क्रांतिसिंह नाना पाटील (ऑगस्ट ३, इ.स. १९०० – डिसेंबर ६, इ.स. १९७६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील ते राजकारणी म्हणून उदयास आले होते.
प्रामुख्याने सातारा, सांगली या महाराष्ट्राच्या भागात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करत इंग्रज शासनाला आव्हान देत प्रतिसरकार (पत्री सरकार) स्थापन करणारे पहिले स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहे-बोरगाव, वाळवा येथे झाला.
बालपण गावाकडे गेल्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नाना तलाठी म्हणून कार्यरत झाले. परंतु स्वातंत्र्याची उमेग हाती धरलेल्या नानांनी नोकरी सोडून दिली आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्य लढ्याच्या जोडीने बहुजन समाजाच्या विकासाकडे त्यांनीं आपले आयुष्य झोकून दिले होते.
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा स्वातंत्र लढा:
१९३० ला झालेल्या सविनय कायदेभंग चळवळीच्या कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. यासाठी त्यांनी स्वतःच्या नोकरीचा त्याग केला होता. ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देत त्यातून त्यांना लढण्याचे बळ क्रांतिसिंह नाना पाटील यांनी दिले. वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेल्या नानांची भाषणे लोकांना प्रभावित करीत आणि त्यातून लोकांना प्रेरणा मिळे. यातूनच लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्याचे बळ ते तयार करत. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख कार्य होते.
ब्रिटिश शासनाला आव्हान देत नानांनी इंग्रजांच्या समांतर अशी शासन यंत्रणा उभारली होती. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२ च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणत प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात उतरवली. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे त्यांनी केली आणि ब्रिटिश राज्यव्यवस्था नाकारत १९४२ च्या दरम्यान ‘सातारा’ जिल्ह्यात पहिले स्वतंत्र राज्य स्थापना केले.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दल होते.
कुंडल येथे ह्या दलाची युद्धशाळा होती. गावोगावी दोनशे शाखेतून पाच हजारांवर जवानांच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्याचे काम चालत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बाँबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावागावातील टग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली होती. प्रतिसरकार मध्ये गावातील फितूर टग्यांना पायात पत्री (बैलांच्या पायात ठोकली जाणारी लोखंडी पट्टी) ठोकून शिक्षा दिली जायची.
प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा – अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. जी.डी. लाड तुफान दलाचे फील्ड मार्शल होते. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करत नानांनी इंग्रजांना नकोसे करून ठेवले होते. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते.

नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकार्याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा सुद्धा असत.
१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात त्यांनी भूमिगत राहून प्रतिसरकार चालवले होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी जंगजंग पछाडले होते पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ब्रिटिशांनी त्यांचे घर, जमीन जप्त केले. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्हाड तालुक्यात प्रकट झाले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा प्रभाव होता. ‘गांधी -विवाह’ ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते या कार्यातून घडत गेले.
क्रांतिसिंह नाना पाटील स्वातंत्रोत्तर काळ:
क्रांतिसिंह नाना पाटील हे एक उत्तम वक्ते, पुरोगामी विचारवंत होते. त्यांचे विचार सहज-सुलभ व सर्वसामान्यांना भावतील असे होते.
आपल्या विचारांमुळे व कार्यामुळे ते सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय होते. १९५७ साली सातारा उत्तर मतदारसंघातून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर बीड मतदारसंघातून निवडून आले. शेकाप व कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून नानांनी बहुजन समाजाच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. संसदेत मराठीतून भाषण करणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे पहिले खासदार होते.
आज नानांचे अजरामर कार्य समाजाने समजून घेणे गरजेचे आहे. नानांच्या कार्याचे खरे मूल्यमापन व्हायलाच हवे. कथा, कादंबऱ्या, चित्रपट अशा अनेक माध्यमातून नानांचे कार्य उपेक्षित राहिले आहे. नानांच्या जीवनावर, कार्यावर यापुढे अधिकाधिक साहित्यनिर्मिती व्हावी.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सातारा-सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार वाळव्यामधेच त्यांचे दहन करण्यात आले.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
मराठा लाईट इन्फण्टरी बद्दलची माहिती
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?
बाप शेतामध्ये उन्हात राबतोय, पोरगा फेसबुक, व्हॉटसअप वर जाळ धूर करतोय