मुंबई : ” हॅलो, मी आत्माराम बोलतेय ! माझी गाडी सापडली का साहेब !” या विनंतीवर उर्मटपणे उत्तर देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात येते. हा सीन खरे तर नायक हिंदी चित्रपटातील. मात्र रिअल लाइफमध्ये राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री अनिल कपूर प्रमाणेच एका भ्रष्ट अधिकाऱ्याशी फोन वरून कॉमन मॅन म्हणून संपर्क साधतात. विनंती करतात. पुढे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होते. या सर्व प्रकारानंतर नायक चित्रपटाची आठवण विभागातील अधिकाऱ्यांना करून दिल्याची चर्चा या विभागात रंगली आहे.
याबाबतची माहिती अशी, की आरेचा स्टॉल हस्तांतरण करण्यासाठी अधिकारी लाच मागत असल्याची तक्रार घेऊन आलेल्या एका व्यक्तीलाच मंत्री जानकर यांनी संबधित अधिकाऱ्याला फोन लावण्यास सांगितले आणि फोनचा रिसिव्हर स्वत:कडे घेऊन अधिकाऱ्याशी सामान्य नागरिक बनून विनंती करू लागले. ज्या अधिकाऱ्याला फोन लावला होता तो अरेरावीच्या भाषेत बोलत होता. पुढे तातडीने चौकशी सुरू झाली संबंधित अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली.
कधी मुंबईतील उपनगरीय गाडीतून प्रवास करणे असेल तर कधी कुठलाही लवजमा न घेता अचानक कुठल्याही शासकीय अशासकीय कार्यक्रमांना जाणे असेल. ही मंत्री जानकर यांच्या कामाची पध्दत आहे. यावेळीही असेच झाले. नेहमीप्रमाणे एका बैठकीला जात असलेल्या मंत्री जानकर यांच्याकडे आरेचा स्टॉल हस्तांतरण करण्याबाबतचे निवेदन घेऊन एक व्यक्ती भेटायला आली. आरेचा स्टॉल हस्तांतरण करण्यासाठी प्रवीण कांबळे नावाचा अधिकारी सात लाख रूपयांची लाच मागत असल्याची तक्रार त्या व्यक्तीने जानकर यांच्याकडे केली.
त्यावर तत्काळ मंत्री जानकर यांनी तक्रारदार व्यक्तीला संबधित अधिकाऱ्याला फोन लावण्यास सांगितले. आणि तक्रारदाराच्या फोनवरून थेट सामान्य माणसांच्या भूमिकेतून मंत्र्यानी अधिकारी महोदयांशी संवाद सुरू केला. त्यावेळी अधिकाऱ्यांचा रूतबा चित्रपटातील पोलिस अधिकाऱ्यासारखाच होता. हा सर्व प्रकार संपल्यानंतर शासकीय नियमानुसार मंत्री जानकर यांनी अधिकाऱ्याच्या गुप्त चौकशीच्या सुचना दिल्या. चौकशी अहवालानंतर संबधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
Source