औरंगाबाद : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून गनिमी कावा आंदोलन केलं जाणार आहे. औरंगाबादेत मराठा समन्वय समितीची महासभा पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
समितीने सरकारला आश्वासनपूर्तीसाठी 2 महिन्यांचं अल्टीमेटम दिलं. यापुढे गनिमी कावा आंदोलन करणार असून पुढील उद्रेकास सरकार जबाबदार असेल, असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला.
या महासभेसाठी राज्यभरातील 200 प्रतिनिधी उपस्थित होते. सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाने लावून धरली आहे. त्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यात मूक मोर्चाही काढण्यात आला.
मुंबईत 9 ऑगस्टला मराठा समाजाने अखेरचा मूक मोर्चा काढत, आरक्षणाची मागणी केली होती. राज्यभरात मराठा समाजाने अनेक भव्य मोर्चे काढून आरक्षणाची मागणी केली आहे.
पुण्यात २५ सप्टेंबर २०१६ रोजी मराठा क्रांती मोर्चा काढून समस्त पुणेकरांनी आपल्या मागण्या मांडल्या होत्या.
मुंबईतील मोर्चावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याची घोषणा केली होती. मराठा आरक्षणाबाबत समन्वय ठेवण्यासाठी ही समिती संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादा देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मराठा मोर्चावेळी म्हटलं होतं. तसंच मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमून दर तीन महिन्याला समन्वय ठेवण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं.
Source