टॆरिंग, अलॉय व्हील्स यांसारख्या अनेक वैशिष्ट्यांमुळे दोनच वर्षात तशा प्रकारच्या कार्समध्ये प्रथम क्रमांक पटकवून इंडिकाने इतिहास घडवला.

पण एवढ्यावरच थांबतील ते टाटा नव्हेत! त्यानंतर बरोबर अकरा वर्षांनी टाटांनी दुसरा इतिहास घडवला लाखाची गाडी – नॅनो तयार करून! मधल्या दहा वर्षात देशाची आर्थिक स्थिती सुधारली. इंडिकाचे जे ग्राहक होते त्यांच्या खिशाला परवडेल असे अनेक गाड्यांचे पर्याय देशात उपलब्ध झाले. परंतु कनिष्ठ मध्यमवर्ग मात्र अजूनही उन्हापावसात पोराबाळांना घेऊन दुचाकीवर कसरत करत आहे. लघुउद्योजकांना अतिशय अल्प प्रमाणात मालाची वाहतूक करायला दरवेळेस ट्रक, टेंपो परवडत नाही. एक दीड लाखापर्यंत कर्ज काढण्याची क्षमता असूनही त्यांची म्हणावी तशी वाहतूकीची सोय होऊ शकत नव्हती हे टाटा मोटर्सने हेरले. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ हे संपूर्ण टाटा समूहाचे मूळ तत्व असल्याने या वर्गासाठी लाखाची गाडी तयार करून दाखवण्याचा विडा उचलला. या निर्मितीत अनेक अडथळे आले. परंतु ज्या नेक इराद्याने टाटाने ही प्रतिज्ञा केली आहे त्यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून कारमध्ये लागणार्या लाखो यंत्रतंत्र निर्मिती करणाऱ्या देशी विदेशी कंपन्या स्वत:हून सर्वतोपरी मदतीसाठी पुढे आल्या. उत्तम दर्जाचे सुटे भाग कमीत कमी किंमतीत उपलब्ध करून देऊन लाखमोलाची नॅनो तयार होऊ लागली. सुरक्षा, इंजिन क्षमता अशा काही बाबतीत मात्र तडजोड करण्यास खुद्द रतन टाटांनीच नकार दिल्याने गाडीची एकूण किंमत दीड लाखाच्या आसपास गेली. इतक्या कमी किंमतीत गाडी कशी तयार केली याची उत्सुकता जगभरातल्या मोटर कंपन्यांना होती. त्याविषयीचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे.जपानहून काही तज्ञ नॅनोबद्दल जाणून घेण्यासाठी आले होते. इतकी छोटीशी असून आतून एवढी प्रशस्त गाडी पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. बाहेरून खूप निरीक्षण करूनही त्यांना गाडीचे इंजिन नक्की कुठे असेल याचा अंदाज येईना तेव्हा ते खाली वाकून बसून गाडीच्या तळाची पाहणी करू लागले. या प्रसंगाचे वर्णन ‘टाटाने जपान्यांना गुडघे टेकायला लावले’ अशा गौरवपर शब्दात प्रसिद्ध झाले! ही गाडी बनवण्यासाठी एका वायपरपासून ते हेलिकॉप्टरच्या रिक्लायनर्सपर्यंत अनेक युक्त्या क्लृप्त्या वापरून भारतीय बुद्धिमत्तेची चुणूक जगाला दाखवण्यात आली. नॅनोच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रत्यक्ष रतन टाटांचे भाषण ऐकून भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. आज जेव्हा ही गाडी खेड्यापाड्यातल्या रस्त्यावरून आपलं काम चोख बजावत पळत असते किंवा शहरातल्या आलिशान मोठ्या महागड्या गाड्यांमधून लाडाचं शेंडेफ़ळ बनून रस्ता शोधत पुढे सटकते तेव्हा त्या हजारो हातांनी घेतलेल्या कष्टाचं सार्थक झाल्यासारख वाटतं. जिद्द असेल तर या देशात आपण काय करू शकतो हे जगाला दाखवून देणारी नॅनो ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ उक्ती सार्थ करून भारताच्या इतिहासात मानाचं पान बनून राहील.

देशाच्या विकासाबाबत टाटा गृप सदोदित जागरुक राहिला आहे. मग तो विकास औद्योगिक असो, सामाजिक असो वा राजकीय पातळीवर असो. देशातील तरुण पिढीचं एकूणच देशाच्या नेतृत्वाबद्दलचं, राजकीय घडामोडींबाबत, अक्षरशः मतदानाविषयीही असलेलं औदासिन्य पाहून २००८ मध्ये टाटाने एक मोहीम हाती घेतली. “टाटा टी जागो रे” असं तिचं नाव. ‘जागो रे’ वाचताक्षणीच आठवतात त्या अत्यंत विचारपूर्वक केलेल्या आणि विचार करायला भाग पाडणार्‍या काही स्मरणीय जाहिराती. २००८ मध्ये या मोहीमेचं उद्दिष्ट होतं सर्वाधिक मतदार नोंदणीचं. त्यात लक्षणीय यश मिळाल्यावर सध्या ‘जागो रे’ चं ध्येय आहे ‘सिम्प्लीफाय!’ वरवर क्लिष्ट आणि कटकटीच्या वाटणार्‍या अनेक गोष्टी, मुख्यत: कायदेशीर बाबी मुळात तशा का आहेत, आपण त्यासाठी कोणती माहिती पुरवणं आणि घेणं आवश्यक आहे इत्यादीबाबत खुलासा करणारी ही मोहीम आहे. ‘सिम्प्लीफाय!’ चा पहिला विषय आहे- ‘पोलिसांची माहिती’ किंवा ‘नो युवर पुलिस’. ‘जागो रे’च्या माध्यमातून थेट कृतीमध्येही सहभागी होता येत असल्याने युवावर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

टाटांची सामान्यांविषयी तळमळ अधोरेखित करणारी आणखी अनेक उदाहरणे आहेत. २००४ मध्ये दक्षिण भारतात झालेल्या भीषण त्सुनामीनंतर हजारो लोकांना प्यायला शुद्ध पाणी मिळेनासे झाले. तेव्हा बाजारात उपलब्ध असणारे फिल्टर्स हे विजेवर चालणारे आणि महागडे होते. तेव्हा त्सुनामीच्या तडाख्यात सापडलेल्या या दुर्दैवी लोकांना किमान पिण्याचे पाणी तरी शुध्द आणि कमी किंमतीत मिळावे म्हणून ‘टाटा स्वच्छ’ चा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला. वीजेऐवजी नॅनोटेक्नॉलॉजी वापरून पाणी शुद्ध करणारा तसेच वापरायला सोपा असा हा फ़िल्टर हजार रुपयांच्या आत उपलब्ध करून देण्यासाठी देशातील अतिशय हुशार शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली.
देशाच्या विकासासोबत सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर व्हावे, त्यांचा राहणीमानाचा दर्जा सुधारावा म्हणून एका शतकाहून अधिक काळ टाटा उद्योगसमूह कार्यरत आहे. हे सर्व केवळ उत्पादन निर्मितीतूनच साध्य करून नाही तर कर्मचार्‍यांच्या हक्क आणि अधिकारांसाठीही टाटा सदैव जागरूक राहिले आहेत. ’कामाचा दिवस आठ तासांचा’ ही संकल्पना मांडून प्रत्यक्षात अवलंब करणारी टाटा ही जगातली पहिली कंपनी होती. त्यापूर्वी काम संपेपर्यंत अथवा साहेब सांगेपर्यंत काम करणे हीच रूढ पद्धत होती. १९१७ मध्ये सर्वप्रथम त्यांनी टाटा कर्मचार्‍यांकरता वैद्यकीय सेवा पॉलिसी सुरु केली. आधुनिक निवृत्ती वेतन, कर्मचार्यांना नुकसान भरपाई, मेटर्निटी बेनिफ़िटस आणि नफ्याचे समभाग वितरण देऊ करणारी टाटा ही जगभरात आद्य संस्था आहे.

सुदैवाने आजही टाटा उद्योग समूहाची सामान्य नागरिकासाठीची कळकळ तितकीच जिवंत आहे याचं प्रत्यंतर अनेकदा येतं. ज्या ‘ताज’ हॉटेलला एवढा देदीप्यमान इतिहास आहे तिथेच २००८ मध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे उभा देश हळहळला. ‘औद्योगिक भारताचे जनक’ जमशेदजी टाटा यांचं सुंदर स्वप्न भंगलं होतं. टाटा समूहासाठी हा आर्थिक फटका तर होताच पण त्याहून अधिक भावना दुखावणारा धक्का होता. परंतु तेव्हाही कोणतीही अतिरंजित विधाने करून प्रसिद्धी मिळवण्याचा मोह न धरता त्यांनी कर्तव्याला श्रेष्ठता दिली. या हल्ल्यात विनाकारण भरडल्या गेलेल्या सोळाशे कर्मचार्यांची तसेच रेल्वे, पोलीस कर्मचार्यांची, पादचार्‍यांची शुश्रूषा टाटाने केली. आजूबाजूच्या लोकांनाही आवश्यक ती सर्व मदत पोहचवली गेली. कर्मचारी तसेच कुटुंबीयांकरता या अनपेक्षित धक्क्यातून सावरण्यासाठी आणि पुढील आयुष्य जगायला बळ मिळण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मृतांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारआधी टाटाने उचलली. लाख मेले तरी लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे याची शब्दशः प्रचिती या प्रसंगात आली.

खरंतर टाटांविषयी ही फक्त झलक आहे. त्यांचं कार्य, देशाच्या विकासातलं योगदान ‘भरीव’ हा शब्दही पोकळ, क्षुल्लक वाटावा इतकं महान आहे. शंभर सव्वाशे वर्षापूर्वी आपल्यातल्याच एका माणसाने एक स्वप्न पाहिलं.त्यासाठी त्याच्यासह पुढच्या कित्येक पिढ्यांनी जिवाचं रान केलं आणि आजचं हे नंदनवन उभं राहिलं. फक्त देशाची आर्थिक बाजू भक्कम करणारं हे स्वप्न मुळीच नव्हतं. तर देशाच्या सामान्य नागरिकाला सन्मानानं जगता यावं, त्याच्या सर्व गरजा त्याच्या आवाक्यातच पूर्ण व्हाव्यात आणि त्यासाठी त्याला आवश्यक त्या सर्व गोष्टी देशानेच पुरवल्या पाहिजेत असा त्यांचा दृष्टीकोन होता. आज एकूण जगातील प्रगत देशांचा विचार केला तर अजून पुष्कळ पल्ला गाठायचा आहे. खरंतर खेदजनक आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे की जमशेदजींच्या काळात देशापुढे आ वासून उभ्या असलेल्या खिळखिळी अर्थव्यवस्था, धर्मजातीवरुन समाजात पसरलेला विषमतेचा असंतोष, नेतृत्वाचा अभाव,राजकीय अस्थिरता या समस्या आजही तशाच आहेत! त्यातच सतत बदलणारी सरकारी धोरणं, बोकाळलेला भ्रष्टाचार या अधिकच बिकट आव्हानांची भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या व्रतस्थ कर्मयोग्याप्रमाणे मूळ ध्येयापासून, तत्वांपासून विचलित न होता केवळ सामाजिक बांधिलकी, सामान्यांविषयी तळमळ, प्रामाणिक देशप्रेम, प्रचंड मेहनत, जिद्द चिकाटी यांच्या आधारावर टाटांनी भारताला जगाच्या नकाशात जे स्थान मिळवून दिलं आहे त्यासाठी संपूर्ण देश सदैव त्यांच्या ऋणात राहील.

(हा लेख माहितीपर घेतला असून लेखकाने क्रेडिट्स साठी संपर्क करावा)

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

पानिपत तिसरे युद्ध माहिती, पानिपत लढाई, मराठा साम्राज्य, सदाशिवरावभाऊ पेशवे, पानिपत युद्ध मराठी, अहमद शाह अब्दाली, बाजीराव पेशवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती: बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी….

मोबाईल एअरबॅग केस डिज़ाइनचा शोध, पडताच स्वयंचलितरित्या उघडून मोबाइलला वाचवणार

LEAVE A REPLY