पुणे: शिक्षकाने अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यास बेशिस्त वागतो म्हणून ताकित दिल्याने राग मनात धरून विद्यार्थ्याने शिक्षकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी वाडेबोल्हाई येथे घडली.
सुनील पोपट भोर या विद्यार्थ्याने आज सकाळी 8 वाजता पार्थना चालू असताना उस तोडण्याच्या कोयत्याने शिक्षकावर हल्ला केला. विद्यार्थ्याच्या हल्ल्यात जोगेश्वरी माता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वाडेबोल्हाई येथील उच्च माध्यमिक कॉलेजचे शिक्षक दर्शन चौधरी, धनंजय आबनावे हे गंभीर जखमी झाले आहे. शिक्षकांना उपचारासाठी वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरावीत शिकणाऱ्या सुनील पोपट भोर या विद्यार्थ्याला दर्शन चौधरी आणि धनंजय आबनावे या शिक्षकांनी खडसावले होते. सुनील भोर हा महाविद्यालयात बेशिस्तपणे वागायचा. डोक्यावरचे केस वाढवल्यामुळे दोन्ही शिक्षकांनी काही दिवसांपूर्वी त्याला समज दिली होती. यावेळी त्यांनी भर वर्गात सुनीलची खरडपट्टी काढली होती. याचाच राग सुनीलच्या मनात होता. आज सकाळी प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात परतत होते. त्यावेळी सुनीलने त्याच्या जवळील ऊस तोडण्याच्या कोयत्याने दर्शन चौधरी आणि धनंजय अबनावे यांच्यावर वार केले. यात दोन्ही शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिक्षकांवर केलेल्या हल्ल्यानंतर विद्यर्थी फरार झाला आहे. लोणिकंद पोलिस स्टेशला गुन्हा दखल करण्याचे काम चालू आहे.