गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणीत सापडलेले आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत करता न आल्यानं कायद्याच्या कचाट्यात अडकलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधार दिला आहे. कुलकर्णी हे मराठी व्यावसायिक आहेत, स्वतःच्या हिंमतीवर वर आलेत, तो फसवणारा माणूस नाही, त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहा, असं आवाहन राज यांनी गुंतवणूकदारांना केलं.
मराठी व्यावसायिकांना संपवण्यासाठी एक लॉबी काम करत असून त्यात काही राजकारणीही सामील आहेत, असा आरोप राज यांनी केला. या लोकांपायी डीएसकेंनी उभं केलेलं विश्व उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
डी. एस. कुलकर्णींकडे पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांपैकी काही गुंतवणूकदारांची आज राज ठाकरेंसोबत बैठक झाली. त्यात राज यांनी केलेल्या आवाहनाला गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आपले पैसे नक्की परत मिळतील, असा विश्वास व्यक्त केलाय.