मी कार्यकर्ता
काल साहेब येणार म्हणून चौकात झेंडे लावत होतो रात्री ३ वाजेपर्यंत काम आटोपलं विभागप्रमुखांनी बक्षिस म्हणुन प्रत्येकाच्या हातात १ सोमरसाची बाटली टेकवली. मग तसाच घरी आलो बायको जागी होती तिने दार उघडलं.
त्या दाराच्या खडखड वाजण्याने झोपलेली पोर जागी झाली.
तस घर म्हणुन राहायला ही झोपडीच होती.ती सुद्धा महापालिकेनी अनधिकृत म्हणून घोषित केलेली.पक्षाचे नगरसेवक म्हणाले
“मी आहे; काही नाही होणार रे!”.
पोरं जागी झाली व चुळबूळ करु लागली तेव्हा बायकोने सांगितले की जेवायला घरात काही नाही, पोर भुकेने बेजार झाली तुमची वाट पाहत झोपली तशीच.
हातातील सोमरसाची बाटली तशीच गळून पडली.रोजनदारी वर राबणारा गडी मी.उद्या साहेब येणार म्हणून घरातुन कामाला निघालेलो पण नोकरीवर गेलोच नाही इथेत कार्यालयात राबत राहिलो.
बायकोची चिडचिड ऐकत पहाटेचा भोंगा वाजला बाजूच्या प्लास्टिक कंपनीत भोंगा वाजला.
रात्रपाळी संपल्याची ती खूण असे!
मागे कारखान्यातील सांडपाणी पिण्याच्या बावीत मिसळल्यानं माझं मोठ पोर आजारी पडलं त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो तिथे समजले मोठ्या इस्पितळात हलवाव लागेल.
इस्पितळात धावत पळत घेऊन गेलो तर डॅाक्टराने औषधाची ही भलीमोठी यादी हाती दिली खिश्यात पैसे नव्हते.
पक्ष कार्यालयात पोहचलो तर कळालं नगरसेवक दौर्यावर गेलेत.
तिथे बायकोचा शेवटचा दागिना गहाण पडला तेव्हा पासून ते २५ रुपयाच मंगळसूत्र घालुन हिंडते. साहेब दौर्यावर गेले होते म्हणून नाहीतर हे झालचं नसत.
सकाळ झाली पोर उठली शाळेत जेवण मिळत म्हणुन हिरकीन तयार झाली. पण धाकट्या पोराची चड्डी बांधायची नाडी कुठे सापडेना शेवटी हिने पोलक्याची तोडुन दिली.
पोर शाळेत पोहचली तसा मी पण आंघोळ करुन तयार झालो कामावर जायला. तसा गणप्या दारात आला की साहेब येतीलच आता तुला कार्यालयात बोलावलंय.
मी त्याला सांगितल की घरात अन्नाचा कण नाय तस तो म्हणाला की “हरेक कार्यकर्त्यास कार्यालयात बिर्याणीचे डबे पुरवणार हेत” हातातली पिशवी तिथचं टाकुन लगेच निघालो.
साहेब आले तेव्हा म्हंटल माझ्या वस्तीतल्या समस्या सांगतो एकदा त्यांना. पण ते म्हणे मोजक्या व निवडलेल्या घरीच जाणार आहेत जिकडं आपल्या नगरसेवकानं काम केली आहेत त्यामुळे ते आपल्या वस्तीत येणार नाहीत.
मोजून ३ वाजता साहेब गेले व त्यानंतर दुपारी मोठ्या हॅाटेलात त्यांची नगरसेवकासोबत मेजवानी होती.
साहेब निघाले तेव्हा दुपारचे दोन वाजले होते पोटात भुकेचा आसूड उठला होता.
नगरसेवकानं प्रत्येक कार्यकर्ता च्या हातात २ बिर्याणीचं डबे दिले. माझ्या घरात माणसे चार आणि डबे २ अस गणित चुकलं होत. अजुन एखादा डबा मागितला तर कळलं कार्यकर्ते मोजुन आणले आहेत डबे.
ना जास्त ना कमी.
घरी आलो तर पोरं हातातले डबे पाहुन पळत आली डबे झपाझप उघडले गेले व बिर्याणीचा फशा पडू लागला.
पोरांना खाताना बघुन समाधान वाटलं आणि मी मात्र मडक्यातलं पाणी पोटभर पिऊन घेतलं
बिर्याणी संपली.पोर खेळायला पळाली. मी जाऊन उंबरठ्यात बसलो आता राहिला होता तो प्रश्न
रात्रीच्या जेवणाचा!
-अनामिक
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.