छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या महाराणी ताराबाई विशेष..

0
छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या महाराणी ताराबाई विशेष..

महाराणी ताराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या होत्या. छत्रपती राजाराम महाराजांशी त्यांचे लग्न १६८३-८४ च्या सुमारास झाले.

२५ मार्च १६८९ रोजी मोघलांनी रायगडांस वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या.रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. १६९४ साली ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई यांच्यासह जिंजीला पोहचल्या.

९ जून १६९६ रोजी त्यांना शिवाजी हा पुत्र झाला. १६९७ साली जिंजी मोघलांच्या ताब्यात पडला पण तत्पुर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. पण ताराबाई व इतर लोक मोघल सेनापती जुल्फिखान यांच्या तावडीत सापडले पण जुल्फिखानने सर्वांची मुक्तता केली. २ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यु झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सुत्रे ताराराणीच्या हाती आली.ताराराणीच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ,उदाजी चव्हाण,चंद्रसेन जाधव,कान्होजी आंग्रे आदि मात्तबर सेनानी होते.त्यांनी मोघलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. १७०५ साली त्यांनी मोघलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून पन्हाळा ही राजधानी बनविली.

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली. १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.

वास्तविक १७०० साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार छत्रपती शाहू महाराजांकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले. १७०७ साली औरंगजेबाचा औरंगाबादजवळ मृत्यू झाला. त्यानंतर मोगलांनी शाहूंची सुटका करताना ह्या उत्तराधिकाराचे बीज पेरले. औरंगजेबच्या मृत्युनंतर शाहूंची मोघलांच्या कैदेतून सुटका झाली. शाहू सुटल्यानंतर ताराराणी व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष सुरू झाला.

१२ ऑक्टोबर १७०७ रोजी ताराराणी व शाहू यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूचा विजय झाला. अशारीतीने ताराराणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसूकच मिळाले.शाहूच्या पक्षातील बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण,चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदि सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी सातार्‍याला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली. १७१४ साली राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर शिवाजीला पदच्युत करून राजे संभाजी ह्या राजारामाच्या दुसऱ्या मुलाला छत्रपती म्हणून नेमले. सरतेशेवटी वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली.

मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या. १७१४ साली कोल्हापूरच्या राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर राजाराम यांची दुसरी पत्नी राजसबाई यांनी आपला मुलगा दुसरा संभाजी यांस कोल्हापूरच्या गादीवर बसवून ताराराणी व तिचा पुत्र दुसरा शिवाजी यांस बंदी बनवून कैद केले. या कैदेमध्येच ताराराणीच्या पुत्राचे निधन झाले.
पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराराणीची कैदेतून सुटका झाली.त्यानंतर ताराराणी सातारा येथे राहावयास गेल्या. शाहूंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यांस दत्तक घेतले. ताराराणींचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी झाले.

कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.

दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी। ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।। रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली। प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।

जय भवानी, जय शिवाजी….

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.