महाराष्ट्र संस्कृती: महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख

0
महाराष्ट्र संस्कृती: महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख

महाराष्ट्र संस्कृती: ‘महाराष्ट्राचा’ प्राचीन उल्लेख .

इतिहासात ‘महाराष्ट्र’ ह्या शब्दाचा नेमका पहिला उल्लेख कुठे आला?
चला तर मग ह्या ‘महाराष्ट्र देशाचे’ ऐतिहासिक संदर्भ पाहू.

महाराष्ट्र संस्कृती

साधारण चौथ्या शतकापासून पुढे ‘महाराष्ट्र’ हा उल्लेख सापडतो.

इतिहासापासून ते सण १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळण्यापर्यंत महाराष्ट्राची निश्चित अशी सीमारेषा अधोरेखित केलेली नव्हती.

१ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग त्यात कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली.

भाषिक रचनेनुसार १ नोव्हेंबर १९५६ रोजी बनलेल्या सध्याच्या मध्यप्रदेशात ह्या ‘महाराष्ट्रा’ चा सगळ्यात पहिला उल्लेख सापडतो.

मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील ऐरण ह्या गावी इसवी सन ३६५ चा एक स्तंभलेख आहे. डॉक्टर वासुदेव विष्णू मिराशी ह्यांनी हा स्तंभलेख उजेडात आणला होता. (हे मोठे संस्कृत अभ्यासक आणि इतिहास संशोधक होते.)

श्रीधरवर्माचा आरक्षिक आणि सेनापती असलेल्या सत्यनाग याने ह्या स्तंभलेखात स्वतःला ‘माहाराष्ट्र’ असे म्हंटलेले आहे. त्या स्तंभलेखातला ‘महाराष्ट्र’ ह्या शब्दा संबंधित लिहिलेला मजकूर असा:
” राज्ञ्: आरक्षिकेने ण सेनापती सत्यनागेन
महाराष्ट्र अ मु — खेन महाराष्ट्रेन शांतीकर्दीसर्वसत्व त्व सु हिताय रच…”

तर असा हा महाराष्ट्राचा पहिला उल्लेख.

ह्या नंतर इसवीसन ५०५ मधील वराहमिहिराच्या बृहत्संहितेच्या दहाव्या अध्यायात महाराष्ट्रीय ह्या अर्थाने ‘महाराष्ट्रा:’ हा शब्द वापरलेला दिसतो.
तो श्लोक आपण पाहू:
” भाग्ये रस विक्रयिण: पण्यश्रीकन्यका महाराष्ट्रा: !
आर्यन्मे नृपगुडलवण भिक्षुकाम्बुनी तक्षशिला !!
तर असा हा वराहमिहिराच्या बृहत्संहितेतील श्लोक.

आता ह्या पुढे ह्याच बृहत्संहितेवरील भटोत्पलाच्या टीकेत महाराष्ट्राचा प्रदेशवाचक असा महत्वपूर्ण उल्लेख ऐकलेलं आहे.
तो असा: ” महाराष्ट्र महाराष्ट्रदेशे ये जना निवसंती ”

पुढे सातव्या शतकात प्रसिद्ध झालेल्या ‘दंडी’ ह्या कवीने आपल्या काव्यात ‘महाराष्ट्री आणि ती जेथे प्रचलित आहे तो महाराष्ट्र’ यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
तो आपण पाहू:
” महाराष्ट्रश्रयां भाषा प्रकृष्ट प्राकृतं विदू: !
सागर: सूक्तिरत्नांना सेतूबंधादी यन्मयम ” !!
( ह्या श्लोकाचा अर्थ असा होतो कि महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या भाषेला उत्कृष्ट प्राकृत असे म्हणतात. या भाषेमध्ये सुभाषित रत्नांचा सागरच असे सेतुबंधादि ग्रंथ रचले आहेत. )

आता आपण ह्याही पुढे जाऊन महाराष्ट्र संस्कृती चा उल्लेख पाहू
सातव्या शतकातल्या ‘संघदासगणी’ नावाच्या जैन मुनीने आपल्या बृहत्कल्प भाष्यात महाराष्ट्राच्या ‘कोल्लूक’ परंपरेचा उल्लेख केलेला आहे.
( टीप: हि ‘कोल्लूक’ परंपरा काय आहे ते शोधले पाहिजे. )

तो श्लोक आपण पाहू: ” अथ प्रभूत सुपकरनं नं शक्रोती सर्व मेकवारं नेतु तदा त्रिषु चतुश्रू वा कल्पेषु बध्दवा कोल्लूक परंपरकेंनं महाराष्ट्र प्रसिद्ध कोल्लूक चक्र परस्पर न्यायेन निश्काश्ययति. ”

ह्या नंतर इसवीसन ९०० च्या सुमारास झालेल्या राजशेखर ह्याने अनेकवेळा महाराष्ट्राचा प्रदेश विशेष सूचक असा उल्लेख केलेला आहे.

ह्या निर्देशांतून त्याचा महाराष्ट्राभिमान दिसून येतो.

आपल्या पंजोबाचे वर्णन करताना तो “महाराष्ट्र चुडामणी” असे विशेषण वापरतो. तसेच तो आपल्या प्रबंध कोशातही जवळच्या इतर प्रदेशांबरोबर महाराष्ट्राचाही उल्लेख करतो.
तो उल्लेख आपण पाहू: ” ततो दक्षिणापथे महाराष्ट्र – तिलंगण – कर्नाट – पांड्यादी राष्ट्रांन्य साधयत् ”

तसेच ९०० च्या सुमारास झालेला राजशेखर पुढे त्याच्या ‘बालरामायन’ ह्या नाटकातील एका प्रसंगात महाराष्ट्राविषयी माहिती सांगतो. ती अशी:
श्रीराम हा सीतेसह श्रीलंकेहून अयोध्येला परत जात आहे. जाता जाता त्यांनी कावेरी ओलांडली, कर्नाटकही ओलांडला. नंतर जेंव्हा महाराष्ट्र लागला तेंव्हा सुग्रीव रामचंद्राला म्हणाला ‘भारताग्रज अयमग्ने महाराष्ट्र विषय: ”
म्हणजे तो सुग्रीव रामास म्हणतो कि “रामा, हा पुढे महाराष्ट्र दिसतो तो पहा. ”

इसवीसन 900 नंतर मग ‘महाराष्ट्र्र’ नावाचे पुढे असंख्य उल्लेख आलेले आहेत. वेगवेगळ्या राजसत्तांचा उदय जस जसा होत गेला तस तसा महाराष्ट्राचा उल्लेख त्यांच्या कार्यांत आलेला आहे.

तर असा हा ऐतिहासिक संदर्भ असलेला आपला सर्वांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्र संस्कृती.

लेखक: सतीश शिवाजीराव कदम

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

मराठ्यांचा राजा ‘शिवा’चा जेव्हा शिवा‘जी’ होतो

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

शिवाजी महाराज इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज माहिती, अफजलखान वध, शिवराज्याभिषेक, मराठा साम्राज्य, आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराज वंशावळ

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.