आयपीएलच्या लिलावात तब्बल 2.6 कोटी रुपये मिळविलेला आणि वडील रिक्षाचालक असलेल्या महंमद सिराजची ट्वेंटी-20 भारतीय संघात निवड झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाल्याने सिराजचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आज (सोमवार) न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. जलदगती गोलंदाज म्हणून ओळख असलेल्या महंमद सिराज याच्यासह मुंबईच्या श्रेयस अय्यर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. आगामी विश्वकरंडक डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयकडून भारतीय संघाची बांधणी करण्यात येत आहे. युवा जलदगती गोलंदाज म्हणून सिराज सर्वप्रथम उजेडात आला तो सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या लिलावात त्याच्या बोलीच्या 13 पट जास्त बोली लावत 2.6 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याची आयपीएलमधील कामगिरीही उल्लेखनीय होती.
सिराजने या निवडीबद्दल आपल्याला विश्वास बसत नसल्याचे म्हटले आहे. मी एवढे काही मिळवेल असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली आहे. 2015 च्या रणजी मोसमात त्याने नऊ सामन्यांमध्ये 41 बळी घेतल्याने त्याच्यावर निवडकर्त्यांचे लक्ष केंद्रीत झाले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावात त्याचे आयुष्यच बदलून गेले.
सिराज हा लहानपणी टेनिसच्या चेंडूवर गल्ली क्रिकेट खेळत होता. तीन वर्षांपूर्वी त्याचा आईने त्याला क्रिकेटमध्ये विशेष लक्ष देण्यास सांगितले अन् त्याने क्रिकेटमध्ये आपली रुची दाखविली. हैदराबादचा असलेल्या सिराजने चारमीनार क्रिकेट क्लबमधून खेळण्यास सुरवात केली. सर्वप्रथम तो सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळला. तेथे 10 बळी मिळविल्यानंतर त्याने रणजीत पदार्पण केले. तेथेही 41 बळी घेतल्यानंतर आज तो भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करत आहे. सिराजचे वडिल रिक्षाचालक असून, एका सामान्य कुटुंबातील तरुणाने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
Source