डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती: बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी…..

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती: बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी…..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), खरे नाव भीमराव रामजी आंबेडकर, हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, स्वातंत्र्य भारताचे प्रथम कायदा मंत्री व बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती

बहुआयामी व बहुश्रुत व्यक्तीमत्त्व असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, प्राध्यापक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, स्त्रियांच्या हक्कांचे कैवारी, मजूरमंत्री आणि भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक सुद्धा होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालपण:

मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ’नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षित, संस्कारसंपन्न व ज्ञानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला आणि शुद्ध आचाराला मोठे स्थान होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांचे कुटूंब त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेले महार कुटुंब होते. वडील सुभेदार रामजी सकपाळ आणि आई भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४वे अपत्य होते. त्यांचे नाव भीमराव असे ठेवण्यात आले, त्यामुळे कुणी भीम, भीमा व भिवा नावानेही त्यांना हाक मारत. भीमरावांचे कुटूंब मूळचे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्या आंबडवे गावचे होते. (आंबडवे या गावचा अंबावडे असा चूकिचा उल्लेख पूर्वी अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.) त्यांचे पूर्वज ब्रिटिशांच्या भारतीय सेनेत नोकरी करत होते आणि तेथे त्यांच्या वडिलांनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना, आणि विशेष करून भीमरावाला शिक्षण देऊन, ज्ञानोपासनेची प्रेरणा दिली. इ.स. १८९६ मध्ये अवघ्या ५ वर्षीय भीमरावांच्या आई भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठ्या आणि स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या, म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत. भीमराव वयाने लहान असल्यामुळे ’कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख करावी लागली. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली व ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. बाबासाहेबांचे मूळ गाव कोकणातील आंबडवे व मूळ आडनाव सकपाळ होते. कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल सातारा) मध्ये ‘आंबडवेकर’ असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. (अनेक ठिकाणी या आडनावाचाही अंबावडेकर असा चूकीचा उल्लेख केलेला आहे) सातार्‍याच्या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे ब्राह्मण शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमाला सुचविले. त्याला बाळ भीमाने लगेच होकार दिला आणि बाबासाहेबांचे आडनाव आंबडवेकराचे आंबेडकर झाले. तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून बाळ भीमाचे नाव आंबेडकर झाले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात १८-१८ तास अभ्यास करत असत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लग्न

पिता रामजींनी मीराईंच्या सांगण्यावरून इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि हे कुटुंब मुंबईला नेले. तेथे भीमराव हे एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले. कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. चौथीची परिक्षा पास झाल्यावर त्यांना दादा केळूस्कर गुरूजींनी स्वत: लिहिलेले ‘भगवान बुद्धाचे चरित्र’ हे पुस्तक भेट म्हणून दिले. ते पुस्तक वाचून त्यातील काही प्रसंगांनी भीमराव अक्षरश: भारावून गेले. तेव्हा वडीलांनी आम्हाला बौद्ध साहित्याचा परिचय का करून दिला नाही? असे त्यांना वाटले. त्यांनी वडीलांना सरळ विचारले की, “ज्या ग्रंथात केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव आणि शूद्र व अस्पृश्यांची नालस्ती केली आहे, ते महाभारत व रामायणासारखे ग्रंथ त्यांनी मला वाचावयास का सांगितले? तेव्हा वडील म्हणाले, आपण अस्पृश्य जमातीचे आहोत आणि त्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने हा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल. द्रोण व कर्ण ही अत्यंत लहान माणसेही किती उंचीपर्यंत पोहोचली हे पाहण्यासारखे आहे. वाल्मिकी हा कोळी असूनही रामायणाचा कर्ता झाला.

Photo Credit's
Young Ambedkar

वडिलांच्या युक्तिवादात त्यांना तथ्य आढळले परंतु त्याने त्यांचे समाधान झाले नाही. महाभारतातील एकही व्यक्तीरेखा त्यांच्या मनाला भूरळ घालू शकली नाही. भीमरावांच्या मनात बंड उद्भवले आहे हे वडीलांच्या लक्षात आले आणि त्यामुळे भीमराव तेथूनच बुद्धांकडे वळले. रामजी बाबांना इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी त्यांना आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. इ.स. १९०७ साली तरूण भीमरावांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यावेळी एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली. इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या ९ वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर झाले होते.

Photo Credit's
Dr. Ambedkar and wife Savita Ambedkar

पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली आनि बडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी त्यांना यशवंत हा पुत्ररत्न प्राप्त झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी बाबांचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चारच महिन्यांनी या दु:खी सुपुत्राने उदार ह्रदयी बडोदा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन, अमेरीकेला कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्चशिक्षण:

बी.ए. (बॅचेलर ऑफ आर्ट्स)

भीमराव आंबेडकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकून नोव्हेंबर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची परीक्षा दिली. जानेवारी १९१३ मध्ये ते बी.ए. च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तत्पूर्वी जानेवारी १९०८ पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्‍नांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रु. २५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला.

Photo Credit's
Young Bhimrao Ambedkar at Columbia University

महाराज बडोदा संस्थानच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. महाराज भीमरावांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वावर अत्यंत प्रसन्न होते. महाराजांनी, भीमरावांना होकार दिल्यामुळे दि. ४ एप्रिल १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकार्‍यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी दिनांक १८ एप्रिल १९१३ रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत दि. १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर बोटीने प्रवास करून डॉ. आंबेडकर दिनांक २० जुलै १९१३ रोजी दुपारी १२ वाजता न्यूयॉर्क येथे पोहचले.

बडोदा संस्थानचे स्कॉलर असलेले बाबासाहेब परदेशी उच्चशिक्षणासाठी प्रथमतः अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले. अर्थशास्त्र शाखेमध्ये त्यांनी १९१३ ते १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला. त्यांनी या विद्याभ्यासाकरता प्रमुख विषय अर्थशास्त्र व इतर विषय म्हणून समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. न्यूयॉर्कमध्ये सुरुवातीस ते कोलंबिया विद्यापीठाच्या धईले हॉलमध्ये राहिले आणि नंतर रस्ता नं. ११४ वरील कॉस्मोपॉलिटन क्लब, न्यूयॉर्क पश्चिम ५६४ इथे राहिले, कारण इथे काही भारतीय विद्यार्थी रहात होते. तसेच सातारा हायस्कूलमधील त्यांचा एक वर्गमित्र सुद्धा तेथेच होता.

एम.ए. (मास्टर ऑफ आर्ट्‌स)

अर्थशास्त्र, राजकारण, मानववंशशास्त्र, नीतिशास्त्र, व्यापार, समाजशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी कोलंबिया विद्यापीठाला दि. १५ मे १९१५ रोजी अॅडमिनिस्ट्रेशन अॅन्ड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला. दि. २ जून १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम.ए. ची पदवी मिळाली. दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात पुढे पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध झालेले लाला लजपतराय यांच्याशी ओळख झाली. बाबासाहेब ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत. असा विद्यार्थी कोण याची उत्सुकता लाला लजपतराय यांना होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. लाला लजपतराय हे लंडनहून न्यूयॉर्कला आलेले होते. असेच एकदा या दोन भारतीय विद्यार्थ्यांचा संवाद सुरू असताना प्राध्यापक एडवीन सेलिग्मन तिथे आले. प्रा. सेलिग्मन यांचे संपूर्ण नाव एडविन रॉबर्ट अॅन्डरसन सेलिग्मन होय. त्यांनी सुद्धा या दोघांच्या संवादात भाग घेतला. प्राध्यापक एडविन सेलिग्मन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचं सखोल ज्ञान ऐकून होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गौरवपर उद्गार काढले, ते म्हणाले, “भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत.”

प्रा. सेलिग्मन ज्यू धर्मीय होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पी.एच्.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबाबत म्हणतात, ‘अमेरिकेत जाईपर्यंत माझे अनेक गुण सुप्‍तावस्थेमध्ये होते. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांचा विकास करण्याचे काम प्रा. सेलिग्मन आणि इतर विद्वानांकडून झाले. अमेरिकेतील १९१३ ते १९१६च्या वास्तव्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात काही चांगले मित्र आणि विद्यापीठातील प्राध्यापक, मार्गदर्शक आले. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं प्रा. सेलिग्मन यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता. सिडनेहॅम कॉलेजमध्ये शिकवत असताना आंबेडकरांना अनेक विद्यार्थ्यांना कोलंबिया विद्यापीठात प्रा. एडविन सेलिग्मन यांच्याकडे पाठवले होते.

पीएच.डी.

‘भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन’ (The National Divident of India : A Historical And Analytical Study) हा भीमराव आंबेडकरांचा पीएच.डी.साठीचा विषय होता. त्यांनी इ.स १९१३ ते इ.स. १९१७ या कालावधीत विद्याभ्यासाच्या परिश्रमाने लिहिलेला हा प्रबंध लिहिला.

Photo Credit's
Dr. B. R. Ambedkar with his professors and friends from the London School of Economics and Political Science, 1916-17

अवघ्या २५ वर्षांच्या भीमराव आंबेडकरांनी एवढ्या गहन विषयावर प्रबंध लिहून ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश पार्लमेंटमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन करून जगातील सर्व देशांचे लक्ष या प्रबंधाकडे वेधून घेतले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. जगभरातील देशांना उपयोगी ठरणारा हा प्रबंध लिहिला. प्रा. सेलिग्मनसारख्या जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाने या प्रबंधाचा गौरव केला. हा प्रबंध आठ वर्षांनी म्हणजे इ.स. १९२५ मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला. आला. ग्रंथाचे नाव ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती’ (Evolution of Provincial Finance in British India). हा ग्रंथ त्यांनी उच्चशिक्षणासाठी मदत केल्याबद्दल बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना आदरपूर्वक अर्पण केला. हा ग्रंथ लंडनच्या प्रकाशकाने प्रसिद्ध केला. या ग्रंथात ब्रिटिशांवर प्रखर टीका करून आपण खरे राष्ट्रभक्त असल्याचे २६ व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केले. दिनांक ९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए. ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र या विषयावर चर्चासत्रात आपला शोधलेख वाचण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानुसार भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी (Caste in India : Their Mechanism, Genesis And Development) हा शोधनिबंध वाचून समाजशास्त्राच्या सार्‍याच विद्वानांचे लक्ष वेधले. द अमेरीकन जर्नल ऑफ सोसिओलॉजी (American Journal of Sociology) या समाजशास्त्राच्या नियतकालिकामध्ये डॉ. आंबेडकरांच्या जातीवरील प्रबंधाचा निवडक भाग ‘या महिन्यातले जगातील उत्कृष्ट वाङमय’ World’s Best Literature Of The Month या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला. या सन्मानार्थ कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरांनी आणि विद्यार्थ्यांनी एक मेजवानीही डॉ. आंबेडकरांना दिली. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सनातनी समाजरचना विरुद्ध आधुनिक समाजरचना या विषयावर मोठा खल होत असे. या परिसंवादांमध्ये डॉ. आंबेडकर भाग घेत असत. मानववंशशास्त्रांच्या (Anthropology) शाखांमार्फत चालणार्‍या या चर्चांमध्ये विद्वत्ताप्रचुर संशोधनात्मक प्रबंध वाचले जात होते. त्यामुळे या विषयावर खोलवर अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांतील सूक्ष्म ज्ञानामुळे त्यांनी जातीवरील प्रबंध लिहिताना सर्वस्वी नवीन असा सिद्धांत उभा केला.

Photo Credit's
Swearing ceremony

अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातले चित्र आणि अमेरिकेतील चित्र वेगवेगळे दिसून आले. इथे शिवाशिवीचा/ अस्पृश्यतेचा प्रश्नच नाही, कोणत्याही प्रकारची मानहानी नाही. अमुक विषय घ्यायचा तमुक विषय घ्यायचा नाही असे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. कारण अमुकच जातीत जन्म घेतला आहे. अमुक जातीतील जन्मामुळे केस कापणे, कपडे लाँड्रीला देणे, वाहनात बसू न देणे, पिण्याचे पाणी न देणे, शाळांमध्ये शिक्षक दुरून छड्या मारतात असे चित्र अमेरिकेत पहायला मिळत नव्हते. प्रोफेसर कितीतरी आत्मीयतेने शिकवत होते. कोलंबिया युनिव्हर्सिटीतील विद्वान प्रोफेसर सेलिग्मन आणि प्रो. सिगर हे विद्यार्थी भीमरावांशी समतेच्या भूमिकेवर चर्चा करत असत आणि शिकवत असत. या घटनांतूनच डॉ. आंबेडकरांना नवचैतन्य प्राप्त झाले. समतेची मिळालेली अमेरिकेतील वागणूक डॉ. आंबेडकरांच्या मनावर खोलवर बिंबली होती. त्यामुळेच पुढे भारतात आल्यावर त्यांनी समतेवर आधारित समाजरचना घडवण्यासाठी सारे सामाजिक लढे केलेले दिसून येतात.

Photo Credit's
Dr. Ambedkar Handover Constitution to dr. Rajendra Prasad

कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर जॉन डेव्ही यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्हीही प्रभावित झाले होते. कोलंबिया विद्यापीठात प्रथमच आपण समानतेचा अनुभव घेतल्याचे आंबेडकरांनीही लिहून ठेवले आहे. “कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले”, असे डॉ. आंबेडकरांनी न्यूयॉर्क टाइम्सला १९३० मध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

Reference

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

शिवाजी महाराज इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज माहिती, अफजलखान वध, शिवराज्याभिषेक, मराठा साम्राज्य, आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराज वंशावळ

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.