पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील चिंचवड स्टेशन, आकुर्डी, चऱ्होली,जुनी सांगवीतील प्रत्येकी चार जणांचे आज (गुरुवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर,वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पुण्यातील गाडीतळ येथील एका महिलेचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा 57 वर पोहचला आहे, तर पिंपरी-चिंचवड शहरातील 183 आणि शहराबाहेरील 20 अशा 203 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यामध्ये साळवे यांनी महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट आज सकाळी आले आहेत, असे सागितले. त्यामध्ये आकुर्डी, जुनी सांगवी, च-होली आणि चिंचवड स्टेशन येथील चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. 28 वर्षीय महिला, 23, 58, 40 वर्षीय पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे.
त्यातील आकुर्डीतील पॉझिटीव्ह रुग्णावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, पुण्यातील ताडीवाला रोड येथील पण पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 50 वर्षीय महिलेचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

महापालिका रुग्णालयात 57 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील 183 आणि शहराबाहेरील 20 अशा 203 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील सहा रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, 116 जणांनी आत्तापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.