आज नेहमीपेक्षा वेगळा विषय आहे पण मला खात्री आहे की पोस्ट वाचून झाल्यानंतर जवळपास प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात ‘करूया करूया’ म्हणत राहून गेलेल्या गोष्टी आठवतील आणि अर्थातच त्या पूर्ण करण्याची प्रेरणाही नक्की मिळेल.
काश्मिर ते कन्याकुमारी
अंतर – ३९५९ किलोमीटर
दिवस – फक्त ५.५
वेळ – फक्त १३० तास
रोजचं सरासरी अंतर – ६६० किलोमीटर
गाडी – होंडा अॅक्टिवाविक्रमवीर – निशा राव
हे वरचे सगळे आकडे नुसते वाचले तरी डोकं गरगरून जाईल. थक्क करणाऱ्या सगळ्या विशेषणांच्या पलिकडचं आहे हे सगळं. हिमालय ते दक्षिण टोक असा भारत पादाक्रांत करणं हेच मुळात भारी आहे. आजच्या घडीला गिअरलेस स्कूटरवरून एका मुलीने आणि तेही कमालीच्या वेगवान वेळेत हे मार्गक्रमण करणं हा एक भारतीय विक्रम आहे. आता त्यावर अधिकृत शिक्का लागणं केवळ बाकी आहे. अशा विक्रमांची माहिती ठेवणाऱ्या दोन तीन संस्था लवकरच शिक्कामोर्तब करतीलच. अर्थातच आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडून असं काही थरारक घडलंय याचा विशेष आनंद आणि अभिमान वाटतोय.
आपल्या आवडीच्या गोष्टीत काहीतरी करणं ह्यासारखं समाधान नाही. निशाला गाडी चालवायची आवड होतीच पण त्या खुमखुमीला दिशा मिळत नव्हती. नोकरीच्या रहाटगाडग्यात बऱ्याच गोष्टींना माघार घ्यावी लागते. पण when there is a will, there is a way – अर्थात इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात ते उगाच नाही. एकदा तो भुंगा डोक्यात गुणगुणायला लागला की मग माघार नव्हती. He came He saw and He conqurred असा इंग्लिशमध्ये एक वाक्प्रचार आहे. पण हे सहज घडण्यामागे केलेली पूर्वतयारी शक्यतो आपल्याला दिसत नाही. इतकं कठीण शिवधनुष्य निशाने पहिल्या प्रयत्नात पेललं पण ते पेलण्यासाठी तिने आणि तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी पूर्वतयारीसाठी घेतलेले कष्ट मी जवळून बघितले आहेत. अंतिम लढाई मात्र एकटीलाच लढायची होती. ती लढली आणि अपेक्षेप्रमाणे जिंकलीही.
उत्तर भारतातल्या हात गोठवणाऱ्या थंडीत, बोचऱ्या वाऱ्यात; रस्त्यात मध्येच वाहणाऱ्या गार पाण्याच्या ओहळापासून ते खडकाळ दगडगोट्यातून तर कधी यमुना एक्सप्रेसच्या मख्खनवाल्या रस्त्यावरून; मध्यप्रदेशमध्ये वाटेत येणारे गाय बैल, कधी मिट्ट अंधार, कधी रणरणतं ऊन तर कधी बेफाम पाऊस. कधी तंद्री लागत तासंतास कापलेलं अंतर, कधी ट्रॅफिकमधून काढावी लागलेली वाट. कधी शरीराशी तर कधी मनाशी चाललेल्या वाटाघाटी आणि निशाच्या खंबीर मनाने वेळोवेळी तिच्या शरीराला दिलेली उचल. हे सगळे प्रकार अनुभवत, झेलत असताना – ‘वेलकम टू कन्याकुमारी’ असा बोर्ड जेव्हा तिला दिसला असेल तेव्हाच्या निशाच्या मनस्थितीची आपण कल्पना करू शकतो.
निव्वळ निखळ समाधान.
खरंच, तुम्ही ह्याला आवड म्हणा, क्रेझ म्हणा, ध्यास, पॅशन, वेड, किडा, भुंगा – काय वाट्टेल ते म्हणा. पण बॉस, ह्यातलं काहीतरी, मग ते कशाच्याही बाबतीतलं असूदे; आपल्या गाठीशी हवं म्हणजे हवंच.
अभिनंदन निशा.
तळटीप – आवडलं तर शेअर करा. भरपूर लोकांपर्यंत पोहचू दे. हे किडे प्रत्येकाला चावले पाहिजेत.