सातारची कन्या कश्मिरा पवार पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार….!
सातारा: कला शाखेत प्रवेश घेतल्याने खूप वाचन करता आले, अभ्यास करण्यासाठी मेहनत घेता आली. ग्रामीण विकासाविषयी काम करण्याची इच्छा आहे. त्यादृष्टीने मिळणाऱ्या संधी उपयुक्त ठरतील.
– कश्मिरा पवार
कश्मिरा पवार माहिती
“एमपीएससी’ परीक्षेत आलेले यश, “सीबीआय’मध्ये अधीक्षकपदी निवड झाली असूनही अशा महत्त्वाच्या संधी नाकारत नेहमीच चाकोरीबाहेर जाण्याची जोखीम पत्करणारी साताऱ्याची कश्मिरा पवार आता पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सल्लागार म्हणून काम पाहत आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील या 24 वर्षाच्या या युवतीने “मेक इन इंडिया’ आणि “ग्रामीण विकास’ प्रकल्पात जीव ओतून केलेल्या कामाची पावती तिला मिळाली आहे. या कामाची दखल घेतल्याने यापुढे ती आता विविध क्षेत्रांतील योजनांचा आराखडा बनवण्यासाठी सल्लागार म्हणून काम पाहणार आहे.
केंद्र सरकारच्या वतीने विविध क्षेत्रांतील विकासासाठी काही प्रकल्पांच्या स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेत कश्मिराने भाग घेतला. त्यात पंतप्रधान कार्यालयाच्या “मेक इन इंडिया’ प्रकल्पात तिने पहिला क्रमांक मिळवत सर्वांना अचंबित केले. “मेक इन इंडिया’ व ग्रामीण विकास या दोन प्रकल्पांना राष्ट्रपती पुरस्कारही लाभला. तिने तयार केलेल्या “सोशल असिस्टंट प्रोग्राम’ला पेटंट देऊन ही योजना केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबविण्यास सुरवात केली आहे. तिने सुचविलेल्या “स्मार्ट व्हिलेज’ची योजना उत्तर प्रदेशात राबविण्यास सुरवात झाली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. “एमपीएससी’मधून तिची उपजिल्हाधिकारी म्हणून नुकतीच निवडही झाली आहे आणि पंतप्रधान कार्यालयातून राष्ट्रीय सल्लागार म्हणूनही तिची निवड झालेली आहे. असे यश मिळवणारी कश्मिरा नावाजण्यासारखी आहे.
सरकारी योजनांबाबत सरकारी अधिकाऱ्यांशी तिची कायम चर्चा होत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिच्याशी संवाद साधला आहे. चीनच्या अनुषंगाने डोकलामबाबत तिने व्यक्त केलेल्या मतांवर आधारित केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेतील प्रश्नांना उत्तरे दिली होती. डोवाल व मिश्रा हे अधिकारी विविध विषयांची मांडणी करताना कश्मिराच्या नावाचा उल्लेख तिने व्यक्त केलेल्या मतांसह करत असतात, त्यामुळे तिचे महत्व आपल्याला समजून येईल. आतापर्यंत साताऱ्यात राहून ती सल्ला देत होती, आता पंतप्रधान कार्यालयातील टीममध्ये राहून ती यापुढे कार्यरत राहणार आहे.
ग्रामीण भागातील युवक/युवती घरी राहून सुद्धा अभ्यास आणि मेहनत करून काय साध्य करू शकतो, हेच कश्मिराने सर्वांना सिद्ध करून दाखवले आहे. वडील संदीप हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरी करतात, तर आई मेघा रयत शिक्षण संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्राचार्या आहे. आई-वडिलांची एकुलती एक कन्या तिच्या कर्तृत्वाने एवढे यश संपादित करीत असल्याचा त्यांना आनंद आहे. केवळ अभ्यासच नव्हे, तर ती ऍथलेटिक्समध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवरची खेळाडूही आहे. भरतनाट्यम मध्ये सुद्धा ती पारंगत आहे. आंतरशालेय वादविवाद स्पर्धेतील ती विजेती आहे. नागरी सेवेसाठी काम करू इच्छिणाऱ्या कला शाखेतील विद्यार्थ्यांना ती मार्गदर्शन करते. अकरावी, बारावीला शास्त्र शाखेचा अभ्यास करणाऱ्या कश्मिराने नंतर येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये तिने “स्टुडंट ऑफ द ईअर’ किताब मिळवला आहे. सोशिओलॉजी विषयामधून एम.ए. करताना शिवाजी विद्यापीठाची टॉपर ठरली आहे. अजून भरपूर कलागुण तिच्या अंगी असून सर्वत्र यशस्वी होत आलेली आहे.
साताऱ्यात घरी राहूनही निर्धार व अभ्यासपूर्वक पुढे जाता येते. कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता सुद्धा घरच्याघरी अभ्यास केल्याचे ती सांगते.
अशा या सर्वगुणसंपन्न सातारची कन्या कश्मिरा पवार ला @PuneriSpeaks चा सलाम??
Credit’s: Sakal Media Group
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचा:
अन्ध महासागर आणि प्रशांत महासागर यांचे पाणी न मिसळण्याचे खरे कारण
भारतात पाहिले प्रतिसरकार स्थापन करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिनी त्यांची माहिती
दिल्लीच्या संग्रहालयात दाखल होणार सातारकराने बनवलेली मराठा युद्धनौका