आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी खास..

0
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी खास..

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan यांची महाराष्ट्र मुख्यमंत्री कारकीर्द म्हणजे महाराष्ट्र घडणकाळ समजला जातो. Photo Credit's

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan

जन्म:- मार्च १२, इ.स.१९१३
मृत्यू:- नोव्हेंबर २५, इ.स.१९८४

“माणूस जोडा, त्याचे चांगले तेवढे घ्या आणि राज्य सर्वांगाने समृद्ध करा.” : यशवंतराव चव्हाण.

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले।
मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चले।।
खरा वीर वैरी पराधीनतेचा।
महाराष्ट्र आधार या भारताचा।।

महाराष्ट्राचा देशाला केवढा आधार आहे, याचं वर्णन करणार्या सेनापती बापटांच्या कवितेच्या या ओळी. त्या सार्थ केल्या यशवंतराव चव्हाणांनी. परकीय आक्रमणाच्या वेळी देश संकटात असताना हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेले. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात त्यानी मानाचा तुरा रोवला. महाराष्ट्राचे हे नेतृत्व म्हणजे केवळ राजकीय पदं भूषवणारं शोभेचं बाहुलं नव्हते. तर हा नेता होता, खराखुरा विचारांचा सह्याद्री होता.

‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ हे शब्द यशवंतरावांचे यथार्थ वर्णन करतात. एक सुसंस्कृत राजकारणी, थोर विचारवंत, आदर्श लोकप्रतिनिधी, मनस्वी लेखक, सचोटी, नेकी आणि निष्ठेचा वसा देणारे यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्नंच होते. सुमारे ४० वर्षांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केले.

मार्च १२, इ.स.१९१३ मध्ये सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी यशवंतरावांचा जन्म झाला. त्यांना त्यांच्या आईने-विठाबाईंनी निग्रहाने सांभाळले, घडवले. स्वातंत्र्यपूर्व काळात कराड येथे शालेय शिक्षण घेतले. १९३०च्या गांधींजींच्या चळवळीने स्वातंत्र्य चळवळ शहरातून खेडेगावात गेली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक बदल होता. या काळात मोठय़ा प्रमाणावर स्वातंत्र्य लढय़ातील कार्यकर्ते तुरुंगात गेले. १९३१मध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच तिरंगा फडकवल्याबद्दल १८ महिने तुरुंगवासाची यशवंतरावांनाही शिक्षा झाली. तुरुंगातच त्यांना गांधीवादी विचारांचा, मार्क्सवादी विचारांचा परिचय झाला.

१९३३मध्ये जेलमधून बाहेर पडताना Yashwantrao Chavan यांच्या काँग्रेसनिष्ठेला समाजवादाची जोड मिळाली. तुरुंगामधून बाहेर पडल्यानंतर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी उच्च शिक्षणाकरिता कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजला प्रवेश मिळविला. कोल्हापूरला शिक्षण घेतानाच स्वातंत्र्यचळवळीला वाहून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यशवंतराव चव्हाणांच्या जीवनातील हा कालखंड वैचारिक आंदोलनाचा होता. प्रचंड वाचन, प्रत्यक्षात येणारे अनुभव, राजकारणात उदय पावलेले नवीन तत्त्वज्ञान यातून हा संघर्ष त्यांच्या मनात उभा राहिला होता. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते (नुकतेच लग्न झालेले असूनही) १९४२ च्या लढ्यात सातारा जिल्ह्यात आघाडीवर होते. या आंदोलनातही त्यांनी दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला.
Photo Credit's
यशवंतरावांचे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्ति, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी, म्हणूनच १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न पुढे होता, शिवाय अनेक विचारसरणीच्या लोकांना एकत्र बसून राज्य करणे अवघड होते. तेव्हा मानसिक तेढीतील तीव्रता कमी करून, काही विरोधी नेत्यांना विश्वासात घेऊन, कॉग्रेसश्रेष्ठींशी तडजोड करून महाराष्ट्र राज्य स्वतंत्र करण्यात आले. १ मे, १९६० रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाले आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (१मे १९६० – १९ नोव्हेंबर १९६२) म्हणूनही त्यांचीच निवड झाली.

यशवंतरावांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीचे स्वरूप थोडक्यात सांगायचे तर कुसुमाग्रजांच्या चार ओळी कमालीच्या बोलक्या आहेत…

नव्या जीवनाचा नाद
मला ऐकू येत आहे..
लक्ष शून्यातून
काही क्षेत्र आकारात आहे..

यशवंतरावांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सहकाराचे तत्व अवलंबिले. सर्व राज्यांत बदल होणे शक्य नव्हते पण काही भागात तो झाला त्यामुळे काही बरे-वाईट परिणामही झालेत. पण राज्याच्या काही भागांतल्या सामान्य लोकांत स्वतःच्या प्रयत्नांनी भांडवल उभारण्याची ईर्षानिर्माण होऊन जो मानसिक बदल झाला तो महत्वाचा होता.

Photo Credit's
पुढे १९६२ मध्ये चीनने भारतावर हल्ला केल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून यशवंतरावांना नेहरूनी आमंत्रण दिले. ‘संरक्षण हा विषय तुम्हाला नवखा असले तरी तुम्ही तो लवकरच आत्मसात कराल’ असं विश्वास नेहरूंनीच व्यक्त केला आणि तो यशवंतरावांनी खरा केला. पुढील काळात साधूंनी गोहात्याबंदीचे आंदोलन पुकारले तेव्हाही इंदिरा गांधीकडून यशवंतरावांना आमंत्रण आले आणि गृहमंत्री पद ताबडतोब स्वीकारण्याचा आग्रह झाला. त्यावेळीही त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, अर्थमंत्री (१९७१-१९७५), परराष्ट्रमंत्री (१९७४-१९७७) ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. तेव्हा त्यांची एक कुशल परराष्ट्र मंत्री म्हणून गणना होत असे, म्हणूनच ते सत्तेवर नसतानाही काही देशांचे राजदूत त्यांना येऊन भेटत असतं. १९७७-७८ कालवधीत केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले. महाराष्ट्रात संसदीय सचिव, अन्नपुरवठा मंत्री, स्थानिक स्वराज्य मंत्री, द्वैभाषिक मुंबई, संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इत्यादी पदे, तर केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, उपपंतप्रधान आणि आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष अशा जबाबदार्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. खरं तर यशवंतरावांची संपूर्ण कारकीर्दच कोणाही नेत्याला दीपस्तंभासारखी रस्ता दाखवणारी आहे.

महाराष्ट्रात झालेल्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विकासाची मुळे ही यशवंतरावांच्या कार्यात आहेत. त्यांनी असंख्य महत्त्वाचे निर्णय घेतले. काही ठळक निर्णय पुढीलप्रमाणे :-

– पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात.
(प्रशासकीय विकास)
– राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)
– कोल्हापूर बंधाऱ्याच्या प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)
– १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)
– मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व शिवाजी विद्यापीठाची स्थापना. (शैक्षणिक विकास)
– राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)
– मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)

ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्त्व, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी असे त्यांचे गुणवर्णन करता येईल. गुणांच्या बळावरच त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा ते राष्ट्रीय नेते अशी अविश्र्वसनीय झेप घेतली.


यशवंतराव राजकारणात नसते, तर ते एक उत्तम साहित्यिक झाले असते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींपासून ते ना. धो. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. राजकारण आणि समाजकारण या व्यतिरिक्त अनेक कलागुण असलेले आणि त्या कलेचा मनापासून आस्वाद घेणारे राजकारणी मंडळी क्वचितच आढळतील. यशवंतरावांना कवींच्या मैफिलींची, साहित्य, संगीत, नाटकांची फार आवड होती. सत्तेवर नसताना त्यांनी आपला वेळ साहित्यासाठी दिला. अधूम-मधून ते कविता करीत तर कधी मोठ्याने कवितावाचन करीत आणि श्रोते म्हणून त्यांच्या पत्नी वेणूताई असतं. त्यांच्या कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.

यशवंतराव “कृष्णाकाठ” या आपल्या आत्मचरित्राचा दुसरा भाग लिहीत असताना त्यांच्या पुतण्याचे अपघाती मृत्युमुळे कृष्णकाठच्या दुसऱ्या भागाच्या लिहिण्यात त्यात खंड पडला. त्यानंतर काही महिन्यात झालेल्या सौ.वेणूताईंच्या निधनाने ते पूर्णपणे खचले. आता फक्त हा सह्याद्री पडण्याचे शिल्लक राहिले होते. वेणूताईंच्या मृत्युनंतर सतत १५ महिने अश्रू गाळणाऱ्या यशवंतरावांचे अश्रू थांबले ते श्वास थांबल्यावरच. आत्मचरित्र कृष्णाकाठचा पुढील भाग न लिहीतच “कृष्णाकाठावर” चिरविश्रांती घेऊन पूर्ण झाला.

प्रादेशिकतेच्या मर्यादा सहज ओलांडून राष्ट्रीत्वाला स्पर्श करू शकणारे. कर्तृत्व, साहित्य, कला, संस्कृतीच्या सहज स्पर्शाने उन्नत झालेली रसिकता.. आणि काडोविकडीच्या प्रसंगातून मार्गक्रमण करू शकणारे राजकीय धुरीणत्व.. अशा अभिजात नेतृत्वाचा वारसा महाराष्ट्राला देणारे लोकनेते यशवंतराव चव्हाण याचा काल स्मृतीदिन होता

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, युगपुरुष स्व. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…!

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Sharad Pawar Wiki & Net Worth: Age, Biography, Wife, Family, Political Back Ground Details

Mulshi Pattern Teaser | Pravin Tarde, Mahesh Manjrekar, Mohan Joshi

रहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं | Shivaji Maharaj Death Reason in Marathi

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.