महाराष्ट्र आणि मिसळ….!

0
महाराष्ट्र आणि मिसळ….!

महाराष्ट्र आणि मिसळ….!

घरगुती आणि चुलीनंतर मराठी माणसाच्या हिटलीस्ट वर क्रमांक लागतो मिसळ या पदार्थाचा…. सकाळ, दुपार, संध्याकाळ मराठी माणसं फक्त मिसळ खातात काय अशी शंका यावी इतपत मिसळीचे प्रस्थ वाढले आहे. गुगल वर महाराष्ट्रातुन सनी लिओने व मिया खलिफा नंतर सर्च होणारा सर्वाधिक चविष्ट विषय म्हणजे मिसळ आहे असे नुकतेच मला सुंदर पिचईने मिसळ खात असताना सांगितले. (सुंदर हे नाम आहे मिसळीचे विशेषण नाही)

जगात अनेक शास्त्रज्ञ मानवी जीवन अधिकाधिक सुसह्य होण्यासाठी निरनिराळे शास्त्रीय प्रयोग करतात आणि तेवढीच उर्जा व कल्पकता लावुन आम्ही मिसळीवर प्रयोग करतो. जगात जेवढी काही उत्पादनं आहेत ती घेऊन मिसळीत टाकण्याच्या ध्यासाने आम्हाला पछाडलेले आहे. उत्क्रांती पुर्व काळातील मिसळ म्हणजे रस्सा, शेव, कांदा, कोथींबीर अशी साधीसोपी होती. परंतु इंग्लंड मध्ये जसे औद्योगीकरणाची क्रांती झाली तशी क्रांती महाराष्ट्रात मिसळ या पदार्था बाबत झाली.

घे पोहे टाक मिसळीत, घे मुरमुरे टाक मिसळीत, घे ज्वारी टाक मिसळीत, घे भात टाक मिसळीत, घे दगड टाक मिसळीत, घे सिमेंट टाक मिसळीत. म्हणजे मानवनीर्मित कुठला पदार्थ दिसला रे दिसला कि तो मिसळी मध्ये टाकण्यासाठीच तयार केला गेला आहे अशी आमची ठाम समजूत आहे.

बरं सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्ही पडलो मऱ्हाठी माणसं. जितकी मराठी माणसं तितक्या अस्मिता व त्या मागोमाग येणारा ज्वाजल्य अभिमान. पुणेकरांनी मोठ्या टेचात मिसळीच्या पोस्ट करायला सुरुवात केल्यावर उर्वरीत महाराष्ट्राने फक्त घुटक्या गिळत तोंडाकडे पहात बसावे काय ? छट्……

तुमची पुणेरी मिसळ म्हणजे अगदीच गुळमुळीत ….. एकदा आमची नागपुरी मिसळ खाऊन पहा भो. नागपुरच्या मिसळीचं काय कौतुक सांगायलायेस, एकदा आमच्या कोल्हापूरची मिसळ खाऊन सांग रांडच्या. काय कोल्हापूरी मिसळ कोल्हापूरी मिसळ म्हणून क्राऊड गोळा करतो आहेस. संपूर्ण लाईफटाईम मध्ये एकबार हमारे बॉम्बे कि मिसळ खाऊनके बताना. या अशा पद्धतीने महाराष्ट्रातील जेवढी काही शहरं आहेत त्या सगळ्यांच्या नावाने आता मिसळ मिळते. बरं तेवढ्यावर थांबेल तो कसला मऱ्हाठी माणूस. त्या त्या शहरातील जेवढ्या काही पेठा, गल्लीबोळ , उपनगरं आहेत त्या त्या नावांनी सुद्धा आता मिसळ मिळते. चिंचपोकळीची पहिल्या धारेची प्रसिद्ध मिसळ , शाहू गल्लीतली झणझणीत सुप्रसिद्ध मिसळ, कात्रजची दणदणीत कुख्यात मिसळ, थुरकटवाडीची कुप्रसिद्ध भुरकट मिसळ…….!

हे कमी होते कि काय म्हणुन आणखी व्हरायटी आणण्यासाठी गॅसवरची ताजीताजी मिसळ , चुलीवरची गरमागरम मिसळ , तंदुरीतील करपलेली मिसळ , फ्रीज मधली गारेगार मिसळ , अंटार्टीकातील मऊसुत बर्फ टाकलेली मिसळ , सहारा वाळवंटातील लुसलूशीत वाळू टाकलेली मिसळ अशाही फोडण्या देणे सुरू आहे.

मग सुरु झाले मिसळ प्रेमींचे व्हॉट्सॅप ग्रुप , फेसबुक ग्रुप , रोटरी क्लब , लायन्स क्लब. एवढेच काय पुणे विद्यापिठात मिसळ हा विषय घेऊन एका विद्यार्थ्याने पिएचडी देखिल मिळवल्याचे देखील मी संध्यानंद मध्ये नुकतेच वाचले. तर महाराष्ट्र शासन मिसळीला जागतिक ठेवा म्हणून जतन करावे यासाठी युनोकडे मागणी करणार असल्याचे देखील ऐकले.

तर मिसळ हा पदार्थ सोडून आम्ही बरंच काही वेगवेगळं खातो. आम्ही उपीट, वरणफळ, फोडणीचा भात, पोहे, थालीपीठ, दुधातल्या शेवया असे अनेक पदार्थ खातो परंतु सध्या मिसळीचा ट्रेंड आहे. ते संपेपर्यंत हे मिसळ पुराण असेच चालू राहिल. तो ट्रेंड संपला कि मग सुरू होईल…….

घरगुती, चुलीवरचा , शुद्ध तुपातला, बिस्लेरी पाणी वापरून बनवलेला, झणझणीत , दणदणीत , खमंग , लज्जतदार, पश्चिम महाराष्ट्र , कोकण, विदर्भ , मराठवाडा, उर्वरीत महाराष्ट्र, सोलापुर, धुळे, नाशिक , पुणे, कुर्ला, कॅनोट, शिवाजी पेठ येथील सुप्रसिद्ध , कुख्यात , इंडियाज मोस्ट वाँटेड चपात्यांचा चिवडा !

लेखक: तुषार दामगुडे

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

पुण्यातील इंजिनिअर तरुणाचे ‘कडक स्पेशल’ चहा दालन प्रसिद्धीच्या शिखरावर

History of PUNE: पुण्याचा इतिहास, असे घडले पुणे…..!

नरेंद्र दाभोलकर हत्या: नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा अटकेत, तपास सुरू

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.