दिल्लीच्या संग्रहालयात दाखल होणार सातारकराने बनवलेली मराठा युद्धनौका

0
दिल्लीच्या संग्रहालयात दाखल होणार सातारकराने बनवलेली मराठा युद्धनौका

इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे यांनी या युद्धनौका प्रतिकृती तयार केल्या आहेत. मूळचे पाडळी निनाम, जिल्हा सातारा येथील आहेत.

जितक्या मेहनतीने शेतात नांगरणी आणि पेरणी केली तितकीच मेहनत घेवून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अजिंक्य अशा मराठी आरमारातल्या नौकांच्या प्रतिकृती तयार केल्या आणि त्याच्या या मेहनतीची दखल थेट दिल्लीतल्या आलिशान संग्रहालयाने घेतली. या संग्रहालयाची शान आता गलबत, गुराब, मचवा, पाल, महांगिरी या मराठी नौका वाढविणार असून त्यासोबत मराठी आरमाराचा गौरवशाली इतिहासही झळकणार आहे. इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे यांनी या प्रतिकृती तयार केल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हटले जाते. ज्या आरमाराने इंग्रज, पोर्तुगीज, डच अशा स्वतःला सागराचे मालक समजणाऱ्या परकीय सत्तांनाही धाक बसवला, त्या आरमारातल्या नौका नेमक्या कशा होत्या, त्यांच्या प्रतिकृती आज उपलब्ध का नाहीत, त्यावर मोजकीच पुस्तके का उपलब्ध आहेत, अशा विविध प्रश्नांचा वेध घेताना या नौकांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने घनश्यामने स्वतः या प्रतिकृती बनवायला सुरुवात केली. घरचे शेतीचे दैनंदिन व्याप सांभाळून इतिहासाचा अभ्यास करत त्यासाठी भरपूर तयारी केली.

३६० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबरला शिवछत्रपतींनी कल्याण जिंकून आरमाराच्या निर्मितीचा शुभारंभ केला. पुढे या आरमाराचा धाक समुद्रावर फिरण्याची परवानगी इतरांना देणाऱ्या पोर्तुगीजांनी आणि इंग्रजांनीही घेतला. स्वतः औरंगजेब बादशहाही मक्केला जाणाऱ्या जहाजांसाठी बाराशे अशरफी पोर्तुगीजांकडे भरत असे. अशा परिस्थितीत राजांनी आरमार उभे केले. सिंधुदुर्ग-विजयदुर्गसारख्या भक्कम सागरी दुर्गांची फळी उभी केली. ‘ज्याचे आरमार त्याचा समुद्र’ ही उक्ती प्रमाण मानून स्वराज्याची सागरी हद्द संरक्षित केली आणि त्यातूनच पुढे इतिहास घडत गेला.

‘हा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा. मराठी आरमारातल्या युद्धनौकांचा प्रतिकृती समोर असतील तर त्याविषयी आणखी गोडी निर्माण होईल या विचारातून मी मराठी आरमारी नौकांविषयी अभ्यास करू लागलो. मराठी आरमारावरील कागदपत्रांतून त्यांचे प्रकार, संख्या या विषयीचे लेखन मिळाले मात्र आकार, लांबी-रुंदी या विषयी त्रोटक माहिती उपलब्ध आहे. उत्तरकालीन मराठा चित्रशैलीतून गलबत, गुराब, मचवा, पाल, महागिरी या युद्धनौकांची चित्र आणि तऱ्हा म्हणजे कापडे नकाशे उपलब्ध आहेत. त्या आधारे प्रतिकृती बनवायला सुरुवात केली’, असे ढाणे सांगतात.

हे शिवधनुष्य पेलताना ढाणे यांनी रॉबर्ट ऑर्मे, जेमिनी कॅरे, कॅप्टन केग्विन यांनी केलेली वर्णने वाचली. रामचंद्रपंत अमात्यांनी शिवनीती सांगतानाच्या आज्ञापत्रातील आरमाराविषयीच्या माहितीनुसार गलबत, गुराब, मचवा यांची रेखाटने ढाणे यांनी केली. रेखाटने केल्यानंतर पुण्यातून वूड कटिंग आणि कार्व्हिंगच्या मशीन आणल्या. आपल्या पत्नीनेही या कामात मदत केल्याचे ते आवर्जून सांगतात. त्या दोघांनी मिळून तीन मराठी युद्धनौका बनवल्या. हे काम करताना त्यांच्या पत्नीला अपघात झाला; तरीही काम सुरूच राहिले.

‘डॉ. रजनी इंदूलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि मित्र महेश फणसाळकर आणि नीलेश जेधे यांच्या सहकार्याने हा प्रकल्प होऊ शकला, दिल्लीतल्या संग्रहालयाने या प्रतिकृती विकत घेतल्या असून त्या इतिहासासह प्रदर्शित केल्या जाणार आहेत’ असे ढाणे यांनी सांगितले.

कायमस्वरूपी प्रदर्शन
इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे मूळचे पाडळी निनाम (जि. सातारा) इथले असून त्यांच्या तारळे येथील शेतात मराठी आरमार या विषयावरचे कायमस्वरूपी प्रदर्शन येत्या जानेवारी महिन्यापासून भरविणार आहेत. त्यात मराठी आरमारातल्या युद्ध आणि व्यापारी नौका पाहायला मिळतील. गलबत, गुराब, मचवा, पाल आणि तरांडी या युद्धनौका; तर महागिरी, जुग, तारु, होडी या वाहतुकीच्या नौकांचे प्रकारही या प्रदर्शनात असणार आहेत.
Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.