मगरपट्टा सिटी ची संकल्पना मांडणारे असामान्य सतीश मगर… शेतकऱ्यांना बनवले व्यावसायिक

0
मगरपट्टा सिटी ची संकल्पना मांडणारे असामान्य सतीश मगर… शेतकऱ्यांना बनवले व्यावसायिक

पुण्यातील मगरपट्टा अत्यंत प्रसिद्ध अशी टाउनशिप.

हि टाऊनशिप कशी उभी राहिली असा रंजक प्रश्न तुम्हालाही पडला असेलच ना….
हि प्रसिद्ध टाऊनशिप कोण्या मोठ्या पिडीजात बांधकाम व्यावसायिकाने बांधली नसून पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या एका शेतकऱ्यांची आहे. या प्रसिद्ध निर्मिती मागे शेतकरी कुटुंबातून आलेले सतीश मगर यांचे नाव घ्यावे लागेल.

सतीश मगर हे एका शेतकरी जमीनदार घराण्यातुन आले असून आजोबा राजकारणात होते तर त्यांचे वडील पुण्यातील पुणे इंजिनीरिंग कॉलेज मधून इंजिनिअर होऊन पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बी जी शिर्के यांच्या कंपनीत काम करत होते. नंतर त्यांनी स्वतःची एक नवी कंपनी ची सुरुवात केली. त्यातून ते डिफेन्स ची छोटी मोठी कामे घेत असत. १९७२ नंतर मात्र त्यांनी घरगुती शेती व्यवसाय पाहण्याचे ठरवले. सतीश मगर यांचे आजोबा अत्यंत प्रगतशील विचारी व्यक्ती होते. आपली नातवंडे जमीनदार होण्यापेक्षा कोणीतरी मोठे व्हावे यासाठी त्यांनी सर्वांनाच शिक्षणासाठी शनिवार पेठ मध्ये राहायला ठेवले.

Photo Credit's

सतीश मगर यांची जडणघडण आजोबांनी व त्यांच्या वडिलांचा नजरेखाली झाली. त्यांचे चुलते जे २० वर्ष आमदार व खासदार राहिलेले होते त्यांच्या विचारांचा सतीश मगर यांच्यावर मोठा प्रभाव होता. साधेपणाने राहणे त्यांची एक खासीयतच म्हणूनच की काय आजच्या टाटा बिर्ला च्या जमान्यात सतीश मगर जास्त प्रसिद्धी झोकात नसतात. शालेय शिक्षण पूर्ण करून सतीश मगर यांनी कृषी महाविद्यालयातून कृषी विभागातून पदवी घेतली. कृषी पदवी घेतल्यांनंतर त्यांना देशातील एक भीषण वास्तव लक्षात येऊ लागले. त्यांची पदवी पूर्ण केल्यानंतर ते शेती कडे आले. दरम्यानच्या काळात त्यांच्या एका मित्राचे दुकान एम जी रोड येथे होते तो सतीश मगर यांच्या एवढ्या १५० एकर मधून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त कमवायचा. शेती हा व्यवसाय एकदम बेभरवशाचा वाटल्याने त्यांनी १५० गायी घेत अत्याधुनिक दुग्धव्यवसायाला सुरुवात केली. आत्तासारखेच तेव्हाही दूध उत्पादकांचे आंदोलन होऊन दूध रस्त्यावर फेकायचे, दूध रस्त्यावर फेकून दिले कि दुसऱ्यादिवशी गाईला काय खाऊ घालणार आणि कसे कमावणार? असा प्रश्न पडायचा…? यातून त्यांना समजले कि शेती हा काही विश्वासाचा व्यवसाय होऊ शकत नाही.

१९८५ साली त्यांनी दोन तीन मित्रांसोबत मार्केटिंग कंपनी चालु केली त्यातून त्यांना चांगला अनुभव आला. त्याकाळामध्ये मगरपट्टा परिसरातील शेतकरी पुण्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे आपल्या जमिनी बिल्डर ला विकून गुंठे-पाटील बनायचा प्रकार रास्तपणे चालला होता, त्यातून आलेल्या पैशातून उधळपट्टी करून शेवटी कंगाल बनायचे. काहीतरी वेगळे केलेच पाहिजे हा त्यांच्यामध्ये विचार आला होता. त्यांना अगोदर वाटले कि आपण आपल्या जमिनीवर बंगले बांधून विकावेत पण ते त्यांना व्यावसायिकदृष्ट्या पटले नाही.

काही वर्ष शेती करत असल्याने त्यांचे परिसरातील बहुदा सर्वच शेतकऱ्यांशी त्यांचे चांगले संबध प्रस्थापित झाले होते. सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेऊन एक कंपनी स्थापून ज्यांची जेवढी शेती त्या प्रमाणात त्यांना कंपनी मध्ये हिस्सा द्यायचा असा विचार त्यांनी मांडला. या विचाराला भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सहमती दिली. तसाच या गोष्टीला विरोध सुद्धा झाला. पण सर्वांना व्यवस्थित समजावून सांगत त्यांनी शेतकऱ्यांना भविष्यातील फायदे दाखवून देऊन तयार केले व मगरपट्टा टाऊनशिप ची पहिली वीट रचली गेली.मगरपट्टा ची पायाभरणी झाली.
सतीश मगर लगेच एक प्रसिद्ध हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितले कि त्यांना टाऊनशिप उभारायची आहे. त्यावर हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांना त्यांची कल्पना पटली, हाफीज कॉन्ट्रॅक्टर सोबत त्यांनी विस्तृत पद्धतीने जमिनीचा अहवाल बनवला कुठे मोकळी जागा ठेवायची, शाळा कुठे, रस्ते कुठे इत्यादी त्यांनी ठरवून घेतले.

शरद पवार यांच्याशी भेट:

माहितीचा संपूर्ण आलेखबद्ध घेऊन महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली. शरद पवार साहेबानी सतीश मगर यांना टाऊनशिप उभी करण्याबाबत गंभीर आहेत का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्वतःची जिद्द दाखवत हो म्हणाले. त्यांनी शहरी जमीन कमाल मर्यादा कायद्याबाबत विचारले सविस्तर माहिती विचारली व उत्तर दिल्यानंतर त्यांनी फाईलला मंजुरी देत पुढे मंजुरी साठी पाठवून दिली.

काही दिवसांनी सरकार मधून त्यांना प्रोजेक्ट बद्दल चर्चा करण्यासाठी निमंत्रण आले. अनेक तांत्रिक अडचणी होत्या त्यांचे निराकरण करण्यासाठी सतीश मगर यांना प्रचंड वेळ गेला. याच काळात त्यांनी जगभरातील अनेक शहरांना भेट देऊन तेथील नगररचना अभ्यासली आपल्या देशातील हद्दप्पा व मोहेंजदडो संस्कृतीमधील नगर रचनेचा सुद्धा त्यांनी बारकाईने अभ्यास केला.
२००० साली मगरपट्टा टाऊनशिप च्या कामास प्रत्यक्षपणे सुरुवात झाली. पहिल्यांदा त्यांनी आय टी पार्क बांधकामाला सुरु केली, कारण त्यावेळी आयटी पार्क हा एक अत्यंत आकर्षणाचा मुद्दा होता आणि पुण्यासारख्या भागात IT चा विस्तार झपाट्याने होताना सतीश मगर यांनी पाहिला होता. सुमारे ४३० एकर मध्ये हि टाऊनशिप बनत होती. मगरपट्टा मधील हि सायबरसिटी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या कंपनीच्या मालकीची आहे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग मगरपट्टा सिटी च्या देखरेखीसाठी खर्च करतात. आज देशातील सर्वात मोठे १५ स्क्रीन चे थिएटर मॉल हे मगरपट्टा मध्येच उभे आहे.
Photo Credit's

मगरपट्टा सिटी मधील भागधारक शेतकऱ्यांना त्यांनी भागीदार बनवत त्यांच्या आयुष्याला वळण दिले. शेतकऱ्यांच्या मुलांना सतीश मगर यांनी उद्योगासाठी प्रेरणा दिली अनेकजण यातून छोटमोठे उद्योजक झाले. सतीश मगर यांनी नुसता स्वतःचा विचार ना करता सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा हि विचार केला व देशातील एक सुंदर असे शहर वसवले व त्या शहरातील ३० टक्के मालकी कायमस्वरूपी शेतकऱ्यांना दे अनेक पिढयांना त्यांनी एक आदर्श निर्माण करून दिला.
हे एक क्रांतिकारी पाऊल सतीश मगर यांनी उचलत मराठी उद्योजकांच्या यादीत नाव कमवले. जगभरात आज सतीश मगर यांचा गौरव होत आहे. त्यांनी क्रिडाई व मराठा चेम्बर्स चे ते अध्यक्ष म्हणून राहण्याचा मान हि त्यांना मिळाला आहे. सतीश मगर यांच्या पुढील वाटचाली साठी @PuneriSpeaks तर्फे त्यांना खुप साऱ्या शुभेच्छा !! पुण्याच्या मानात अजून एक तुरा सतीश मगर यांनी रोवला असून या असामान्य कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तीबद्दल सर्व जनमानसाला माहिती व्हावी यासाठी हा शेअर केला आहे.

हा लेख आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा दुसऱ्यांनी याव्यक्तीपासून प्रेरणा घेण्यासाठी हा लेख शेअर करा.
Source Credits

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.