आता तूच धाव रे रामा……! | बाळासाहेब थोरात

0
आता तूच धाव रे रामा……! | बाळासाहेब थोरात

आता तूच धाव रे रामा……!

अमेरिकेतील जगदविख्यात मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून आर्थिक व्यवस्थापन या विषयात पी. एच डी, भारतातील पहिल्या क्रमांकाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद इथून मास्टर्सची पदवी, आय आय टी, दिल्ली इथून बी. टेक. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि संचालक, शिकागो विद्यापीठात प्राध्यापक आणि किमान दहा अर्थविषयक पुस्तकांचे लेखक, हे नक्कीच कुण्या सामान्य माणसाचं वर्णन नाही. हे आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन. डाॅ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान असताना त्यांची नियुक्ती केली होती. वास्तविक, रिझर्व बँकेच्या गव्हर्नरला जे वेतन मिळतं, त्यापेक्षा राजन अमेरिकेत जास्त पैसा कमवत होते. पण ते देशासाठी आले. मोदी सरकारने त्यांना मुदतवाढ नाकारली. राजन अमेरिकेत परत गेले.

‘भांडवलशहांपासून भांडवलशाही कशी वाचवायची’ (HOW TO SAVE CAPITALISM FROM CAPITALISTS) या नावाचं त्यांचं एक गाजलेलं पुस्तक आहे. २००८ साली आलेल्या जागतिक मंदीचं भाकित त्यांनी त्यात केलं होतं.

रिझर्व्ह बँकेत जरा स्थिरस्थावर झाल्यावर सरकारी बँकांची थकित कर्जं वसूल करण्याकडे राजन यांनी मोर्चा वळवला. वेळ आली तर या उद्योगपतींच्या खाजगी मालमत्ता जप्त करण्याची तयारी सुरू केली. पण दरम्यान भाजपा सरकार सत्तेवर आलं. कर्जवसुली दूरच, उलट उद्योजकांचे कर्जाचे दर कमी करा असा लकडा सरकारने लावला. भारतासारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीला अधिक प्राधान्य पाहिजे असा राजन यांचा आग्रह होता. त्यामुळे सरकारच्या दादागिरीला ते बधले नाहीत. उलट नोटबंदी प्रस्तावाला त्यांनी विरोध केला. आपल्या पदाची स्वायत्तता त्यांनी खंबीरपणे टिकवली. मग एस. गुरुमूर्ती, सुब्रमण्यम स्वामी अशा लोकांना पुढे करून त्यांच्यावर हीन शरसंधान सुरू झालं. सरकारचे त्यांच्याशी तीव्र मतभेद आहेत अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली. अर्थातच त्यांची तीन वर्षांची मुदत संपल्यावर त्यांना जावं लागलं.

आज अचानक त्यांच्यावर लिहितोय त्याला कारण आहे. ज्येष्ठ भाजप नेते डाॅ. मुरली मनोहर जोशी हे संसदेच्या अर्थविषयक सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. आज ११% च्या आसपास (अंदाजे १०.२५ लाख कोटी रुपये) झालेली थकित कर्जं कशी वसूल करायची हा भीषण प्रश्न या समितीला भेडसावत आहे. आश्चर्याचा धक्का बसावा अशी बाब म्हणजे चक्क राजन यांची मदत आणि सल्ला या समितीने मागितला आहे. ७ ऑगस्टला राजन यांना लिहिलेल्या पत्रात जोशी म्हणतात, “हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी आपला जागतिक अनुभव आणि सखोल ज्ञान याची आम्हाला आवश्यकता आहे. आपण भारतात येऊन आम्हाला मार्गदर्शन केलेत तर उत्तमच. पण आपल्या कार्यबाहुल्यामुळे ते शक्य नसेल तर लिखित स्वरूपात आपले बहुमूल्य विचार कळवलेत तर आम्हाला खूप मदत होईल आणि आम्ही आपले उपकृत राहू!”

डाॅ. मनमोहनसिंग यांची निवड किती अचूक होती याची ही पोचपावती आहे. त्याहीपेक्षा, रघुराम राजन यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या अर्थ शास्त्रज्ञाला अपमानास्पदरीत्या घालवून आपण केवढी घोडचूक करून बसलो याचा भाजपाने दिलेला हा कबुलीजबाब आहे.

जाताजाता : भाजपा सरकारने नेमलेले मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम अलिकडेच “वैयक्तिक कारणांमुळे” मुदतपूर्व राजीनामा देऊन अमेरिकेत परत गेलेत.

बाळासाहेब थोरात

माजी कृषिमंत्री आणि महसूल मंत्री 

हा लेख बाळासाहेब थोरात यांच्या ऑफिशिअल पेज वरून घेतलेला आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

शरद पवार यांचे कार्य: शरद पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा…

आरक्षण – एक शोधनिबंध | आरक्षण माहिती | आरक्षण म्हणजे काय?

शिवाजी महाराज बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा द्यायचे? चौरंग शिक्षा म्हणजे काय?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.