अजित पवार-देवेंद्र फडणवीस सत्तास्थापना: त्या रात्री पडद्याआड नक्की काय घडले?

0
अजित पवार-देवेंद्र फडणवीस सत्तास्थापना: त्या रात्री पडद्याआड नक्की काय घडले?

२०१९ च्या विधानसभा निकालानंतर अजित पवार-देवेंद्र फडणवीस सत्तास्थापना वेळी झालेला गोंधळ आपल्या सर्वांना आठवत असेल. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच आपला शपथविधी उरकून सत्तास्थापना केली आणि राजनीती तज्ञांनाआश्चर्याचा धक्काच दिला. त्यावेळी पडद्यामागे नक्की काय घडले होते? असे काय घडले होते जेणेकरून अजित पवार यांनी असेच पाऊल उचलत राष्ट्रवादी च्या शरद पवार यांना अंधारात ठेवत सत्तास्थापना केली. सुधीर सूर्यवंशी यांचे पुस्तक ‘Checkmate: How the BJP Won and Lost Maharashtra’ यात याबाबत सविस्तर लिहिलेले आहे.

अजित पवार यांनी नोव्हेंबर २०१९ च्या मध्यभागी अमित शहा यांना फोन करून अजित पवार-देवेंद्र फडणवीस सत्तास्थापना यावर चर्चा केली. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक योजना बनवत सत्तास्थापना करण्याचा निर्णय घेतला. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या पस्तीस ते अडतीस आमदारांशी याबाबत बोलले होते. त्यांनी सुद्धा भाजपसोबत सत्तास्थापनेला हिरवा कंदील दिला होता. भाजपकडे तेव्हा सर्वाधिक जागांसह १०५ जागा आणि १५ अपक्ष उमेदवार आणि छोट्या पक्षांचे पाठबळ मिळून जादुई आकडा १४५ पासून थोडा पाठी होता. त्यांना हा १४५ जादूई आकडा पार करण्यासाठी आणखी पंचवीस आमदारांची गरज होती. देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा देणाऱ्या आमदारांना आश्वासने दिली होती. राष्ट्रवादीचे आमदार सत्तास्थापनेसाठी मुंबईत आल्यानंतर त्यांना दिल्ली किंवा हरियाणा येथील हॉटेल मध्ये ठेवण्याचा बेत आखला गेला होता. योग्य वेळी, राज्यपालांद्वारे एक प्रो टेम स्पीकर नियुक्त करून सत्तास्थापना करण्याची योजना आखली गेली होती.

विधानभवन नियम ८, कलम १८०(१) नुसार महाराष्ट्र विधानसभेतील राज्यपाल नियुक्त अध्यक्षांना सभापती पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास गुप्त मतपत्रिकेद्वारे सभापतीची निवडणूक घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

या पळवटेचा वापर सत्तेत येण्यासाठी फडणवीस यांनी करण्याचा निर्णय घेतला, कारण बहुतेक आमदार कदाचित गुप्त मतपत्रिका मतदान घेतल्यास सभापती पदासाठी भाजपा उमेदवाराला मतदान करतील अशी आशा देवेंद्र फडणवीस यांना होती. जर सभापती गोपनीय मतपत्रिकेद्वारे निवडले गेले, तर त्यांच्यासाठी बहुमत सिद्ध करणे अधिक सोप्पे होईल. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुमत सिद्ध करणे मोठी गोष्ट ठरणार नाही.

२०१४ मध्ये, देवेंद्र फडणवीस यांनी १२२ आमदारांसह बहुमत सिद्ध करून दाखवले होते. १४५ आमदार नसताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी सभागृहाबाहेर बाहेर पडल्याने सत्तास्थापना केली होती. शिवसेनेने गदारोळ निर्माण करूनही २०१४ मध्ये भाजपा सत्तेवर आली. न्यायालयीन खटले दाखल झाले, अनेक टीका झाल्या परंतु सरकार टिकून राहिले आणि आपला कालावधी शिवसेनेच्या पाठिंब्याने पूर्ण केला होता.

भाजपाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी आमदारांना कशाची लालूच दाखवली होती?

फडणवीस यांनी २०१९ मध्ये २०१४ चीच पद्धत वापरण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीतील भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीला फोडून अजित पवार-देवेंद्र फडणवीस सत्तास्थापना योजनेला मान्यता दिली होती. तोडल्या गेलेल्या जवळपास अडतीस आमदारांपैकी वीस जणांना कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. उरलेल्यांना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), महाराष्ट्र व शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) यासारख्या गृहनिर्माण व विकास संस्थांचे पदभार व अध्यक्षपद देण्यात येईल.

अजित पवार-देवेंद्र फडणवीस सत्तास्थापना योजना कशी आखली?

२२ नोव्हेंबर २०१९ रोजी नेहरू सेंटर (वरळी) येथे महा विकास आघाडीची बैठक संपल्यानंतर अजित पवार आपल्या चर्चगेट येथील निवासस्थानी दाखल झाले. संध्याकाळी १०.३० च्या सुमारास ते पुन्हा घराबाहेर पडले. त्यांनी ड्रायव्हरला वाटेतच थांबण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला कारसह घरी परतण्यास सांगितले. दुसरी गाडी घेऊन अजित पवार बाहेर गेले. त्याच वेळी, फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा ताफाही सोडला आणि एका वेगळ्या वाहनातून मध्यरात्रीच्या सुमारास बीकेसीमधील हॉटेल सोफिटेल येथे पोहोचले. दोन्ही नेत्यांनी मीडिया लक्ष टाळण्यासाठी फाइव्हस्टार हॉटेलमध्ये मागच्या दारातून दाखल झाले. जवळपास त्यांच्यात एक तास बैठक झाली.

अजित पवार-देवेंद्र फडणवीस सत्तास्थापना
देवेंद्र फडणवीस शपथविधी

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीस घाबरून गेले होते आणि त्यांनी दुसर्‍या दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबर २०१९ रोजी राजभवनात शपथ घेण्याची योजना आखल्याचे अजित पवार यांना सांगितले. अजित पवार यांनी त्यांना राष्ट्रपती राजवट सुरू असल्याने घाई न करण्यास सांगितले. अजित पवार यांनी फडणवीस यांना सांगितले की शरद पवार यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे परंतु अंतिम चर्चा अजून बाकी आहे. तथापि, लेखकाशी बोलणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यानुसार, फडणवीस यांनी त्यांना सांगितले की चर्चा नंतर होऊ शकते. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, शपथ लवकरात लवकर घेऊन नंतर प्रलंबित प्रकरणांचे निराकरण करणे शक्य होते.

अजित पवार यांनी भाजप ला साथ देण्यास का ठरवले?

दरम्यान, त्यांचे काका शरद पवार भाजपशी जुळवून घेण्यात नाखूष आहेत असे अजित पवार यांना समजले होते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस अशा तीन पक्षाच्या सरकार स्थापनेची योजना आखत असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव गृहमंत्रीपद, उपमुख्यमंत्री पद यासाठी निश्चित केले गेले होते. अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. उद्धव ठाकरे यांचे अडीच वर्षे संपल्यानंतर अजित पवार यांना पद्धतशीरपणे बाजूला सारून सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्याची योजना आखण्यात आली होती.

कदाचित म्हणूनच, अजित पवार घाबरुन गेले होते आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची इच्छा नसूनही भाजपाशी हातमिळवणी करण्याचा त्यांचाकडे शेवटचा उपाय होता आणि त्या उपाय सोबत जाण्याचे त्यांनी ठरवले. अजित पवार यांनी फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले होते की जर काकांना जास्त वेळ दिला गेला तर राष्ट्रवादीच्या बंडखोरांसोबत सरकार बनविणे त्यांना फार कठीण जाईल. एकदा काकांना याचा सुगावा लागला तर ते बंडखोरांना आपल्या शैलीत गुंडाळतील अशी भीती त्यांना होती. शरद पवार यांना सुगावा लागण्याआधी फडणवीस आणि अजित पवार यांनी आपला सत्तास्थापनेचा निर्णय घेतला.

त्यादिवशी नक्की काय घडले?

वरळीतील नेहरू सेंटर येथे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल हे जवळपास निश्चित झाले होते. महाविकास आघाडीने राज्यपालांना आपले सत्तास्थापनेचे पत्र सादर करण्यापूर्वी आपल्याला शपथ घ्यावी लागेल असे फडणवीस यांना वाटत होते. म्हणूनच, शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला. अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या साथीदारांनी मुंबईतील राष्ट्रवादीच्या ३८ आमदारांना बोलावले होते आणि त्यांना रात्री १२.३० वाजता सचिवालय समोरील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यात एकत्र येण्यास सांगितले होते.

सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांना याबाबतची माहिती होती. बंड त्वरित होऊ नये यासाठी आमदारांमध्ये एकमत करण्याचा बंगल्यावर प्रयत्न केला जाऊन अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश घेण्याची योजना केली गेली. भाजपमध्ये जाण्याची ही योग्य वेळ नाही, असा आग्रह धनंजय मुंडे यांनी धरला होता. पण अजित पवार त्यांचे ऐकण्याच्या मन: स्थितीत नव्हते. मुंडे यांच्या मनात कोंडी झाली होती. त्यांनी आपले राजकीय गुरू अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहावे की पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा द्यावा? या कोंडीत ते अडकले होते. त्या रात्री मुंडे त्यांच्या अधिकृत निवासस्थानापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कफ परेडमधील आपल्या मित्राच्या फ्लॅटवर गेले. पहाटे तीन वाजेपर्यंत मुंडे यांना झोप लागत नव्हती, असे ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदारांनी मूळ योजनेनुसार मुंडे यांच्या बंगल्यात येण्यास सुरूवात केली. भाजपचे MLC प्रसाद लाड आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे समन्वय साधून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सात खासगी जेट (सात आसनी) तयार ठेवण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या ३८ आमदारांना हरियाणा येथे घेऊन जाण्यासाठी ही विमाने तयार होती.

अजित यांनी अचानक बैठक बोलावल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमेकांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. ३८ आमदारांमध्ये नसलेल्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याने थोडाफार गोंधळ उडाला होता. अनेकांना शंका यायला लागली होती. शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय अजित पवार एकटेच हे पाऊल उचलत आहेत हे कळताच त्यांच्यातील काही जणांनी माघार घेतली. अखेर अडतीस पैकी केवळ पंधरा आमदार मुंबईत पोचले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना २३ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० ते ०१.०० सुमारास या बंडाची वार्ता मिळाली. शरद पवार यांच्याशी थेट संपर्क साधणार्‍या राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांना अजित पवार यांनी बैठकीसाठी बोलावले असल्याची माहिती दिली.

मात्र, शरद पवारांशी बोलल्यानंतर त्यांच्यापैकी बर्‍याच जणांनी बैठकीला न येण्याचे ठरविले. अशा प्रकारे पवारांना आपल्या पुतण्याच्या योजने विषयी कल्पना होती, परंतु अजित पवार त्यात यशस्वी होतील याबाबत त्यांना शंका होती. त्यानंतर शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास शरद पवारांनी अजित पवार यांच्या बाजूने किती आमदार आहेत याचा आढावा घेतला. त्यांना माहित होते की हे पंधरा आमदार जर आपल्या पुतण्याबरोबर गेले तर त्यांना सरकार स्थापनेत मदत होणार नाही. भाजपकडे १०५ जागा आणि १५ अपक्ष आमदारांचे पाठबळ होते; १४५ चा टप्पा पार करण्यासाठी किमान २५ ते ३० आमदारांची गरज होती. अजित पवार हे १५ आमदारांसह सरकार स्थापन करू शकत नव्हते आणि सत्तास्थापन केल्यास त्यांची विश्वासपात्रता कमी होईल.

महाराष्ट्र राज्य विधानसभा १९६० च्या नियम मुळे ही सत्तास्थापना यशस्वी होऊ शकत होती. छुप्या मतदानाद्वारे सभापती निवडणूक झाल्यास भाजपा कदाचित सत्तास्थापन करू शकते अशी चिंता शरद पवार यांना होती. त्या रात्री ३ च्या सुमारास ते उशिरा झोपायला गेले होते. याच वेळी देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास तयार झाले होते.

देवेंद्र फडणवीस मिर्ची हवन

एका वृत्तानुसार पहाटे चारच्या सुमारास फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी मिर्ची हवन (आगीभोवती पवित्र विधी) आयोजित केला होता, जो मध्य प्रदेशातील नलखेडाच्या बागलामुखी मंदिरातील पुजार्‍यांनी सादर केला होता. फडणवीस यांना खात्री होती की जर मुंबईत त्यांचे अधिकृत निवासस्थान बंगल्यात हे मिर्ची हवन केले गेले तर ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. यापूर्वीदेखील जेव्हा ते अडचणीत आले होते तेव्हा मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळताना त्यांनी अनेक वेळा मिर्ची हवन केले होते.

सत्तास्थापनेची वेळ

फडणवीस यांच्या राजभवनातल्या दुसर्‍या शपथविधी सोहळ्यासाठी सज्ज होण्याची वेळ झाली होती. आपले आवडते निळे जॅकेट निवडण्याऐवजी तांत्रिकाच्या सूचनेनुसार त्यांनी दृष्ट विचारांना कमी करण्यासाठी काळ्या रंगाची निवड केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते म्हणून अजित पवार यांच्याकडे मराठी व इंग्रजीतून राष्ट्रवादीच्या चौपन्न आमदारांच्या स्वाक्षर्‍याच्या दोन मूळ प्रती त्यांच्याकडे होत्या. या यादीची एक प्रत वर्षा बंगल्यात थांबलेल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजय मेहता यांना देण्यात आली.

त्यांनी भाजपा आमदार यांच्या सह राष्ट्रवादी च्या आमदारांची प्रत राज्यपाल यांच्याकडे जमा केली. राज्यपालांनी १५९ आमदारांच्या समर्थनाच्या प्रत मान्य करत राष्ट्रपती राजवट उठवण्याची मागणी राष्ट्रपती भवनास केली आणि रातोरात राष्ट्रपती राजवट उठवून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सत्तास्थापना करण्यात वाट मोकळी केली.

बाकीचे भाजपा नेते अंधारात?

२२ नोव्हेंबर, शुक्रवारी रात्री उशिरा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांचे निकटवर्ती गिरीश महाजन या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना सकाळी पाच वाजता कांदे पोहे साठी भेटण्याची विनंती केली. आणि दुसर्‍याच दिवशी वर्षा निवासस्थानी बोलावले. सकाळी चंद्रकांत पाटील आणि महाजन आले तेव्हा फडणवीसांनी त्यांना नागपूर शैलीतील कांदे पोहे आणि शीरा देऊळ करून सरळ राजभवनात आणले.

आश्चर्याची बाब म्हणजे, अजित पवार, त्यांची पत्नी सुनीत्रा, त्याचा मुलगा पार्थ, त्याचा भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांचे जोडीदार आधीच राजभवनात वाट पाहत होते. पाटील आणि महाजन अजितदादांना पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांना ठाऊक होते की भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये काहीतरी चालले आहे पण गोष्टी इतक्या लवकर असे स्थलांतर होईल असे त्यांनादेखील वाटले नव्हते.

शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.५० मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत राजकीय उलथापालथ केली. सर्वांसाठी हे आश्चर्यकारक होते. अजित पवार उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले होते. परंतु राष्ट्रवादी च्या फक्त १५ आमदारांच्या समर्थनाने बहुमत सिद्ध करणे अवघड होते आणि बहुमत सिद्ध न करण्याची नामुष्की येऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत सत्तास्थापनेचा दावा माघारी घेतला. अजित पवार-देवेंद्र फडणवीस सत्तास्थापना फसली होती.

सदर माहिती Checkmate: How the BJP Won and Lost Maharashtra या पुस्तकातील संदर्भावर तयार केलेला आहे. यावर PuneriSpeaks कोणताही दावा करत नाही.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.