पिंपरी-चिंचवडच्या दापोडी येथे पोलिसावर हल्ला ; शहरातील हल्याची अजून एक घटना

0
पिंपरी-चिंचवडच्या दापोडी येथे पोलिसावर हल्ला ; शहरातील हल्याची अजून एक घटना

दापोडी येथे पुन्हा पोलिसावर हल्ला झाला आहे. गर्दी पांगवत असताना दहा जणांनी मिळून पोलिसाला शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. काळेवाडी, बोपखेलमधील पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना ताज्या असताना हा हल्ला झाला आहे, त्यामुळे नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया येत आहे.

 काळेवाडी, बोपखेलमधील पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच दापोडी येथे पुन्हा पोलिसावर हल्ला झाला. मागील पंधरा दिवसांतील ही तिसरी घटना आहे. गर्दी पांगवत असताना दहा जणांनी मिळून पोलिसाला शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याची घटना दापोडीत घडली आहे. 

आयाज भिकात शेख, गालिब भिकात शेख, समीर सलीम शेख (सर्व रा. इकरा इंग्लिश मीडियम स्कुलजवळ, दापोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे इतर सात साथीदार फरारी आहेत. सिद्धार्थ दत्तू वाघमारे (वय 31) असे हल्ला झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दापोडी-बोपोडी पुलाजवळील पवार वस्ती येथील स्मशानभूमीजवळ बुधवारी (ता. 13) सकाळी पावणे नऊच्या सुमारास गर्दी जमली होती. ही गर्दी पांगवत असताना संशयित आरोपींनी वाघमारे यांना शिवीगाळ करीत त्यांना लाथा बुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. या सर्वांवर सरकारी कामात अडथळा आणत सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दिवस रात्र झटत आहेत. मनुष्यबळ अपुरे असतानाही तारेवरची कसरत करत बंदोबस्ताचे योग्य नियोजन केले जात आहे. तरीही चोवीस तास रस्त्यावर असलेल्या पोलिसांवर हल्ले सुरूच आहेत. 

बोपखेल फाटा येथील नाकाबंदीच्या ठिकाणी रविवारी (ता. 10) सायंकाळी वाहन तपासणीसाठी थांबविल्याच्या रागातून महेंद्र रवींद्र वाघमारे याने पोलिस हवालदार संजय कामठे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश जाधव यांना दगड फेकून मारीत धक्काबुक्की, शिवीगाळ करून इतरांनाही दगड मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या वाहनाच्या काचेवर डोके आपटून काच फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.

पंधरा दिवसांपूर्वी काळेवाडी येथे बंदोबस्तावरील पोलिसावर हल्ला झाल्याची घटना घडली. विनाकारण रस्त्यावर फिरत असताना हटकल्याने तिघांनी मिळून शंकर विश्वंभर कळकुटे या पोलिसावर हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी युनूस गुलाब अत्तार, मतीन युनूस अत्तार, मोईन युनूस अत्तार या तिघांना अटक केली. या घटना ताज्या असतानाच बुधवारी पुन्हा पोलिसावर हल्ला झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. 

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.