हडपसर उड्डाणपूल धोकादायक झाल्यामुळे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी एक महिना उड्डाणपूल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलावरील तिन्ही मार्गांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सोलापूर रस्त्याच्या दिशेने जाणारा, शहराकडे येणारा व सासवड रोडच्या दिशेकडून शहराकडे जाणारा असे तिन्ही मार्ग बंद असल्याने हडपसर वाहतूक पोलिसांनी हडपसर गावातून वाहतूक वळवण्यात आली आहे. पर्यायी मार्ग नसल्याने हडपसर गावात मोठी वाहतूक कोंडी होऊन शनिवारी वाहनाच्या पुन्हा रांगा लागल्या. याबाबत महापालिका आणि वाहतूक प्रशासनाने नियोजन करण्याची मागणी केली आहे.
हडपसर उड्डाणपुलावर काही ठिकाणी धोकादायक हादरे बसत असल्याने शनिवारी महापालिकेचे कार्यकारी अभियंता इंद्रभान रणदिवे यांनी वाहतूक शाखेला भेट देऊन अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाचे पत्र दिले. त्यानुसार हडपसर वाहतूक विभागाने शनिवारी सायंकाळपासून हडपसर उड्डाणपूल सोलापूर रोड व सासवड रोडवरून येणारा सर्व मार्ग बंद केला आहे. संपूर्ण वाहतूक हडपसर गावातून वळवण्यात आली आहे. पुन्हा वाहतूक पाच ते सात किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.
हडपसर उड्डाणपुलास हादरे बसत असल्याचे नागरिकांनी महापालिकेच्या निदर्शनात आणून दिले, तेव्हा महापालिकेने २० दिवसांपूर्वी उड्डाणपुलावर जड वाहनांना जाण्यास बंदी केली होती. मात्र, ती केवळ सकाळी असल्याचे दिसले. रात्रीच्या वेळी सर्रास जड वाहने पुलावरून जात होती. याबाबत आमदार, नगरसेवकांनी मुंबईच्या तज्ज्ञ पथकाद्वारे पाहणी केली. यात बेअरिंगमध्ये त्रुटी आढळल्या. शुक्रवारी दुपारीसुद्धा महापालिकेच्या दुसऱ्या तज्ज्ञ पथकाने पुन्हा उड्डाणपुलाची पाहणी केली. यात त्यांनी उड्डाणपूल बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याने उड्डाणपूल दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला. त्यानंतरही शुक्रवारी रात्री जड वाहने जात होती. मात्र, शनिवारी पुन्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सूचना दिल्याने उड्डाणपूल बंद ठेवण्यात आला आहे.
‘हडपसर गावातून होणार वाहतूक’
हडपसर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी सांगितले, ‘महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी आदेश दिले आहेत, की दुरुस्तीच्या कारणास्तव उड्डाणपूल वाहतुकीसाठी एक महिना बंद ठेवावा. त्यामुळे सोलापूर रोड व सासवड रोड मार्गाचा संपूर्ण मार्ग बंद केला आहे. हडपसर गावातून वाहतूक वळवत आहोत. शक्यतो स्थानिक वाहनचालकांनी व जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. नागरिकांनी सहकार्य करावे.’