राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीची बैठक गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिरात आयोजिण्यात आली होती. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत आपण निवडणूक कशी लढवायची, याबाबत कार्यकर्त्यांना विचारणा करण्यात आली. यामध्ये स्वबळावर, शिवसेनेसोबत, काँग्रेससोबत आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्रित असे पर्याय देण्यात आले. यामध्ये स्वबळाच्या पर्यायालाच सर्वाधिक पसंती मिळाली. सर्व कार्यकर्त्यांनी हात उंचावून स्वबळाच्या निर्णयाला पसंती दिली.

‘शहर कार्यकारिणीने स्वबळावर लढण्याच्याच पर्यायाला शंभर टक्के प्रतिसाद दिला. आम्ही कोणालाही कमी लेखत नाही. मात्र, प्रभागरचना पाहता अनेक ठिकाणी इतर पक्षांकडे सक्षम, तुल्यबळ उमेदवारही नाही. त्यामुळे शहरात स्वबळावर लढण्याची ताकद असताना इतर पक्षांसोबत घासाघीस करू नये, अशी आमची भूमिका आहे. पुढील निर्णय पक्षाचे नेते अजित पवार घेतील,’ असे प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.
आगामी महापालिका निवडणूक स्वबळावरच लढण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यकारिणीने गुरुवारी एकमताने मंजूर केला. स्वबळावर लढायचे की आघाडी करायची याचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना देण्याचेही या ठरावात नमूद आहे.