फॅक्ट चेक: कोरोना व्हायरस चे आयुष्य १२ तास आहे? टाळी वाजवून व्हायरस मरणार?

0
फॅक्ट चेक: कोरोना व्हायरस चे आयुष्य १२ तास आहे? टाळी वाजवून व्हायरस मरणार?

भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, केंद्र आणि राज्य सरकार धडपड करीत आहेत. परंतु रोज नवनवीन खोट्या माहिती पसरवून लोकं सरकारच्या अडचणीत वाढ करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या ‘जनता कर्फ्यू’ नंतर व्हाट्सऍप वर अफवांचा रतीब पाहायला मिळाला. १४ तासांच्या जनता कर्फ्यू नंतर कोरोना व्हायरस नष्ट होईल असा मॅसेज अनेकजण फॉरवर्ड करत आहेत.

कोरोना व्हायरसचे आयुष्य फक्त १२ तास असते आणि म्हणूनच, रविवारी, २२ मार्च रोजी १४ तासांच्या कर्फ्यूद्वारे भारत ‘व्हायरस-मुक्त’ उदयास येईल अशा प्रकारचे मॅसेज सगळीकडे पाठवले जात आहेत.

२४ तास लोक घरात राहिल्याने बाहेर पसरलेला कोरोना व्हायरस कोणाच्याही संपर्कात न आल्याने नष्ट होऊन जाऊन त्यांची साखळी तुटेल असे सांगण्यात येत आहे.

काय आहे सत्य?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, कोविड -१९ कारणीभूत व्हायरस पृष्ठभागावर किती काळ टिकतो हे निश्चित नाही, परंतु इतर व्हायरसप्रमाणेच हा व्हायरस वागल्याचे दिसते.

WHO च्या एका अभ्यासानुसार कोरोनाव्हायरस (कोविड -१९) काही तास किंवा कित्येक दिवस पृष्ठभागावर टिकून राहू शकतात. हे भिन्न परिस्थितींमध्ये भिन्न असू शकते. (उदा. पृष्ठभागाचा प्रकार, वातावरणातील तापमान किंवा आर्द्रता)

Corona Survive on Surface
Source: WHO

जर आपल्याला असे वाटत असेल की एखाद्या पृष्ठभागामुळे संसर्ग होऊ शकतो, तर व्हायरस नष्ट करण्यासाठी आणि स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्यासाठी साध्या जंतुनाशकाने पृष्ठभाग साफ करायला हवा. आपले हात अल्कोहोल-आधारित सॅनिटायजर ने चोळा किंवा साबणाने धुवा. आपले डोळे, तोंड किंवा नाक स्पर्श करणे टाळा.

यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ़ हेल्थ (एनआयएच) च्या व्हायरोलॉजिस्ट नेल्टजे व्हॅन डोरेमलेन यांनी विविध पृष्ठभागावर हा विषाणू किती काळ टिकू शकतो या विषयावरील महत्वपूर्ण अभ्यास केला आहे. १७ मार्च रोजी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे आढळले आहे की हा विषाणू तीन तासांपर्यंत हवेत राहू शकतो. अभ्यासानुसार, हा विषाणू इतर पृष्ठभागावर जास्त काळ टिकू शकतोः पुठ्ठा पृष्ठभागांवर २४ तास आणि प्लास्टिक आणि धातूच्या पृष्ठभागावर दोन ते तीन दिवसांपर्यंत तो जिवंत राहू शकतो.

जर्नल ऑफ हॉस्पिटल इन्फेक्शनच्या आणखी एका अभ्यासानुसार असे सुचविण्यात आले आहे की कोरोनव्हायरस धातू, काच किंवा प्लास्टिक सारख्या निर्जीव पृष्ठभागावर नऊ दिवसांपर्यंत राहू शकतात.

यामुळे असे सिद्ध होत आहे की १४ तास लोकांनी बाहेर न पडल्याने कोरोना मुळापासून नष्ट होईल ही एक अफवाच आहे. लोकांनी घरी राहून फिरणे टाळल्यास व्हायरस चा प्रसार कमी होईल हे नक्की. परंतु लोकांना प्रोत्साहन देऊन जनता कर्फ्यू पाळायला लावण्याऐवजी खोटी माहिती पसरून जनता कर्फ्यू चे चुकीचे अर्थ काढले जात आहेत.

टाळ्या थाळी वाजवल्याने कोरोना मरणार?

टाळी किंवा थाळी वाजवल्याने कंपन निर्माण होऊन कोरोना विषाणू मरेल अशा विना आधाराच्या पोस्ट लोकं फॉरवर्ड करत आहेत. खरेतर बाल्कनी मध्ये उभे राहून टाळ्या वाजवणे याला सुरुवात चीन पासून ते इटली आणि स्पेन सारख्या ठिकाणी करण्यात आली होती. यात कोरोनाशी लढताना मदत करण्याऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी लोकं बाल्कनी मध्ये येऊन टाळ्या, वाद्य वाजवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा याच कारणासाठी लोकांना आवाहन केले आहे. परंतु काहीजणांना यात सुद्धा शास्त्र दिसले आणि खोटी माहिती पसरायला सुरुवात झाली.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

कोरोना विषाणू: महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.