संपूर्ण देशाला शर्मसार करणारी घटना, ज्या घटनेने मुली अत्याचाराला वाचा फोडायला शिकल्या अशा निर्भया सामूहिक बलात्कार व खून प्रकरणाला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल बोलताना ‘अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना सहा महिन्यांत फासावर लटकावले पाहिजे’ असे म्हणाल्या.
न्यायप्रक्रिया वेळखाऊ आणि त्रासदायक असल्याने गुन्हेगारांवर न्यायव्यवस्थेची भीती तयार होत नाही, उशिरा न्याय मिळाल्याने पीडित व्यक्ती निराशाग्रस्त होऊन जाते.
न्याय लवकरात लवकर मिळून नराधमांना लगेच शिक्षा झाल्यास अत्याचार झालेल्या महिला पुढे येऊन नराधमांशी लढण्याचे त्यांना बळ मिळेल असे त्या म्हणाल्या.
अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना तातडीने निकाल लावत सहा महिन्यांत फाशी होण्याची तरतूद असणारे विधेयक मंजूर करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. यावर सरकार काय पाऊले उचलतेय हे पहावे लागेल.
नुकताच कोपर्डी प्रकरणाचा निकाल लागला असून त्यातील नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे.