मुंबई: 12 मार्च 1993 ला मुंबईला रक्तरंजीत करणाऱ्या कुख्यात गँगस्टर अबू सालेमसह त्याच्या साथीदारांना न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. विशेष टाडा न्यायालयाने मुंबईच्या मारेकऱ्यांना शिक्षा ठोठावली.
या खटल्यात सर्वाचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे अबू सालेमकडे. अबू सालेमला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी सीबीआयने केली होती. मात्र अबू सालेमला जास्तीत जास्त 25 वर्षेच शिक्षा देता येत होती. त्यामुळे त्याला तेवढीच म्हणजे 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
आज सकाळी अबू सालेमसह फिरोज खान, मोहम्मद ताहीर मर्चंट ऊर्फ ताहीर टकल्या, करीमुल्ला खान व रियाज अहमद सिद्दिकी यांना विशेष टाडा न्यायालयात आणण्यात आले. त्यानंतर दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना त्यांचं म्हणणं मांडण्यास सांगण्यात आलं आणि नंतर शिक्षेवर सुनावणी करण्यात आली. सालेम आणि करीमुल्लाला जन्मठेपेच्या शिक्षेसह दोघांनाही प्रत्येकी दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सालेमला बॉम्बस्फोट घडवून आणण्याचं षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलं आहे. पाकिस्तानातून भारतात आलेला शस्त्रसाठा गुजरातहून मुंबईत पाठवल्याप्रकरणीही सालेमला दोषी ठरविण्यात आलं आहे. तर बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातील दिघी आणि शेखाडी बंदरावर आरडीएक्स उतरविल्याप्रकरणी करीमुल्लाला दोषी ठरविण्यात आले आहे.
प्रत्यार्पण करारानुसार फाशीची शिक्षा ठोठावता येत नसल्यानं सालेम आणि करीमुल्लाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची सीबीआयने मागणी केली होती. त्यानुसार टाडा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. टाडा न्यायालयाने सालेम, मुस्तफा डोसा यांच्यासह सहा आरोपींना १६ जून, २०१७ रोजी दोषी जाहीर केले होते. या प्रकरणातील एक आरोपी मुस्तफा डोसा याला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर काहीच दिवसांनी त्याचा मृत्यू झाला होता. त्यालाही या प्रकरणात दोषी ठरविण्यात आलं होतं.
अबू सालेमच्या जन्मठेपेची गुंतागुंत
अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर तो दुबईत पळून गेला. तिथे त्याने व्यवसाय सुरु केला. त्यानंतर तो पोर्तुगालला पळाला. त्याला सॅटेलाईट फोनच्या जीपीएसमुळे 20 सप्टेंबर 2002 मध्ये अटक झाली. तिथे तीन वर्ष त्याच्यावर खटला चालल्यानंतर पोर्तुगाल कोर्टाने त्याच्या भारतातील हस्तांतरणाला परवानगी दिली.
दरम्यानच्या काळात मी सालेम नाहीच असा दावा तो करत होता. मात्र सालेमला भारतात जेव्हा 1991 मध्ये पहिली अटक झाली होती, तेव्हा घेतलेले हाताचे ठसे आणि फोटोग्राफ हाच पुरावा भारताकडे होता. त्यावरुनच तोच अबू सालेम असल्याचं भारताने पोर्तुगाल सरकारला पटवून दिलं. त्यानंतर नोव्हेंबर 2005 मध्ये त्याला भारतात आणण्यात आलं.
हस्तांतरण करार
अबू सालेमला भारताच्या स्वाधीन करताना, पोर्तुगाल आणि भारत यांच्यात करार झाला होता. त्यावेळी पोर्तुगालने जर अबू सालेम दोषी आढळला, तर त्याला त्यांच्या कायद्यांप्रमाणे शिक्षा द्यावी अशा अटी घातल्या.
त्यानुसार –
- अबू सालेमला फाशी देता येणार नाही
- अबू सालेमला जास्तीत जास्त 25 वर्षांची शिक्षा देता येईल
पोर्तुगालसोबतच्या या करारामुळे अबू सालेमला जास्तीत जास्त 25 वर्षांचीच शिक्षा देण्यात आली आहे. त्यापैकी 12 वर्षांची शिक्षा त्याने भोगली आहे. त्यामुळे उर्वरित 13 वर्षांचीच शिक्षा त्याला भोगावी लागू शकते. पण भारत सरकारने जर नियमांवर बोट ठेवलं तर त्याला जन्मठेपही होऊ शकते.
दरम्यान, न्यायालयानं अब्दुल कयूम अन्सारी याची या आधीच सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील खटल्यातील आरोपी मुस्तफा डोसा याचा १८ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या १२ मार्च, १९९३ रोजी मुंबई झालेल्या बॉम्बस्फोटात २५७ लोक ठार व ७०० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणी पहिल्या टप्प्यातील खटल्यात अभिनेता संजय दत्त याच्यासह शंभर आरोपींना ‘टाडा’ न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश प्रमोद कोदे यांनी शिक्षा दिली होती.