पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे॥

0
पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे॥

“आज कोणीतरी पाहुणा येणार रे…”

लहानपणची गोष्ट. दारातल्या झाडावर बसलेला एखादा कावळा जोरजोरात ओरडू लागला की आई/आजी म्हणायची – “आज कोणीतरी पाहुणा येणार रे…” 

मी विचारायचो – “तुला काय माहित?”

त्यावर उत्तर यायचे – “हा काय कावळा ओरडतोय ना !! त्याला बरोबर ठाऊक असते कुठल्या घरी पाहुणा येणार ते… तो बरोब्बर त्या घरापाशीच जाऊन ओरडणार मग…”

माझं बालमन आनंदून जायचं आणि पुढे काही काळ ‘कोण बरं येणार आज पाहुणा ??’ या विचारात छान मजेत जायचा…

पुढे मोठेपणी जेव्हा माऊलींची ही रचना वाचण्यात आली तेव्हा या कल्पनेचा वापर (कावळा ओरडतोय म्हणजे कोणी तरी पाहुणे येणार) माउलींनी किती सुंदररित्या केलाय हे वाचून स्तिमित तर झालोच पण माऊलींची शब्दकळा इथे कशी वेगळेपणाने अवतरली आहे याचेही विशेष वाटू लागले..

पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥१॥

कावळा हा शब्द उच्चारायला जरा कठीण/ जड वाटतो की काय म्हणून काऊ हा शब्द माऊलींनी असा काही वापरलाय की तिथेच आपल्या मनात एक दाद दिली जाते – की कसा मऊसूत शब्द आहे हा.. – काऊ – विशेषतः अगदी लहान मुलांना कावळा दाखवताना “काऊ” हाच शब्द घरोघरी वापरला जातो तोच माऊलींनी नेमका उचललाय – कारण त्या शब्दामागे एक जिव्हाळा आहे – एक आपुलकी आहे – मनात एक सहज उमटणारे नाते आहे –

हा कावळा आता एक साधा पक्षी राहिलेला नसून एक निरोप्या, एक सहचर झालाय – काऊ या शब्दाने तो नेमका प्रगट होतोय. आणखी एक म्हणजे – कावळा हा तसा कर्कश्श ओरडणारा म्हणून प्रसिद्ध -त्याची काव, काव बर्‍याच वेळेला नकोशी होते पण इथे ती काव, काव कर्कश नसून हवीहवीशी झालीये म्हणून त्या ओरडण्यालाही कोकताहे असा मवाळ शब्द माऊलींनी योजलाय..

एवढे या काऊविषयी माऊली आज जिव्हाळा का दाखवतात बरे? तर कारण सहाजिकच तेवढे मोलाचे आहे इथे – हे पाहुणे साधे-सुधे नसून प्रत्यक्ष पंढरीराय आहेत काय म्हणून माऊलींना तो कावळा – त्याचे ते ओरडणे हे सगळे हवेहवेसे होत आहे – त्यांचे जणू प्राण त्या वाट पहाण्यात अडकलेत इतक्या उत्कंठेने ही विराणी प्रकटलीये..

शकुन गे माये सांगताहे…

या विशेष पाहुण्याच्या आगमनाला ते शकुन म्हणून संबोधत आहेत… ज्याला कोणाला भगवंताविषयी प्राणापलिकडे प्रेम असेल तोच हा शब्द वापरू शकेल – शकुन – किती सुंदर आणि सर्व लक्षणांनी युक्त असा शब्द..

काही चांगली गोष्ट घडायची असताना काही संकेत मिळतात – जसे उजव्या डोळ्याची पापणी सतत लवणे, उजवा बाहू स्फुरणे – अशा वेळेस सहज मनात येते – काय भाग्याची गोष्ट घडणारे म्हणून हे शकुन होताहेत आज!!

आणि माऊलींना भगवंताखेरीज कुठलीच गोष्ट मोलाची वाटत नसल्याने त्यांना साधा कावळा ओरडला तरी तो शकुन वाटतोय – न जाणो हा संकेत ते पंढरीराय येण्याचा तर आहे का ?? ही अनावर उत्कंठा कशी ओसंडतीये या सगळ्या विराणीतून… या कावळ्याचे ओरडणे हाच मोठा शकुन आणि मग त्या कावळ्याचे कोडकौतुक तर किती करु नि किती नको असे माऊलींना झालंय पार…

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

तुझे सोन्यानें मढवीन पाऊ – अरे, एवढी मोठी शकुनाची गोष्ट जर घडणार असेल तर तुझे पंखसुद्धा मी सोन्याने मढवून देईन बघ …

तुला दहीभात आवडतो ना त्याचीच उंडी तुला भरवीन बघ… पण –

जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी… या माझ्या जीवाला ज्याची अत्यंत आवड आहे त्याची काही खबरबात सांग तर जरा – मला त्यातच गोडी आहे रे – अगदी पटकन सांग बरं… जराही वेळ लावू नकोस बघ…

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी। – अरे, तुला दहीभात नकोसा झाला असेल तर मी दुधाची वाटीदेखील तुला देईन रे – अगदी वाटीभरुन दूध तुझ्या ओठाला लावीन –

पण सत्य सांगे गोठी विठो येईल कायी??

पण खरंच तो विठुराणा येणारे ना रे??

काय हे आर्त!! काय ही विनवणी !!
या संसारातल्या अति क्षुल्लक, क्षणभंगुर गोष्टींसाठी मी रात्रंदिस इथे जिवानिशी झुरतो आहे आणि तिकडे माऊलींना “त्या”च्या आगमनाचे इतके मोल वाटते आहे की दारातल्या कावळ्याच्या ओरडण्यातून तो विठू येऊ घातलाय की काय अशी जगावेगळी ओढ या विराणीतून अशी काही प्रकटलीये की ही विराणी वाचतानाच डोळ्यातून अश्रूधारा लागतात अगदी – कशी ही ओढ, कशी ही विनवणी – सगळंच जगावेगळं आहे हे… ही विरहिणी अगदी अगदी वेगळीच आहे – अखेर ती अलौकिक अशा आपल्या माऊलींची आहे – त्यांची प्रतिभा, त्यांचे आर्त, त्यांचा विठूराणा – सगळे जगावेगळेच आहे पार…

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं । आजिचे रे काळीं शकुन सांगे – अरे तू तर आंब्याची रसाळ फळे खाणारा आहेस त्या रसाळ फळांनी तुझी वाणीही रसाळ झालीये तेव्हा सांग ना रे हाच शकुन (पंढरीनाथ आगमनाचा) आहे ना तो?

पैल तो गे काऊ कोकताहे… केव्हा बरे अशी ओढ लागेल या जीवालाही???- एक माऊलीच जाणे…

?हरि हरि.!?

– शशांक पुरंदरे

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.