हृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत

0
हृदयद्रावक घटना आणि वृत्तवाहिन्या ; यावर लोकांचे मत
Share

खूप खूप वर्षांपूर्वी कॅसेट किंग गुलशन कुमार याचा खून झाला त्या दिवशी वृत्त माध्यमे वार्तांकनाकरता कोणत्या थराला जाऊ शकतात आणि स्टुडिओत बसलेले न्यूज अँकर प्रत्यक्ष घटनास्थळी असलेल्या वार्ताहरांकडून काय काय वदवून घेऊ शकतात ह्याची झलक पाहायला मिळाली हे अजूनही लक्षात आहे. गुलशन कुमारच्या घरातला तसेच नातेवाइकांचा बाईट मिळवण्याची धडपड तर चालली होतीच त्यातच एक न्यूज अँकर विचारात झाला , ” अंदर माहोल कैसा है ? ” अरे ज्याचा खून होऊन दोन चार तासही उलटले नाहीयेत त्याच्या घरातला माहोल कसा असणार ? आणि घटना स्थळावरचा तो किंवा ती वार्ताहरही माहोलचे वर्णन करून सांगत होता.

वृत्त वाहिन्यांची ” लाईव्ह ” वखवख २६/११च्या संध्याकाळीही पहायला मिळाली. एक दृश्य अजूनही लक्षात आहे. कसाब टोळीच्या अंदाधुंद गोळीबारानंतर व्हीटी स्थानकातील प्रवाशांच्या मदतीकरता धावणाऱ्या एक पोलीस हवालदाराला एका वृत्त प्रतिनिधीने अडवलंय, ती त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करतीये, तो बिचारा माहिती देत ” मला जाऊ द्यात” असं तिला विनवतोय, पण ही बाई काही त्याला सोडायला तयार नाही, शेवटी तो कसाबसा स्वतःची सुटका करून घेतो आणि आपलं कर्तव्य पार पाडायला व्हीटीच्या दिशेने धाव घेतो.

वृत्त वाहिन्यांचा सर्वात हीन प्रकार दोन एक वर्षांपूर्वी बघण्यात आला. पुण्याहून अलिबागजवळच्या समुद्रकिनाऱ्यावर सहलीकरता गेलेल्या काही महाविद्यालयीन तरुण तरुणींपैकी काही जण समुद्रात बुडून मरण पावले. त्याचं ” लाईव्ह ” वार्तांकन करताना एका मराठी वाहिनीची न्यूज अँकर ” ही बातमी आमच्याच वाहिनीवर सर्वप्रथम लाईव्ह ” असं तारस्वरात किंचाळत होती. वार्तांकनाचे हे असले प्रकार पाहिले की घटनेचं गांभीर्य कमी होऊन वृत्तवाहिन्यांच्या ह्या असल्या बीभत्स प्रकारांमुळे आपला रक्तदाब वाढतो हे लक्षात आल्यापासून मी अशा बातम्या वृत्तवाहिन्यांवर पूर्ण पाहात नाही. बातमीचा मथळा पहायचा आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ती बातमी वाचायची. दुर्घटनेबाबत तर आपण काही करू शकत नाही पण अशा घटनांचं वार्तांकन न पाहून वृत्तवाहिन्यांच्या आचरटपणाला आपण खतपाणी घालत नाही एवढंच मानसिक समाधान !

– अद्वैत आयनापुरे

अगदी अशीच चीड मला प्रमोद महाजनांचा खून त्यांच्या धाकट्या भावाने केला तेव्हाच्या बातमी दाराची आली होती.प्रमोद महाजन ह्यांचे मोठे बंधू अगदी हताश, चक्क धोतराला डोळे पुसत उभे होते, त्यांच्या समोर माईक धरून एक महान पत्रकर्ति विचारत होती,” ह्या क्षणी तुम्हाला काय वाटत आहे दादा?”त्यांचे माहीत नाही पण मला चक्क तिच्या मुस्काटात मारावीशी वाटत होतीज्यांच्या एका भावाचे प्रेत घरात आहे आणि त्याला कारणीभूत दुसरा भाऊ आहे अशा प्रौढ माणसाला काय वाटते, हा प्रश्न?

-स्वाती समक

आत्ता काल परवाचीच गोष्ट. मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरु होती. लाॅकडाऊन संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होणार होते. इकडे एका वाहिनीवरचा निवेदक तिथल्या त्याच्या रिपोर्टरला विचारत होता,” तुला काय वाटतं , आत काय निर्णय झाला असेल”? आता हा (की ही) काय डोंबलं सांगणार ? “तुम्हे क्या लगता है, प्रधानमंत्री के मन में अब क्या चल रहा होगा ?” याचं उत्तर कोण महाभाग रिपोर्टर देऊ शकेल? पण आम्ही अगदी श्रध्देने पाहतो, ऐकतो. सांग बाबा ….

-विश्वेश्वर सावदेकर

टिव्ही स्क्रीनवर जिथे जागा मिळेल तिथे जाहिरात..अगदी हेडलाईनचे सुद्धा प्रायोजक… सकाळच्या दुपारच्या संध्याकाळच्या रात्रीच्या..नावाखाली दिल्या जाणाऱ्या त्याचं बातम्या.. एक छोटासा ब्रेक घेतो.. तुम्ही कुठेही जाऊ नका…लगेचचं परत येतो…बघत राहा..अरे!कामधंदा सोडून आम्ही दिवसभर टिव्ही समोर बसून राहायचं?

-चंद्रशेखर वैद्य

अगदी खर आहे…आजतक चे वार्ताहर, investigation केल्यासारखे च, पोलिस खात्याच्या वरताण अशा बातम्या कथन करत.पत्रकारितेचे विकृत स्वरूप दिवसेंदिवस हिडीस, बीभत्स होत चालले आहे. काय दाखवावे, काय नाही, याचे तारतम्य च राहिले नाही. याचा परिणाम म्हणून आमच्यासारखे अनेक प्रेक्षक, टीव्ही कडे पाठ वळवत आहेत. त्यांच्यावर अंकुश च राहिला नाही सरकारचा…!!

-उज्ज्वला जोशी खिलारे

त्या कंगनाच्या घरतोड प्रकरणी , मीडियाचे जागरूक पत्रकार ,एका पोस्टमनला मनपा चा कर्मचारी समजून प्रश्नांचा भडिमार करत होते , तो वारंवार सांगत होता ,” मैं पोस्टमन हूँ ” पण TRP ची मस्ती चढलेले पत्रकार त्याला भंडाऊन सोडत होते ! फार केविलवाणी परिस्थिती होती !😢

-शिरीष दडके

टि.आर. पी. मिळवण्यासाठी काय पण.खरे तर आपल्याला जे चँनल बघायचे नाही ती बंद करून ,आपण पुढील चँनल बघणे बंद केले आहे, हे सर्व जगाला आठवडाभर सांगणे ,व का असे करतोय त्याची कारणे देणे ,थोडा वेळ जास्त जाईल पण शक्य असलेल्या सर्वानीं केले तर नक्की फरक पडेल. मी करतो आहे, आपण ही करा .

-विनायक बापट

लोकांनी आपले मत कमेंट मध्ये जरूर मांडावे, आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवू…

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.