डॉ. रुखमाबाई राऊत यांना गुगलचा सॅल्यूट

0
डॉ. रुखमाबाई राऊत यांना गुगलचा सॅल्यूट

डॉ. रुखमाबाई राऊत यांना गुगलचा सॅल्यूट

मराठमोळी साडी…नीटनेटका भांग… गळ्यात स्टेथस्कोप अशा वेषभूषेत रूग्णांना तपासत असलेल्या एका महिलेला आज गुगलने एका खास डूडलद्वारे अभिवादन केलंय. गुगलवरचं हे चित्रं पाहून या महिला कोण? असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडेलही. पण ही महिला दुसरी-तिसरी कोणी नसून त्या आहेत पहिल्या महिला भारतीय डॉक्टर रुखमाबाई राऊत. आज त्यांची १५३ वी जयंती असून त्यानिमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांच्या कार्याला सलाम केलाय.
रुखमाबाई राऊत यांना रुक्माबाई या नावानंही ओळखलं जातं. ब्रिटीश काळातील त्या पहिल्या महिला भारतीय डॉक्टर होत्या. त्यांनी रुग्णांची सेवा केलीच, पण भारतीय महिलांच्या अधिकारासाठीही संघर्ष केला होता. बालविवाह प्रथा बंद होण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान भारतीय इतिहासात मैलाचा दगड ठरलेलं आहे.रुखमाबाईंचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ रोजी मुंबईत झाला होता. त्याकाळात बालविवाह व्हायचे. त्यामुळे त्यांचं लग्न वयाच्या ११ व्या वर्षीच दादाजी भिकाजी यांच्याशी झालं. पण लग्नानंतर त्या पतीच्या घरी राहत नव्हत्या. आईच्या घरी राहूनच त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. याचवेळी त्यांनी पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १८८४ मध्ये दादाजींनी वैवाहिक अधिकार पुर्नस्थापित करण्यासाठी बॉम्बे उच्चन्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयानेही रुखमाबाईंना वैवाहिक अधिकाराचं पालन करा अथवा तुरुंगात जा अशी तंबी दिली. मात्र रुखमाबाईंनी अजाणत्या वयात सहमती शिवाय झालेला विवाह आपण मानत नसल्याचं सांगत पतीकडे नांदायला जाण्यास नकार दिला. न्यायालयात सुरू असलेल्या या आगळ्यावेगळ्या खटल्याला प्रसारमाध्यमांनीही खूप प्रसिद्धी दिली. त्यानंतर दादाजीही काही रक्कम घेऊन घटस्फोट घेण्यास तयार झाले.
Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.