खटाव, सातारा / अविनाश कदम
दोघांनीही वृत्त फेटाळले; नवीन सत्ता समिकरणाच्या चर्चांना उधाण
राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी राज्यात सत्ता स्थापनेचा संघर्ष सुरुच आहे. कोणत्याच एका पक्षाला बहुमत नसले तरी आघाडी करुन सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरु असतानाच उलट सुलट चर्चांनाही उत आला आहे. सर्वच पक्ष विरोधकांचे आमदार संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. शनिवारी दुपारी भाजपाचे आमदार जयकुमार गोरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त खाजगी वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडियातून झळकल्यानंतर तर अफवांचे पेवच फुटले. थोड्याच वेळात पवार आणि गोरे या दोघांनीही सदर वृत्ताचे खंडण करुनही राज्यात नवीन सत्ता समीकरण तयार होत असल्याच्या चर्चांना दिवसभर उधाण आले होते.
विधानसभा निवडणूक निकालानंतर मुदतीत कोणत्याच पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. युतीतील घटकपक्ष शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरुन मतभेद झाल्याने भाजपाशी सोयरीक तोडून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारधारा असणाऱ्या पक्षांशी घरोबा करायचे निश्चित केले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा चर्च्यांच्या अनेक फेऱ्यानंतर मिनिमम कॉमन प्रोग्रॅम आकाराला येत असल्याच्या बातम्याही येत आहेत. शिवसेना काहीही झाले तरी सरकार स्थापन करण्यासाठी सरसावली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि काही प्रमाणात कॉंग्रेसनेही कंबर कसली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार अशी गर्जना रोजच ऐकायला मिळत आहे. अगदी महाशिव आघाडीचे सरकार कसे असेल, कोणती खाती कोणत्या पक्षाकडे जातील, कोण कोण मंत्री होईल याचे अंदाज बांधले जात आहेत.
सत्ता स्थापनेच्या धामधुमीत अनेक दिवस वेट ॲंड वॉच अशी भूमिका स्विकारलेल्या भाजपाने कालपासून आमच्या शिवाय राज्यात सरकार स्थापन होणार नाही , आमचे घडणाऱ्या घडामोडींवर बारीक लक्ष आहे असे सांगून सत्तासंघर्षाला वेगळेच वळण दिले आहे. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनीही राष्ट्रवादीचे आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे विधान केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही क्रिकेट आणि राजकारणात अगदी शेवटच्या क्षणाला हरलेली मॅच जिंकता येते असे वक्तव्य करुन भाजपा सत्ता स्थापन करण्याच्या, समीकरणे जुळविण्याच्या नादात असल्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर आमचा पक्ष सोडून भाजपात गेलेले अनेक आमदार पुन्हा आमच्या संपर्कात असल्याचे सांगून काल खळबळ उडवून दिली. कॉंग्रेसच्या गोटातून असा कोणताही खळबळजनक दावा करण्यात आलेला नसला तरी सोनिया गांधी आणि शरद पवार यांची रविवारी दिल्लीत भेट होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सत्तेच्या सारिपाटासाठी इतकी चढाओढ सुरु असताना आणि उलटसुलट बातम्या येत असतानाच शनिवारी दुपारी भाजपाचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पुण्यातील मोदीबाग येथे शरद पवारांची भेट घेतल्याचे वृत्त खाजगी वृत्तावाहिन्या आणि सोशल मिडियातून वाऱ्यासारखे पसरले. त्या दोघांची भेट झाल्याने राज्यात नवीन सत्तासमीकरणे उदयाला येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. अगदी जयकुमार गोरे सेनेच्या संजय राऊतांप्रमाणे समन्वयकाची भूमिका पार पाडत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये समेट घडवून आणण्यासाठीच मोदीबागेत गेले असल्याच्या वावड्या उठल्या. थोड्याच वेळात शरद पवारांनी त्यांची आणि जयकुमार गोरेंची भेट झाली नसल्याचे सांगून या प्रकरणावर पडदा टाकला. गोरे मला का भेटतील असा प्रतिप्रश्नही पवारांनी केला. दुसरीकडे आ. जयकुमार गोरे यांनीही शरद पवारांना भेटलो नसल्याचे सांगितले. मी भाजपात आहे. माझा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. शरद पवार मोदीबाग परिसरात रहातात हे आजच आणि आमच्या भेटीच्या अफवा पसरल्यावर समजले असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या खाजगी कामानिमित्त आणि कुटुंबासह मोदीबाग परिसरात आल्याचे सांगत जयकुमार गोरेंनीही या तथाकथित भेटीत काही तथ्य नसल्याचे सांगितले.
चौकट ……..
कोण कोणासोबत आहे हे सत्ता स्थापनेवेळी समजेल …..
जयंत पाटील हे झोल देणारे नेते आहेत. हे त्यांच्या संपर्कात, ते यांच्या संपर्कात असे ते सांगत असतात. सत्ता स्थापनेला अगदी थोडा कालावधी राहिला आहे. राजकारणात काहीही होवू शकते . सत्ता स्थापन होताना कोण कोणासोबत आहे हे लवकरच दिसेल असे सूचक विधान करुन आमदार जयकुमार गोरेंनी नवीन समीकरणे आकार घेत असल्याचे संकेत दिले.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
- एसकेएफ कंपनीची ४८ लाखाची फसवणुक, आरोपीस जामीन मंजूर
- गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवला आहे …, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले
- गौतम अदानी आता टॉप 20 मध्येही नाहीत: संपत्ती फेब्रुवारी 2022 मध्ये $ 88 अब्ज होती, सप्टेंबरमध्ये 150, आज $ 61 अब्ज राहिली आहे
- Heart Attack Symptoms in marathi: यामुळे हृदयाच्या नसा होतात ब्लॉक, जाणून घ्या तज्ज्ञांकडून बचावाच्या पद्धती
- बृजभूषण शरण सिंह विरुध्द ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू, काय आहे वाद