पिंपरी पालिकेचा कारभार नियोजनशून्य असून प्रशासनावर कोणाचा अंकुश राहिला नाही. शहराच्या प्रश्नांना कोणीही वाली राहिला नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या कारभाऱ्यांवर केली आहे. अनधिकृत बांधकामे, शास्तिकराचा प्रश्न सुटलेला नाही. संरक्षण खात्याचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत.
शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडत आहे. सर्व जुनीच कामे सुरू असून नवीन काही होताना दिसत नाही, अशा शब्दांत पवारांनी भाजपवर आगपाखड केली आहे.
निगडी प्राधिकरणात कार्यकर्त्यांसमोर बोलताना अजित पवार यांनी पिंपरी पालिकेच्या कारभारावर ‘हल्लाबोल’ केला. ते म्हणाले, पिंपरीत १५ वर्षे सत्तेच्या माध्यमातून भरीव विकासकामे केली. ‘स्वच्छ शहर’ म्हणून शहराचा लौकिक होता. यापूर्वीच्या पंतप्रधानांनी शहराचे कौतुक केले, ‘बेस्ट सिटी’ म्हणून केंद्र सरकारचा पुरस्कारही मिळाला होता. मात्र, आजची अवस्था काय आहे, पालिका चालवतंय कोण? नुसतेच घोटाळ्यावर घोटाळे सुरू आहेत. विकासकामे संथ गतीने सुरू आहेत. पिण्याचे पाणी मिळत नाही, विजप्रश्न आहेच. भविष्यकालीन तरतूद म्हणून मंजूर करून ठेवलेले अतिरिक्त पाणी सत्ताधाऱ्यांनी रद्द केले. शहरात नवीन कामे सुरू होत नाहीत. निगडीपर्यंत मेट्रो सुरू करण्याचा निर्णय होत नाही. शास्तिकर रद्द झालाच नाही. अनधिकृत बांधकामांचा निर्णय झाला नाही. संरक्षण खात्याशी संबंधित प्रश्न तसेच आहेत. बोपखेलचा उड्डाणपूल झाला नाही. पिंपळे सौदागरचा रस्ता सुरूच झालेला नाही. गरिबांना घरे देताना यांनीच खोडा घातला. कामे काहीच नाही, मात्र निव्वळ जाहिरातबाजी सुरू आहे. वाढदिवसाचे फलक शहरभर झळकत आहेत. लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्य शासनाकडे तसेच केंद्र सरकारकडे असलेले प्रश्न अनुत्तरित आहेत. नेहरू अभियानांतर्गत शहराला भरीव निधी मिळाला होता. आता तसे होत नाही. स्मार्ट सिटीची प्रगती काय, त्यामुळे शहराचा नेमका काय फायदा झाला, याचे उत्तर कोणाकडेही नाही.
Source
पिंपरी-चिंचवडचा कारभार नियोजनशून्य : मा. अजित पवार
