उत्सुकता म्हणून आजूबाजूला दिसणाऱ्या घटनांचे अनुकरण लहान मुले करतच असतात. अशामुळे दुर्घटनाही घडतात. बंगळुरू येथील एका सात वर्षाच्या चिमुकलीने टीव्हीवरील मालिकेचे अनुकरण करत स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. टीव्हीवरील कन्नड मालिकेचे अनुकरण करत पीडित मुलीने स्वत:ला पेटवून घेतल्याने तिचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना दवानगेरे जिल्ह्याच्या हरिहारा भागातील आहे. याठिकाणी ११ नोव्हेंबर रोजी प्रार्थना नावाच्या मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांना हा सारा प्रकार २९ नोव्हेंबरला कळाला. यानंतर सखोल चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती उघड झाली.
प्रार्थना ही तिच्या घरी टीव्हीवर नंदिनी ही कन्नड मालिका पाहत होती तेव्हा या मालिकेत मुख्य पात्र स्वत:ला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न करत होते, असे दाखवण्यात आले होते. हे दृश्य बघून प्रार्थनाने त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आणि ती गंभीररित्या भाजली गेली. रुग्णालयात उपचार करत असतानाच तिचा मृत्यू झाला.
प्रार्थना सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकत होती. पोलिस या घटनेची चौकशी करीत आहेत. मात्र, प्रार्थनाने अन्य कुठल्या कारणामुळे हे कृत्य केले की केवळ मालिका पाहून तिने हे पेटवून घेतले, याचा सुद्धा तपास सुरू आहे.
Source
सावधान: टीव्हीवरील मालिका बघून चिमुकलीने केली आत्महत्या
