दीपा!!! आपला दीपक गेला???

0
दीपा!!! आपला दीपक गेला???

‘दीपा, आपला दीपक गेला…….!’

दुपारी अच्युत गोडबोलेंचा फोन आला……नेहमीप्रमाणे लिखाणाविषयी काही सूचना असणार अशा विचारानं मी फोनवर बोलणार तोच ते म्हणाले, ‘तुला काहीच माहीत नाही का?’ मी म्हणाले ‘नाही….’
त्यांचा आवाज गदगदलेला होता, ते म्हणाले, ‘दीपा, आपला दीपक गेला, तुला समजतंय ना, दीपक अमरापूरकर गेला……’
मी जोरात ‘काय’ म्हणून ओरडले…….
डॉ. दीपक अमरापूरकर जागतिक कीर्तीचा यकृताचा तज्ज्ञ डॉक्टर! अतिशय बुद्धिमान! मूळ सोलापूरचा असलेला हा माणूस अतिशय कष्टातून आणि परिश्रमातून डॉक्टर झाला आणि आपल्या मनमिळाऊ हसतमुख स्वभावानं दुसर्‍याच्या मदतीला कायम तयार असायचा…..मी त्यांना कधीही भेटले नाही….पण अच्युत गोडबोले यांच्या ‘मुसाफिर’ च्या काळात बालपण आणि जडणघडणीचा काळ याविषयी लिहिताना ते अनेक आठवणीत हरवून जायचे. त्या वेळी दीपक अमरापूरकर हे नाव हमखास त्यांच्या तोंडी असायचं. ‘मुसाफिर’ प्रसिद्ध झालं. त्यात डॉ. दीपक अमरापूरकर यांचा उल्लेखही आहेच.
डॉ. दीपक अमरापूरकर हे नाव गोडबोले कुटुंबात सातत्यानं घेतलं जायचं. मी मुंबईला असले आणि त्या वेळी शोभाताईंना काही त्रास झाला की अच्युत अगदी सहजपणे त्यांना म्हणत, ‘अग, दीपकला फोन कर आणि विचार ….’ किंवा काही वेळा अच्युत गोडबोले पुण्यात असले आणि त्यांना कुठलाही त्रास सुरू झाला की ते लगेचच दीपकला फोन करून ‘काय करू?’ असं विचारत……आणि हा इतका व्यस्त असलेला डॉक्टर, पण अच्युत यांचा प्रश्‍न चुटकीसरशी सोडवायचा. ताबडतोब योग्य सल्ला द्यायचा. ज्या वेळी अच्युत गोडबोले यांचा मोठा भाऊ, ज्यांना आम्ही ‘तात्या’ म्हणायचो, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं, तेव्हाही वेळोवेळी डॉ. दीपक अमरापूरकर यांचा सल्ला घेऊनच प्रत्येक गोष्ट केली जात होती……गोडबोले कुटुंबात दीपक अमरापूरकर या व्यक्तीला खूप महत्वाचं स्थान होतं.
आणि आज अचानक अच्युत गोडबोले मला अतिशय दुःखी स्वरात सांगत होते, ‘दीपा, आपला दीपक गेला……’ असा कसा गेला हा माणूस अचानक? मुंबईच्या पावसानं हे का आणि काय करून ठेवलं?
बॉम्बे हॉस्पिटलमधून मंगळवारी घरी येण्यासाठी निघालेले डॉ. दीपक अमरापूरकर आपल्या घराच्या अगदी जवळ येऊन पोहोचले होते. ट्रॅफिक जाम होता, कमरेइतकं पाणी रस्त्यावर होतं…..आपण चालत गेलो तर दहा मिनिटांत घरी पोहोचू असं त्यांना वाटलं. त्यांनी आपल्या बायकोला अंजलीला मी दहा मिनिटांत घरी येतोय असा फोन केला. ड्रायव्हरला तू गाडी घेऊन ये सावकाश असं सांगितलं आणि ते गाडीतून उतरले. हातात छत्री, पाऊस कोसळतोय आणि अचानक उघड्या असलेल्या ड्रेनेजच्या मेनहोलमधून ते गायब झाले……त्यांचा मृतदेह १० किमी दूर अंतरावर असलेल्या वरळी सीफेसला दोन दिवसांनी मिळाला…….त्यांच्या हातातल्या घड्याळावरून त्यांची ओळख पटली…..सर्वसामान्य माणसाचं जीवन महत्त्वाचं आहेच, पण जो डॉक्टर रोज अनेक लोकांना जीवदान देत होता, आपल्या देशासाठीच नव्हे तर जगातल्या यकृताच्या विकारानं ग्रस्त असलेल्या कुठल्याही रुग्णासाठी हा माणूस असणं खूप खूप आवश्यक असताना….अशा प्रकारे मृत्यू त्यांना यावा? असं का झालं, कोणाची चूक, वगैरे प्रश्‍नांचा विचार या क्षणी तरी डोक्यात शिरतच नाहीये….मनात वारंवार एकच विचार येतोय, अच्युत गोडबोले आणि शोभाताई आता कोणाला फोन करून विचारतील, ‘दीपक, तुला काय वाटतं आम्ही आत्ता काय करायला हवं?’
अच्युत आणि शोभाताईं यांनी आपल्या दीपकला केलेला फोन आता कधीच उचलला जाणार नाही, कधीच नाही!
Credits: दीपा देशमुख ३१ ऑगस्ट २०१७

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.