मनपा निवडणुकीच्या कामासाठी हवेत २५ हजार कर्मचारी

0
मनपा निवडणुकीच्या कामासाठी हवेत २५ हजार कर्मचारी

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभागरचनेवर सुनावणीची प्रक्रिया सुरू होत असताना प्रशासकीय तयारीलाही वेग आला आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन मनुष्यबळाचा आढावा घेत आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सुमारे २५ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. त्या दृष्टीने पालिकेने नियोजन सुरू केले आहे.

महापालिकेतर्फे प्रारूप प्रभागरचना तयार करून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहे. त्यावरील हरकती नोंदविण्याची मुदतही आता संपली असून, २४ व २५ फेब्रुवारी रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. या संदर्भातील कामांमध्ये सध्या पुणे महापालिकेचे सुमारे ६०० अधिकारी कर्मचारी या कामात सहभागी झाले आहेत.

निवडणुकीच्या तयारीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी पालिका प्रशासनाने महापालिकेच्या प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती मागवली होती. त्यानुसार १६ हजार जणांची माहिती प्रशासनाकडे आली आहे. दरम्यानच्या काळात अनेक जण सेवानिवृत्त झाल्याने या आकड्यात बदल होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

मतदान केंद्र वाढणार

करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वावराचे निकष लक्षात घेऊन मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे. त्याप्रमाणात कर्मचारी संख्या, पोलिस बंदोबस्त यामध्येही वाढ होते. यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह सरकारी कर्मचारी, शिक्षक यांनाही निवडणुकीचे काम दिले जाणार आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या कामकाजाकरता २० ते २५ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांची माहिती मागविली आहे. निवडणूक आयोगाकडून ज्याप्रमाणे सूचना येतील, त्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करावे लागेल. मतदार संख्या, मतमोजणीचे नियोजन करून सरकारकडे कर्मचाऱ्यांची मागणी केली जाईल.

– रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.