बीड: ऐतिहासिक कर्जमाफीचा डंका पिटणाऱ्या फडणवीस सरकारने हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. पण त्यातही कर्जमाफीचे आकडे बघितल्यावर धक्का बसेल. कारण बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे फक्त 339 रूपयाचे कर्ज माफ झाले आहे.
कर्जमाफीसाठी जूनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने करण्यात आली. त्यातून कर्जमाफीचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन शांत झाले. प्रत्यक्षात मात्र खूप कमी शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले. त्यातही दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार अशी घोषणा केली खरी पण कर्जमाफी फक्त शेकड्यात मिळालीय.
बीड जिल्ह्यात कर्जमाफीची यादी समोर आली आहे. त्यात शेतकऱ्यांना डोक्याला हात लावायला लागला आहे. ज्या कर्जमाफीचे फॉर्म भरण्यासाठी पाचशे रुपये खर्च केला होता तितके पैसे सुध्दा हाती पडले नाहीत. अनेकांची नाव अद्यापही या यादीत नाही. अांबेजोगाई तालुक्यातील पूस या गावातील दोन शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी मिळाली आहे. त्यापैकी गणेश गायके यांच्या नावावर एकवीस हजार रुपय कर्ज होत प्रत्यक्षात मात्र केवळ ३३९ रुपये एवढं कर्ज माफ झालं आहे. तर गंगाधर गायके या शेतकऱ्याचं बाराशे रूपये कर्ज माफ झालं आहे. दरम्यान या कर्जमाफी संबंधित एकही प्रशासकीय अधिकारी तसंच बँक अधिकारी हे बोलण्यास तयार नाहीत.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातही पाच रूपये, दहा रूपये शेतकरी कर्जमाफी झाली होती. त्यावर सगळीकडे टीकेची झोड उठली होती. त्यामुळे आता खरोखर शेतकऱ्यांचे कर्ज कधी माफ होणार हा एक खूप मोठा प्रश्न आहे.
Source