छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला प्रतापगड भवानी मातेच्या मंदिरास ३५७ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त ३५७ मशालींनी उजळला.

0
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला प्रतापगड भवानी मातेच्या मंदिरास ३५७ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त ३५७ मशालींनी उजळला.

छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगड ३५७ मशालींनी उजळून निघाला. निमित्त होते ते प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या मंदिरास ३५७ वर्षे पूर्ण झाल्याचे. नवरात्र उत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद लुटला. हा तेजोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांमधून हजारो भाविकांनी प्रतापगडावर हजेरी लावली.

प्रतापगड किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भवानी माता मंदिरापासून बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड उजळून निघाला. या नयनरम्य नजराण्यामुळे जणू शिवकाळच अवतरला असल्याचा भास होत होता.

भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या वेळी नगारे, तुतारी, सनई तसेच प्रतापगडावरील प्रसिद्ध स्वराज्य ढोल ताशा पथक व लेझीमच्या गजरात व भगवे झेंडे फडकावत मशाली पेटून दीपोत्सव साजरा झाला. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. गडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांनी डोळ्यात साठवून ठेवला.

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीमध्ये सापडणाऱ्या शाळीग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवून प्रतापगडावर तिची 1661 साली स्थापना केली. या घटनेला आज 357 वर्षे पूर्ण झाले. यानिमित्ताने गडावर 357 मशाली पेटविण्यात आल्या. प्रत्येक वर्षी या मशालींमध्ये एका मशालीची वाढ होते.

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला प्रतापगड किल्ला अफजल खानाचा वध आणि अशा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले कित्येक पराक्रम या किल्ल्याशी जोडलेले आहेत.

मशाल महोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी दाखल होतात. नवरात्रातील चतुर्थीच्या दिवशी मशाली पेटविण्याची ही परंपरा सुरु असताना हा मशाल महोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी या ठिकाणी मोठ्या संखेने हजेरी लावतात.

यंदाच्या मशालींचा आकडा 357 झाला. या मशालींनी नुसता हा प्रतापगडच उजळला नाही तर यातून शिवरायांच्या यशोगाथांनाही उजाळा दिला.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.