देशात २०१९ निवडणुकीआधी भाजप सरकार आणीबाणी लागु करेल अशी टीका वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी केली.
काँग्रेसने जवळपास १८ महिने लोकांना तुरुंगात डांबले, हे सरकार ३६ महिने लोकांना तुरुंगात टाकेल असे भाकीतच त्यांनी व्यक्त केले. देशातील परिस्थिती प्रक्षोभक होत आहे. सरकारला सदबुद्धी मिळो, ‘लोकशाही जिवंत राहो’ अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी गुरुवारी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित सांस्कृतिक कट्टा उपक्रमात ते बोलत होते. जगात वाढत चाललेल्या हिंसेवर ते बोलले, सरकार विरुद्ध बोलल्यास नोटीस येतात याबद्दल सुद्धा त्यांनी सरकारचे कान ओढले. देशाची तीस वर्षे जात गोंजारण्यात गेली आहेत. जाती घट्ट केल्यामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. व्यासपीठावर फुले, शाहू, आंबेडकर नारा देणारे खाली आले की मात्र जात पाळतात. मतदारसंघात जातीची घरे किती हा विचार केला जातो. देशापेक्षा धर्म, धर्मापेक्षा जात आणि जातीपेक्षा पोटजात महत्त्वाची झाली आहे. जात आणि धर्माच्या विरोधात बोलण्याची हिमंत कोणत्याही राजकीय पक्षात नाही. हे राजकारण देशाची वाट लावत आहे,’ असा हल्ला फुटाणे यांनी चढवला.
सामान्य नागरिकाचा आजही ‘सामना’ चित्रपटातील मारुती कांबळे होतो असेही त्यांनी बोलताना नमूद केले.