संभाजी महाराज आणि गोदावरी यांचा जो काही संबंध आतापर्यंत नाटकात दाखवला गेला आहे, तो फक्त एक काल्पनिक कथा म्हणून दाखवला गेला आहे.

बालाजी आवजी चिटणीस यांच्या वंशज मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या ‘चिटणीस बखर’ मध्ये या अनामिक स्त्री च्या कथेचा संदर्भ जोडला गेला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्युनंतर तब्बल १२२ वर्षांनी लिहिल्या गेलेल्या चिटणीस बखर मध्ये संभाजी महाराजांचे चरित्र जाणीवपूर्वक मलिन केले गेले.
पुढे याच बखरीचा संदर्भ देत अनेक इतिहासकारांनी संभाजी महाराजांच्या बदनामीची रेघ ओढत राहिले. ही बखर मल्हार रामराव चिटणीस यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून लिहिलेली असू शकते याचे कारण मल्हार रामरावाच्या इतिहासात आहे. बाळाजी आवजी चिटणीस हा मल्हार रामरावाचा खापर पणजोबा होता. त्याला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिले होते. ही बखर लिहिताना मल्हार रामरावाच्या मनात संभाजीबद्दलचा आकस नसेल असे कसे म्हणता येईल?
डॉ. जयसिंगराव पवार लिहीतात की, ‘बाळाजी आवजी, खंडो बल्लाळ या आपल्या पूर्वजांविषयी लिहिताना त्याने त्यांच्या प्रतिमा उजळून टाकल्या आहेत. तथापि संभाजी महाराज गादीवर येऊ नयेत म्हणून झालेल्या कटात आणि त्याअंतर्गत त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाच्या आणि अकबराशी संगनमत केल्याच्या कारस्थानांत बाळाजी आवजीचा काही भाग होता हे तो कोठेच नमूद करीत नाही. ज्या रायगडावर ही घटना घडली असे सांगण्यात येते, त्या गडावर संभाजीराजे यावेळी नव्हतेच. मल्हार रामराव सांगतो, की ही घटना घडल्यानंतर पित्याचा रोष ओढवून त्याची शिक्षा टाळण्यासाठी संभाजीराजे रायगडाहून दिलेरखानाच्या गोटात पळून गेले. प्रत्यक्षात ते सज्जनगडाहून खानाच्या गोटात गेले आणि त्यापूर्वी त्यांचा मुक्काम द. कोकणात शृंगारपुरी येथे पावणेदोन वर्षे होता.
मुळात अण्णाजी दत्तोला गोदावरी नावाची मुलगी नव्हतीच. अण्णाजी दत्तोला संभाजी महाराजांनी केलेले राजद्रोहाचे शासन जाणुनबुजून केले आहे हे दाखविण्यासाठी बखरकार, इतिहासकार व नाटककारांनी पुर्वग्रह दुषित ठेवुन लोककथेत गोदावरी या काल्पनिक पात्राला आणले.
चार-चार पादशाह्यांना एकाच वेळी चित करणारे, शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवुन त्याचा विस्तार करणाऱ्या शंभुराजे यांच्या बदनामी साठी खोट्या इतिहासावर विश्वास ठेवणे म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमी, जाज्वल्य इतिहासाला नाकारण्यासारखे आहे.
मुळात कृष्णाजी अनंत सभासद हा शिवकालीन बखरकार (ज्याने ‘सभासदाची बखर’ लिहिली आहे) वगळता अन्य बखरी या शिव-शंभूंच्या पश्चात लिहिल्या गेल्या असल्याने त्यात अन्य अनेक दृष्टीकोनांचे अभिनिवेश रत झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
.
संदर्भ – ‘मराठेशाहीचा मागोवा’ डॉ. जयसिंगराव पवार
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.