सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू अमुच्या ने जीवना ||धृ||
मराठीतील डिजिटल क्रांती
सर्वप्रथम सर्व मराठीजनांना व मराठीवर प्रेम करणाऱ्या सुह्रदांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! गेल्या काही दिवसांपासून किंबहुना काही वर्षांपासून #अभिजातमराठी म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून चालत असलेले आपले प्रयत्न यंदाच्या वर्षी थोडे अधिक जोमाने चालल्याचे बघून #अभिजातमराठी संदर्भात आशावाद वाढलेला दिसतो. याच पार्श्वभूमीवर तुमच्या आमच्या सारख्यांनी पारंपारिक माध्यमांसोबतच ई- माध्यमे किंवा डिजिटल माध्यमांवर धरलेला मराठीच आग्रह निश्चितच कौतुकास्पद आहे.
आजच्या ऑनलाईन क्रांतीच्या युगात माणसं ही अधिक जवळ आली असं आपण म्हणतो. वास्तवात प्रत्यक्ष संवाद दुरावला हा मुद्दा अलाहिदा.. लोकांतील आचार-विचार आदानप्रदान करण्याची क्षमता किंवा माध्यम म्हणून भाषा ही पहिली पायरी ठरते. त्यानंतर ती भाषा एखाद्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवून व लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचे महत्वाचं काम सध्या डिजिटल क्रांती करत आहे.. याप्रसंगी जर ती आपली बोलीभाषा किंवा मातृभाषा असेल तर ती अधिक समृद्ध व भक्कमपणे प्रचारित होते. आपल्या मराठी भाषेचे उदाहरण घ्या. जगाच्या पाठीवर इतरत्र जेव्हा दोन मराठी माणसं अनवधानाने भेटतात, तेव्हा त्यांना मराठी माणूस भेटला म्हणून झालेला आनंद अवर्णनीय असतो. त्याचप्रकारे डिजिटल जगात आज व्यक्त होताना मराठी भाषेचं वाढलेलं प्रमाण प्रशंसनीय आहे.
समाजमाध्यम उर्फ सोशल मीडिया हा आजच्या पिढीच्या आयुष्याचा अविभाज्य अंग. सुरुवातीस त्याद्वारे व्यक्त होताना भाषा हा मुद्दा नव्हताच. मन मानेल तसे सोप्या, हिंग्लिश, मारलिश म्हणजेच तरुणाईच्या भाषेत व्यक्त होत असे. मात्र हळूहळू भारतीय भाषा समाज माध्यमांवर बाळसं धरू लागल्या त्याप्रमाणे लोकं आपल्या भाषेतून व्यक्त होऊ लागलीत. मराठी विषयी बोलायचं तर सुरुवातीच्या टप्प्यात मराठीतील काही वर्ण किंवा जोडाक्षरे लिहिताना अडचणी यायच्या. पुढे जाऊन सी-डॅकच्या प्रयत्नाने मराठीतील अद्ययावत मराठी बाराखडी उपलब्ध झाली. या सर्वांचाच परिपाक म्हणजे समाज माध्यमांवर मराठीत व्यक्त होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग,आदी ठिकाणी मराठीजनांची जमलेली मांदियाळी आपली भाषा अधिक समृध्द करताहेत. आज अनेकजण विविध माध्यमांवर त्यांचे अनुभवकथन, लेखन, छंद, कविता, प्रवासवर्णन, ई. नव्हे तर ज्या गोष्टी इंटरनेट वर मराठीमध्ये सहजासहजी उपलब्ध नाही अशा बाबी मराठीत भाषांतरीत करून सोप्या पद्धतीने मांडल्या जातायत. उदाहरण द्यायचे झाले तर संगणक विज्ञान क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, आरोग्य शास्त्रातील नवे संशोधने, कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या नव्या बाबी आपल्या पर्यंत सहजपणे पोहोचू लागल्या आहेत.
ट्विटर वरील मराठीतील डिजिटल क्रांती
याठिकाणी मला ट्विटरवरील मराठी भाषेच्या प्रवासाविषयी थोडं आवर्जून बोलायला आवडेल. सुरुवातीला केवळ १४० अक्षरांची मर्यादा असताना त्यातही मराठीतून लिहिताना आपल्या सर्वांची खूप दमछाक व्ह्यायची. तरी सुद्धा अक्षर मर्यादेचं भान जपत आपण व्यक्त होत असू. सुदैवाने ही अक्षर मर्यादा २८० झाल्याने तर मराठीजनांना विचारांचे जणू धुमारेच फुटले. मर्यादा वाढताच ट्विटरवरील मराठी भाषेचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे दिसून येते. त्याचाच भाग म्हणजे अनेक मराठीप्रेमी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृध्द कशी होईल या उद्देशाने व्यक्त होतात. दरवर्षी राज्यात अ. भा. मराठी साहित्य संमेलन भरतं. सर्वांनाच काही संमेलनात जाऊन व्यक्त होता येत नाही, त्यामुळे आपल्या कला- साहित्य सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून ट्विटरवर आभासी असे #टि्वटरसंमेलन भरवले जाते. याठिकाणी #टि्वटरसंमेलन या हॅशटॅग अनेकजण व्यक्त होतात. नुकतेच १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान हे आभासी साहित्य संमेलन प्रचंड प्रतिसादात पार पडले. #टि्वटरकट्टा हा सुद्धा एक ट्विटरवरील महत्त्वाचा उपक्रम म्हणता येईल. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत थेट प्रश्नोत्तराचा तास रंगतो. राजकारण, समाजकारण, संगीत, चित्रपट, खेळ, ई अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी याठिकाणी हजेरी लावून मराठी लोकांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे वर्षभरातील काही खास दिवशी किंवा सण-उत्सवाला एखादा हॅशटॅग ट्रेण्ड करून त्यांतर्गत अनेकांच्या विचारांचे आदान प्रदान होत असते.
शासन किंवा इतर प्राधिकारी संस्थांमार्फत मराठीतील अनेक पुस्तके, ग्रंथ, साहित्यांचे डिजीटायझेशन करण्याचे प्रयत्न खूप कौतुकास्पद आहे. भाषा संचालनालय द्वारा दैनंदिन प्रशासन व्यवहारात सातत्याने उपयोगी पडणाऱ्या कार्य दर्शिका, प्रशासन वाक्प्रयोग, शासन व्यवहार कोश, न्याय व्यवहार कोश या अॅपच्या माध्यमातून सुमारे ८६ हजार इंग्रजी-मराठी शब्दांचे दालन खुले करण्यात आले आहे. त्याचबरोबर शासन व्यवहारातील व शास्त्रशाखेतील संज्ञावलींचा मराठीत प्रमाणित असा कोश उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने काम भाषा संचालनालय द्वारा होत आहे. त्याच संदर्भातील ३४ परिभाषा कोश व शासन मार्गदर्शन पुस्तकांची निर्मिती होत आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माध्यमातून मराठी विश्वकोशाचे २० खंड प्रकाशित झाले आहे. त्यात अ ते ज्ञ पर्यंतचे सुमारे १८०५७ नोंदीचा समावेश आहे. वाचकांना २० खंड सहजगत्या हाताळता व वाचता यावे म्हणून सर्व २० खंडांचे डिजीटायझेशन करून ते पेन ड्राईव्हच्या स्वरूपात उपलब्ध झाले आहे. मराठीचा डिजीटायझेशनचा प्रवास अद्याप बराच बाकी आहे. किंडल सारख्या ई-फलाटावर हवं तेवढं मराठी साहित्य अद्यापही उपलब्ध झालं नाहीये. सुमारे २००० वर्षांपासूनचे मराठीचे पुरावे आपल्याला मिळत असताना तो समृध्द ठेवा जतन करता यावा म्हणून अधिकाधिक मराठी साहित्य डिजीटायझेशन करून ठेवणे गरजेचे आहे. आजही अनेक घटकांचे साहित्य आपल्या अवतीभवती विखुरलेल्या स्वरुपात आहे. एवढंच नाही तर शाहू, फुले, आंबेडकर यांच्या साहित्यासह महाराष्ट्राची संस्कृती म्हणावी असे लोकसाहित्याचे सुद्धा डिजीटायझेशन होणे गरजेचे आहे. तेव्हा आपण सर्वजण मिळून मराठीच्या प्रसारासाठी, समृद्धीसाठी प्रयत्न करूयात आणि आजच्या मराठी भाषा दिवस ज्यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होतोय त्या कुसुमाग्रजांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं…
“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी..
एवढ्या जगात माय मानतो मराठी.
लेखक: ऋषिराज तायडे
संपर्क: ९४०४१४१२१६
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
अभिजात भाषा दर्जा म्हणजे काय? #अभिजातमराठी |
पाच दिवसाच्या बाळाला कवेत घेऊन लष्कर अधिकारी आली आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराला
Apratim..khup chan
Khup sundar